संवेदनशील स्वयंसेवक हरपला...

    दिनांक  25-Nov-2020 15:11:36
|

harshal santosh joshi_1&n 
 
 
 
 

हर्षल संतोष जोशी या उमद्या व सहृदयी तरुणाचे ऐन भाऊबिजेच्या दिवशी अपघाती निधन झाले. त्याचे अचानक जाणे, ही त्याच्या कुटुंबाची खूप मोठी हानी तर आहेच; पण समाजाचीसुद्धा खूप मोठी हानी आहे. या समाजाला आपल्या सारख्या तरुणांची खूप गरज आहे आणि समाजासाठी, त्यांचे दुःख दूर करण्यासाठी काम करणे आपले कर्तव्य आहे, असे मानणारा हर्षल सहृदयी, तत्पर स्वयंसेवक काळाने हिरावला आहे.
 
 
 
हर्षल अगदी बालपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काम करत होता. मुक्तिधाम नगरातील भगीरथ शाखेमध्ये अगदी नियमितपणे हर्षल जायचा. सर्वांशी मैत्रीपूर्ण संबंध, विनोदी स्वभाव, संकटात कुणाच्याही पाठीशी उभे राहणे, मेहनतीसाठी नेहमी तयार असणे, सर्वांचा आदर करणे, अशा गुणांनी संपन्न असा समृद्ध माणूस, सच्चा स्वयंसेवक अवघ्या २४व्या वर्षीच जाणे हे खूप धक्कादायक आहे. त्याने केलेले काम, समाजासाठी केलेली धडपड, त्याचे सद्गुण कायम स्मरणात राहणार आहेत. संघशाखेत जाणे, हर्षलच्या आवडीचा विषय होता.
 
  
 
तो एक उत्कृष्ट बासरीवादकही होता. ‘कोणी न राहो, दुबळा येथे’ या उक्तीप्रमाणे हर्षलचे वागणे होते. ‘श्रेष्ठदान रक्तदान’ या उक्तीला जागून हर्षल नियमित रक्तदान करायचा. काही वेळी त्याने स्वतःच्या जीवाचा विचार न करता, गरजूंना वेळेवर रक्त दिले. आपल्या जगण्यातला प्रत्येक प्रसंग, प्रत्येक क्षण समाजाशी जोडायचा, असा त्याचा विचार होता.
  
 
आई भारतीय जनता पक्षाची महानगर चिटणीस म्हणून कार्यरत आहे, तर धाकटी बहीण अभाविपची शहरमंत्री आहे. त्याने आपल्या आईचा वाढदिवस वृद्धाश्रमात साजरा केला. तेथे ब्लँकेट, चादरीवाटप करून ज्येष्ठ नागरिकांना आपुलकीची ऊब देण्याचे काम केले व समाजासमोर आदर्श ठेवला.
 
  
दरवर्षी तो गोरगरिबांना किंवा वनवासी कल्याण आश्रमात अन्नदान करायचा. स्वतःची ओंजळ भरल्यावर सांडायच्या आधी, त्यातील काही दुसर्‍याला देण्याची वृत्ती प्रत्येकाकडे नसते. पण, हर्षलकडे मात्र ती होती. नाशिकमधील नामांकित महाविद्यालयातून विद्युत अभियांत्रिकीचे शिक्षण त्याने पूर्ण केले होते.
 
  
पुढील आयुष्यातही समाजाची सेवा करता यावी, यासाठी अभ्यास करून तो स्पर्धा परीक्षेसाठी सज्ज होता. येणार्‍या स्पर्धा परीक्षेच्या संधीची वाट पाहत असतानाच काळाने संधी साधली व एका होतकरू, दिलदार समाजसेवकाला आपल्यातून हिरावून घेतले. मेहनत, समाजभान ठेवून काम करणार्‍या प्रत्येकाच्या मनात त्याच्या सद्गुणांच्या रूपाने हर्षल जीवंत राहील. अशा एका सच्च्या स्वयंसेवकास भावपूर्ण श्रद्धांजली...!


 
 
- दुर्गेश केंगे
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.