अहमद पटेल यांच्या जाण्याने काँग्रेसचा मोठा आधारस्तंभ कोसळला
नवी दिल्ली : काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि गुजरातचे राज्यसभा खासदार अहमद पटेल यांनी बुधवारी पहाटे अखेरचा श्वास घेतला. १ ऑक्टोबर रोजी कोरोना संक्रमित झाल्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरूच होते. १५ ऑक्टोबर रोजी गुरुग्रामच्या मेदांता रुग्णालयात भरती करण्यात आले होते. पटेल यांनी कोरोना संक्रमण झाल्याची माहिती देत संपर्कात आलेल्या सर्वांना विलगीकरण कक्षात राहण्याची विनंती केली होती.
गांधी परिवाराच्या अनुपस्थितीत काँग्रेस पक्षाचा कारभार चालवणारे किंवा महत्वपूर्ण निर्णय घेणारा नेता, अशी त्यांची पक्षात ओळख होती. राहुल गांधी सुट्टीवर असताना किंवा सोनिया गांधींच्या प्रकृतीबद्दलच्या तक्रारी असताना पटेल यांनी काँग्रेस व्यवस्थापनाची धुरा सांभाळली होती. पटेल यांच्या जाण्याने काँग्रेसला लाभलेले पक्षातील बिगर गांधी नेतृत्व हरपले आहे. पटेल यांच्या निधनाची बातमी त्यांचे पुत्र फैझल यांनी दिले.
आपल्या ट्विटमध्ये ते म्हणाले की, "अहमद पटेल यांचे बुधवारी मध्यरात्री ३.३० वाजता निधन झाले. एका महिन्यापूर्वी त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यांच्या शरीरातील अनेक अवयव काम करत नव्हते. त्यानंतर त्यांचे निधन झाले. आपल्या परिवारासह अन्य सर्व सहकाऱ्यांना कोरोना संदर्भातील नियमावली पाळण्याचे आवाहन मी करत आहे. तसेच सोशल डिस्टंसिंगचे पालन करावे, अशीही विनंती मी करतो."
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केला शोक
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करून या बद्दल श्रद्धांजली अर्पण केली. पटेल यांच्या जाण्याने मी दुःखी आहे. समाजासाठी त्यांनी आपले जीवन अर्पण केले होते. कांग्रेस पक्ष मजबूत करण्यासाठी ते सदैव स्मरणात राहतील, त्यांचा मुलगा फैझलशी मी बोललो आहे. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो.
२८ वर्षे खासदार राहणारा काँग्रेसी नेता
पटेल यांचा जन्म २१ ऑगस्ट १९४९ रोजी गुजरातच्या भरूच जिल्ह्यात पिरामण गावात झाला. त्यांनी तीनवेळा लोकसभा (१९७७ ते १९८९) आणि चार वेळा राज्यसभा (१९९३ ते २०२०) निवडणूक लढवली. भरूच जिल्ह्यातून त्यांनी पहिली लोकसभा नवडणूक लढवली होती. तब्बल ६२ हजार ८७९ मतांनी ते विजयी झाली होते. वय होत २८ वर्षे. भरूचहून पुन्हा १९८० मध्ये ८२ हजार ८४४ मतांनी तर १९८४ मध्ये १ लाख २३ हजार ६९ मतांनी विजयी झाले होते.