राऊतांना रहाटकर यांनी दिले त्यांच्याच भाषेत उत्तर... म्हणाल्या

24 Nov 2020 15:12:44

Vijaya RAhaTkar _1 &
 
 

मुंबई : शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरावरील छाप्याला नामर्दानगी म्हटलं याचा भाजप नेत्या व राष्ट्रीय सचिव विजया रहाटकर यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. त्या म्हणाल्या, "श्री संजय राऊत म्हणतात, सरनाईकांवरील छापे 'नामर्दांनगी'! मग, कंगणा घरी नसताना बुलडोझर घुसविणे मर्दानगी?, अर्णबच्या अटकेसाठी पहाटे फौजफाटा पाठवणे मर्दानगी?, मुख्यमंत्र्यांवर टीका करणाऱ्या समित ठक्करला छळणे मर्दानगी?, मुंबई पोलिसांचा गैरवापर करणाऱ्यांनी ईडीबद्दल नक्राश्रू ढाळू नयेत.", असा प्रश्न त्यांनी राऊत यांना विचारला आहे.
 
 
 
या प्रकरणामुळे भाजप शिवसेनेत चांगलाच कलगीतुरा रंगू लागला आहे. दुसरीकडे शिवसेना आमदार प्रताप नाईक यांच्या ठाणे कार्यालय आणि घरात ईडीचे पथक पोहोचले. त्यांनी शोधमोहिम सुरू केली. नाईक पूत्र पूर्वेश आणि विंहग सरनाईक यांच्या घरीही ईडीचे अधिकारी सकाळी आठ वाजता दाखल झाले. या पथकाचा मुंबई आणि ठाण्यातील एकूण १० ठिकाणी शोध सुरू आहे. टॉप ग्रुपचे प्रमोटर्स आणि सदस्यांच्या घरी आणि कार्यालयात ही शोधमोहीम सुरू आहे. सरनाईक सध्या देशाबाहेर आहेत. महत्त्वाचं म्हणजे सरनाईक यांच्याव्यतिरिक्त शिवसेनेचे आणखी काही नेते ईडीच्या रडारवर आहेत, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
 
 
 
शिवसेनेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न !
 
अन्वय नाईक आत्महत्या, अर्णब गोस्वामी आणि कंगन रणौत या प्रकरणात आमदार सरनाईक यांनी शिवसेनेची बाजू लावून धरली होती, त्यामुळे त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरू आहे, अशी चर्चा शिवसेनेच्या नेत्यांमध्ये आहे. शिवसेना नेते सध्या या संदर्भात उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात असल्याचे बोलले जात आहे. या प्रकरणावरुन सध्या 'मातोश्री'वर खलबतं सुरू आहेत.



Powered By Sangraha 9.0