शिवसेना आमदार प्रताप सरनाईकांच्या घरी ईडीचा फेरा

24 Nov 2020 11:36:33
 
ED_1  H x W: 0
 
 

सीआरपीएफच्या ४० जवानांच्या बरोबरीने ईडीचे अधिकारी चौकशीसाठी
सरनाईक यांच्या घरी पोहोचले 
 
 

 
ठाणे: शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरी सक्तवसुली संचलनालयाचे (ईडी) अधिकारी पोहोचले आहेत. त्यांचे पुत्र पूर्वेश आणि विहंग यांच्या घरीदेखील ईडीचे पथक दाखल झाले आहे. त्यांच्या कार्यालयांमध्येही ईडीचे अधिकारी पोहोचले आहेत. सध्या प्रताप सरनाईक परदेशात आहेत. त्यांनीदेखील या माहितीला दुजोरीला दिला आहे. पण ईडी कोणत्या प्रकरणाच्या चौकशीसाठी पोहोचली आहे, याचा तपशील आपल्याकडे नसल्याचे त्यांनी सांगितले.
 
 
 
आज सकाळी आठच्या सुमारास ईडीची तीन पथकं तपासासाठी पोहोचली. त्यांनी आमदार प्रताप सरनाईक, त्यांचे दोन पुत्र आणि त्यांच्या कार्यालयात तपास सुरू केला. ईडी नेमक्या कोणत्या प्रकरणात तपास करत आहे, याबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. सीआरपीएफच्या ४० जवानांच्या बरोबरीने ईडीचे अधिकारी चौकशीसाठी सरनाईक यांच्या घरी पोहोचले. एकूण दहा ठिकाणी मुंबई, ठाणे, पुणे परिसरात शोध सुरु आहे. टॉप ग्रुपसंबंधी ही कारवाई करण्यात आली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार टॉप ग्रुपचे प्रमोटर्स आणि सदस्यांच्या घरी आणि कार्यालयात ही शोधमोहीम सुरु आहे.
 
 
प्रताप सरनाईक यांच्या घरी, कार्यालयात ईडीचे अधिकारी पोहोचल्यानंतर भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार किरीट सोमय्यांनी शिवसेनेवर निशाणा साधला. 'मनी लॉण्ड्रिंगसारख्या प्रकरणात शिवसेना पटाईत आहेत. त्यांचे मुखिया यामध्ये अग्रेसर आहेत. त्यामुळे मला याबद्दल कोणतंही आश्चर्य वाटत नाही. मुंबई महापालिकेत माफिया राज असल्याचा आरोप मी आधीही केला आहे. पालिकेतून कंत्राट, भागिदारीतून प्रचंड पैसा येत असतो,' याकडे त्यांनी लक्ष वेधलं.
Powered By Sangraha 9.0