हिंदूंच्या प्रथांचा अपमान बंद करा : विहीप बजरंग दल आक्रमक

24 Nov 2020 14:21:43

netflix _1  H x




मुंबई :
सर्व ओटीटी प्लॅटफॉर्मवर अश्लील चित्रपट, वेबसीरिज यात हिंदू धर्म, देवदेवता, साधू-संत तसेच हिंदू संस्कृती, हिंदू प्रथांचा अपमान बंद करावा; अन्यथा सर्व ओ.टी.टी प्लॅटफॉर्म्सना याची मोठी किंमत चुकवावी लागेल. ओटीटी प्लॅटफॉर्म्सने हे प्रकार बंद न केल्यास विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या माध्यमातून विशाल जन आंदोलन करण्यात येईल, असे परिषदेने स्पष्ट केले आहे.
 
 
 
मागील काही महिन्यांपासून ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर प्रदर्शित होत असलेल्या चित्रपट आणि वेबसीरिजमध्ये अश्लीलता ठासून भरलेली असते हे आपण जाणतो. अश्लीलतेसह त्यात हिंदू धर्म, हिंदू देवदेवता, हिंदू प्रथा तसेच हिंदू साधू-संतांचा होत असलेला अवमान हा निंदनीय आहे. याची दखल घेऊन विश्व हिंदू परिषद, बजरंग दल या संघटनांनी ओ.टी.टी. प्लॅटफॉर्म्सना एक पत्र लिहिले होते.
 
 
 
‘नेटफ्लिक्स’च्या अनेक वेबसीरिजमध्ये हिंदू धर्म आणि हिंदू देवदेवतांबाबत अभद्र म्हणता येतील, असे सीन दाखविण्यात आले आहेत. उपरोक्त उल्लेखित पत्रात विशेष करून ‘नेटफ्लिक्स’ला अशी ताकीद देण्यात आली होती की, अश्लील चित्रपटांमध्ये हिंदू धर्म आणि हिंदू देवदेवतांची मस्करी करणे आणि साधू-संतांना तडजोडीच्या स्थितीत दाखविण्याचा केला जाणारा प्रयत्न तातडीने बंद केला जावा. तसे न केल्यास विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या माध्यमातून विशाल जन आंदोलन करण्यात येईल. संतापजनक गोष्ट म्हणजे, काही दिवसांपूर्वी ‘नेटफ्लिक्स’च्या एका वेबसीरिजमध्ये मुस्लीम मुलगा आणि हिंदू मुलगी यांना अश्लील हावभाव करताना दाखविले आहे.
 
 
 
ओटीटी प्लॅटफॉर्ममध्ये अन्य कोणत्या धर्माच्या देवस्थानांबाबत असे वागण्याची तसेच त्यांच्या देवदेवतांची थट्टा करण्याची क्षमता आहे का? असे आम्ही त्यांना विचारू इच्छितो. एका व्यंगचित्रामुळे काय होऊ शकते ते आपण पाहिले आहे. हिंदू समाजाच्या भावनांचा बांध तोडण्याचा वारंवार प्रयत्न केला जात आहे. विश्व हिंदू परिषदेच्या जनआंदोलनांना आजवर यश मिळत आले आहे. दरम्यान, ओटीटी प्लॅटफॉर्म्स रेग्युलेटरी बोर्डांतर्गत आणण्यात येत असल्याचे समजले. या निर्णयाचे स्वागत असल्याचे विहिंपने म्हटले आहे.





Powered By Sangraha 9.0