आयपीएल २०२०ने कमावले ४ हजार कोटी

24 Nov 2020 15:55:37

IPL 2020_1  H x
नवी दिल्ली : इंडियन प्रीमियर लीगचा तेरावा हंगाम हा संयुक्त अरब अमिरीतीमध्ये आयोजित झाला. चित्तथरारक सामन्यांसह मुंबई इंडियन्सने पाचव्यांदा चषक जिंकत आयपीएल २०२०ही मुंबईच्या नावे केले. मात्र, यावेळी कोरोनाच्या सावटाखाली झालेली ही स्पर्धा अनेकदृष्ट्या बीसीसीआयसाठी फायदेशीर ठरली. कोषाध्यक्ष अरुण धुमाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, आयपीएलच्या तेराव्या हंगामाचे यशस्वी आयोजन करून बीसीसीआयने तब्बल चार हजार कोटी रुपयांची कमाई केली आहे.
 
 
 
अरुण धुमाळ यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या माहितीनुसार, "गेल्या वर्षीपेक्षा या वर्षी आयपीएलवर अंदाजे ३५ टक्के कमी खर्च करण्यात आला होता. भारतापासून बाहेर स्पर्धेचे आयोजन, विना प्रेक्षक सामने यामुळे बीसीसीआयला या सर्वांचा तोटा होईल, असा अंदाज बांधण्यात आला होता. मात्र, असे असूनही बीसीसीआयने यंदा स्पर्धेतून ४ हजार कोटींची कमाई केली आहे. विशेष म्हणजे, यंदा प्रेक्षकसंख्येचा आलेखदेखील चढता राहिला. मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यातील पहिला सामना हा सर्वाधिक प्रेक्षांनी पाहिला."
 
 
आयपीएल २०२०च्या प्रेक्षकसंख्येत लक्षणीय वाढ
 
 
‘आयपीएल’च्या तेराव्या हंगामाचा गेल्या वर्षीच्या तुलनेत एकूण २३ टक्के अधिक प्रेक्षकांनी टेलिव्हिजनद्वारे आनंद लुटला. त्यामुळे एकूण तीन कोटी, १५ लाख, ७० हजार प्रेक्षकांची यंदा वाढ झाल्याचे माहिती देण्यात आली आहे. यापूर्वी स्टार स्पोर्ट्स समूहाने दिलेल्या माहितीनुसार, यंदा प्रेक्षांकांच्या संख्येत वाढ तर झालीच, याशिवाय यामध्ये महिला आणि युवकांचा समावेशही वाढलेला होता. त्यामुळे कोरोनावर मात करत बीसीसीआयने आयपीएलच्या तेराव्या हंगामाचे यशस्वी आयोजन करून दाखवले, हे सिद्ध होते.
 
 
Powered By Sangraha 9.0