वाढीव विजबिलामुळे आत्महत्या : सरकारच जबाबदार

23 Nov 2020 13:51:54

BJP_1  H x W: 0
 



भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांचा आरोप

 
 
मुंबई : राज्यात वाढीव विजबिलांची होळी करून सरकारचा निषेध केला असताना. विजबिलामुळे आत्महत्या करणाऱ्या ग्राहकांच्या मृत्यूला ठाकरे सरकार जबाबदार असल्याचा आरोप भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी केला आहे. नागपूरमध्ये एका व्यक्तीला ४० हजारांचे विजबिल आल्याने त्याने आत्महत्या केली. तर एका भाजीविक्रेत्याला चक्क आठ लाखांचे विजबिल आल्याने त्यानेही आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार गेल्या काही महिन्यांत घडला आहे.
 
 
जनतेच्या जीवावर उठलेले हे राज्य सरकारच या आत्महत्येसाठी जबाबदार आहे. सर्व सामान्यांना दिलेल्या त्रासाचा बदला आज संपूर्ण राज्याची जनता घेणारच, असा निर्धार भाजपने केला आहे, असे चंद्रकांतदादा म्हणाले. पहिल्या घटनेत ९ ऑगस्ट २०२० रोजी विजबिलाने त्रस्त ५७ वर्षीय लीलाधर लक्ष्मण गायधने यांनी आत्महत्या केली. मृत्यूच्या आठवडाभर आधी त्यांना ४० हजारांचे विजबिल आले होते. नागपूरच्या यशोधरा नगर येथील राहत्या घरी त्यांनी आत्महत्या केली. वाढीव विजबिल आल्यामुळे ते तणावात होते.
 
 
दुसऱ्या घटनेत ‘माझ्या विजबिलाचे मीटर रिडींग व बिल खूप जास्त आले आहे. त्यामुळे मी जीवन संपवत आहे’, असे चिठ्ठीत लिहून एका व्यक्तीने आत्महत्या केली. जगन्नाथ नेहजी शेळके (वय ४३ रा. भारतनगर) यांना महावितरणतर्फे ८ लाख ६५ हजारांचे विजबिल आले होते. त्यामुळे ते चिंतेत होते. महावितरण कार्यालयात जाऊन वारंवार पाठपुरावा केला मात्र, त्याला यश आले नाही. अर्ध्या बिलाची रक्कम भरा त्यानंतर पुढे बघू, असे उत्तर त्यांना महावितरणतर्फे देण्यात आले होते. याच तणावात त्यांनी आत्महत्या केली. महावितरण बिलिंग इन्चार्ज आणि क्लर्क यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
Powered By Sangraha 9.0