ठाण्यात मनसे पदाधिकाऱ्याची गोळी झाडून हत्या

23 Nov 2020 19:37:26

Thane MNS_1  H
ठाणे : ठाण्यातील मनसे पदाधिकारी जमिल शेख यांची गोळी झाडून हत्या करण्यात आल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. दुचाकीवरून आलेल्या हेल्मेटधारी दोघांपैकी पाठीमागे बसलेल्या हल्लेखोराने शेख यांच्या डोक्यात गोळी झाडली. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल केल्यानंतर तेथून मुंबईतील जेजे रुग्णालयात हलवण्यात आल्याची माहिती राबोडी पोलिसांनी दिली. घटनास्थळावरील सीसी टिव्ही फुटेज हस्तगत करून पोलीस मारेकऱ्यांचा शोध घेत आहेत.
 
 
ठाण्यातील राबोडी परिसरात राहणारे जमिल शेख हे मनसेचे प्रभाग अध्यक्ष म्हणून कार्यरत होते. सोमवारी दुपारी राबोडी परिसरात दुचाकीवरून आलेल्या व हेल्मेट घालेल्या दोघांपैकी मागे बसलेल्या व्यक्तीने शेख यांच्या दिशेने पिस्तूलातून झाडलेली गोळी शेख यांच्या डोक्यात लागली. त्यानंतर हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पळ काढला. जखमी शेख यांना गंभीर अवस्थेत खाजगी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. दरम्यान, शेख याचा राष्ट्रवादीच्या नेत्यांशी यापुर्वी वाद झाल्याची माहिती स्थानिकांनी दिली.
 
Powered By Sangraha 9.0