जिना इसी का नाम हैं...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Nov-2020
Total Views |

manovata_1  H x
 
वेळेचा दबाव, माणसांचा दबाव, नात्यांचा दबाव ही सारी ‘आपत्कालीन वस्तुस्थिती’ आयुष्यात आणूच नये, खेळीमेळीचे जीवन जगावे. आयुष्य आपला मार्ग चालत राहणार. आयुष्याला आनंदाचे एक सुंदर रूप द्यावे. त्याचे ‘आपत्कालीन विभागा’त रूपांतर करू नये. आयुष्याचा ‘स्पीड’ हा आपल्याला धक्के देणार नाही इतका मर्यादित ठेवावा.
 
 
आयुष्यात क्षणभराचा आनंद मिळविण्यासाठी असंख्य क्षणांचा मोबदला द्यायला लागतो. बऱ्याच वेळा आपण आपल्या एका जगण्यात खूप काही जगायचा प्रयत्न करत असतो. आपली खूप ध्येये असतात. विखुरलेली स्वप्ने असतात. आपली भरकटलेली नाती असतात. या सगळ्यांचा भावनिक भार आपल्याला सांभाळायला जमत नाही. मन विकल होते. हा सगळा निराशाजनक अनुभव हृदयाशी धरून चालायचे म्हटले, तर जीवन नको नकोसे वाटते. आपली सगळी स्वप्ने उद्ध्वस्त झालेली बघत जगणे दुरापास्त होते.
 
 
आपल्याच श्वासांचा आपल्यालाच कधी भार वाटतो आणि मग हे सगळे जग सोडून आयुष्य हलके करावेसे वाटते. कधी कधी जगणं इतकं असाहाय्य होते की, आयुष्यच आता नको असे वाटायला लागते. मृत्यूच जगण्यापेक्षा अधिक सोप्पा सहज वाटायला लागतो. सगळ्या समस्यांतून सुटण्यासाठी आयुष्यच संपवावं, असे वाटायला लागते. आता आपणच राहिलो नाही, तर आयुष्यातील जटील प्रश्नांची उत्तरे शोधायचे कष्ट आपल्याला घ्यायला लागणारच नाहीत, असा काहीसा वेडा विचार आपल्या मनात भुंग्यासारखा घोंगावायला लागतो. आता जरा हे सगळं मर्यादेपलीकडे गेले आहे, असे वाटते. कुणाची मदत मागायची सवय नसली, तर मदत मागण्यापेक्षा आयुष्यच नकोसे वाटते. हताश वाटते. भविष्याबद्दल निराशा वाटते. आपल्याला संकटांशी व कठीण परिस्थितीशी दोन हात करायची ताकद उरली नाही, असे उगाचच वाटायला लागते.
 
 
आयुष्यात हार किंवा अपयश काय असते, हे खरे तर स्वत:च्या जीवनानुभवातून कळते. अर्थात, आपल्या प्रत्येकाचा अपयशाचा किंवा हार मानण्याचा मापदंड वेगळा असतो. कारण, आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याची ‘फिलॉसॉफी’ वा दृष्टिकोन वेगवेगळा असतो. एखाद्याला हरण्याचा अनुभव आयुष्यात जगण्याचा धडा देऊन जातो. कधी कधी आपण दुसऱ्या कुणाचे ‘हरलेला’ म्हणून नामकरण करतो. पण, त्यांना मात्र त्या हरण्याची जाणीव नसते. कदाचित त्यांची स्वप्ने व आकांक्षा ऐहिक पातळीवर जगण्याच्या इतरांसारखी नसतील किंवा हरण्याची भाषा त्यांनी स्वीकारलेलीच नसेल. अर्थात, सामान्यतः आपल्याला ‘हरण्याचे भय’ मात्र निश्चित वाटते. पण, हरण्याचे ‘भय’ वाटणारी माणसे त्या भीतीपोटीच आयुष्यात यशाच्या पथावर वाटचाल करू शकत नाही, हार मानणारी माणसे या जगात जास्त प्रमाणात आहेत. किंबहुना, हार न मानणारी अटळ प्रवृत्तीची माणसे या पृथ्वीतलावर विरळाच. पण, हार किंवा अपयशास घाबरणारी माणसे कशी असतात, हे समजून घेणे तसे खूप मनोरंजक आहे. माणूस म्हणून त्यांच्या स्वभावाची विशेषता काय आहे, व्यक्ती म्हणून असे काय गुणधर्म त्यांच्यात आहेत की, ज्यामुळे ‘हार’ त्यांना भयप्रद वाटते, क्लेशदायक वाटते. ही अशी निराशाजनक परिस्थिती अविचाराने भावूक होऊन विचार करणाऱ्या लोकांची असते. अशा व्यक्ती आयुष्यात नवीन आव्हाने घेण्यास घाबरतात. नवीन गोष्टी करायला घाबरतात. कारण, आपण हरलो तर काय होईल? ही भीती त्यांच्या मनात असते. या व्यक्तीच्या मनात स्वत:ची किंवा स्वत:बद्दलची एक गरीब-बिच्चारी अशी प्रतिमा असते. आत्मविश्वास कमी असतो. आत्मसन्मानही कमी असतो. मला कधीच एखादी गोष्ट करता येणार नाही किंवा एखादे यश मिळविणे, हे माझे काम नाही अशा प्रकारचे अव्यावहारिक संकुचित दृष्टिकोन या व्यक्तींमध्ये असतो. त्यामुळे भव्य-दिव्य स्वप्न पाहणे, एखाद्या महत्त्वाकांक्षेची उंची गाठणे, त्यांना जमत नाही. याशिवाय या व्यक्तींमध्ये स्वतःला विनाशाकडे घेऊन जायची प्रवृत्ती खास करून आढळते. त्यांच्या एकंदरीत जगण्याच्या शैलीवर आपण नजर टाकली, तर स्वत:ला विकासाकडे नेण्याची वृत्ती त्यांच्यात अभावानेच आढळते. आपल्याशिवाय तसे जगात कुणाचे खूप अडणार नाही. आपलेही कुणाशिवाय तसे अडलेले नाही. मग आपणच असे अडचणीचे प्रश्न निर्माण का करावे? म्हणून वेळेचा दबाव, माणसाचा दबाव, नात्यांचा दबाव ही सारी ‘आपत्कालीन वस्तुस्थिती’ आयुष्यात आणूच नये, खेळीमेळीचे जीवन जगावे. आयुष्य आपला मार्ग चालत राहणार. आयुष्याला आनंदाचे एक सुंदर रूप द्यावे. त्याचे ‘आपत्कालीन विभागा’त रूपांतर करू नये. आयुष्याचा ‘स्पीड’ हा आपल्याला धक्के देणार नाही इतका मर्यादित ठेवावा.
 
 
 
आयुष्यात सगळ्याच स्वप्नांना मूर्त स्वरूप देता येणार नाही. पण, अशा अमूर्त स्वप्नांच्या व्यर्थ मागे जाऊन आपण आपलं जीवन भकास करणार नाही, इतके भान ठेवावे. साईबाबा म्हणतात तसे, ‘थोडेसे सबुरीने घ्यायला शिकावे’ आपली ध्येये, स्वप्ने व कामे महत्त्वाची जरूर आहेत. पण, आपल्या आयुष्यात मौज करणे, कुटुंबाबरोबर आनंद घेणे, कुटुंबाला आनंद देणे, आपले छंद जोपासणे हे सारेसुद्धा खूप महत्त्वाचे नाही का? साध्या साध्या गोष्टींचे अवडंबर करून आपल्या आनंदाला आपण तिलांजली द्यायची, यासारखी दुसरी दुर्दैवी गोष्ट आपल्या आयुष्यात काय असू शकते? आपल्या रोजच्या कामापलीकडे जाऊनही स्वत:च्या अस्तित्वाचा विचार करायला लागतो. आनंदासाठी आतून प्रेरित व्हावे लागते. आयुष्य एकच आहे. या सगळ्यापलीकडे जाऊन त्या आयुष्यातला आपला असा उल्हास आपल्याला शोधावा लागतो. कारण, तो आपल्याला आयुष्याच्या जंजाळातसुद्धा सुखाची प्रेरणा देतो. खऱ्या अर्थाने आपल्या आत्म्याला निरागस आनंद देणाऱ्या या छोट्या-छोट्या गोष्टी आपण कराव्यात हे बरे. या गोष्टी काय असतील? चित्रपट, संगीत, खेळ, कोडी सोडविणे, पुस्तक वाचणे, मित्रांबरोबर सहलीला जाणे. आयुष्य हे काही क्षणांपुरते स्थिरावलेले नाही, ते विकसित होत जाते, बदलत जाते. आपल्या आवडीनिवडी बदलत जातात. त्यानुसार आपण आपल्या आयुष्याची पकड घ्यायला म्हणूनच आपण थोडेसे एक ‘साधारण माणूस’ म्हणून जगायला पाहिजे.
 
मैं ज़िंदगी का साथ निभाता चला गया...
हर फ़िक्र को धुएँ में उड़ाता चला गया...
 
 
- डॉ. शुभांगी पारकर
 
@@AUTHORINFO_V1@@