सिंगापूर ते ऑकलंड व्हाया चेन्नई...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Nov-2020
Total Views |

priyanka Radhakrishnan _1



न्यूझीलंडच्या नवनिर्वाचित सरकारमधील भारतीय वंशाच्या केंद्रीय मंत्री प्रियांका राधाकृष्णन यांच्या आयुष्याची कहाणी सांगणारा हा लेख...


जगातील विकसनशील देशांपैकी एक म्हणून भारताची ओळख आहे. भारतीय वंशांच्या व्यक्तींनी जगभरात आतापर्यंत अनेक क्षेत्रांत कौतुकास्पद कामगिरी केली आहे. आपल्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर अनेक भारतीय व्यक्तींनी परदेशातही अत्यंत महत्त्वाच्या पदांवर काम करण्याची किमया साधली आहे. परदेशांमध्ये स्थायिक झाल्यानंतरही भारतासोबतच्या आपल्या नात्याची नाळ कायम जोडून ठेवत महत्त्वाचे मंत्रिपद मिळवण्यातही भारतीय व्यक्ती यशस्वी झाल्या आहेत. केवळ पुरुषांनीच नव्हे, तर भारतीय वशांच्या स्त्रियाही यात आघाडीवर असून अगदी आपल्या कर्तृत्वाने त्यांनी सातासमुद्रापारही भारताचे नाव उज्ज्वल करण्यात यश मिळवले आहे. न्यूझीलंडमधील विद्यमान केंद्र सरकारमध्ये विविध महत्त्वाच्या मंत्रिपदाच्या जबाबदार्‍या सांभाळणार्‍या भारतीय वंशाच्या मंत्री प्रियांका राधाकृष्णन या त्यांपैकीच एक म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही. न्यूझीलंडच्या विद्यमान पंतप्रधान जेसिंडा ऑर्डन यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळात समाज विकास, शिक्षण आदींसह अन्य विविध महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी प्रियांका राधाकृष्णन यांच्यावर आहे. मूळच्या भारतीय वंशाच्या असणार्‍या प्रियांका राधाकृष्णन न्यूझीलंडमध्येही लोकप्रिय असून त्यांच्या समाजकार्याचे गोडवे सर्वत्र गायले जातात.


प्रियांका राधाकृष्णन यांचा जन्म १९७९ साली चेन्नई येथे झाला. प्रियांका यांचे वडील उच्चपदावर कार्यरत होते. त्यांची बदली केरळामध्ये झाल्यानंतर प्रियांका यांनाही केरळमध्ये जावे लागले. काही वर्षे केरळामध्ये घालवल्यानंतर त्यांचे पूर्ण कुटुंब सिंगापूर येथे स्थायिक झाले. काही वर्षे भारतात शिक्षण घेतल्यानंतर प्रियांका यांनी आपले पुढील शिक्षण सिंगापूरमध्येच पूर्ण केले. सिंगापूर येथे आपले महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर प्रियांका समाजकार्य पदवी अभ्यासक्रमासाठी न्यूझीलंडला आल्या. वेलिंग्टनमध्ये पदवीसाठी आलेल्या प्रियांका या तेव्हापासून इथल्याच झाल्या. त्यांना लहानपणापासूनच शिक्षणाची आवड होती. उच्चशिक्षित होऊन परदेशात जाण्याचे ध्येय त्यांनी लहानपणीच आपल्या उराशी बाळगले होते. आपले हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी लहानपणापासूनच तयारी करण्यास सुरुवात केली. विविध पदव्या संपादन केल्यानंतर त्यांनी वंचितांसाठी समाजकार्य करण्याचा निर्णय घेतला. समाजकार्याचे शिक्षण घेत असतानाच, त्या न्यूझीलंडमधील भारतीय व अन्य स्थलांतरितांच्या संपर्कात आल्या. त्यांचे प्रश्न जाणून घेताना स्थलांतरित कामगार वा नोकरवर्गाच्या समस्या तसेच कौटुंबिक हिंसाचार यांवर लक्ष केंद्रित करण्याचे प्रियांका यांनी ठरवले. ऑकलंड शहरात त्या पूर्णवेळ कामही करू लागल्या. मात्र, समाजातील प्रश्न केवळ व्यक्तींमुळे निर्माण झालेले नसतात, तर धोरणांचे पाठबळ त्यांना नसते हे जाणून घेतल्यानंतर त्यांनी राजकारणाकडे जाण्याचा निर्णय घेतला.


राजकारण त्यांच्या घराण्यातच होते. त्यांचे पणजोबा भारतात डाव्या पक्षाशी संबंधित होते आणि केरळ राज्याच्या निर्मितीत त्यांचे महत्त्वाचे योगदान होते. धोरणे बदलण्यासाठी प्रसंगी संघर्ष केला पाहिजे, हे ओळखून त्या वेळी न्यूझीलंडमधील तत्कालीन विरोधी पक्ष असणार्‍या मजूर पक्षात (लेबर पार्टी) सहभागी झाल्या. मजुरांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला लोकप्रतिनिधी व्हावे लागेल, हे जाणून घेत त्यांनी यासाठी तयारी करण्यास सुरुवात केली. या पक्षात उमेदवार ठरवण्यासाठी ‘गुणवत्ता यादी’ तयार केली जाते. या यादीत २०१४साली प्रियांका २३व्या, तर २०१७सालच्या निवडणुकीत बाराव्या स्थानी होत्या. २०१७ साली पक्षाकडून त्यांना निवडणुकीची संधी मिळाली. मात्र, थोड्याशा मतांनी त्यांचा पराभव झाला. पराभव झाला तरी त्यांच्या कर्तृत्वाची जाण ठेवत, पक्षाने त्यांना इतर कोट्यातून खासदारकी देण्याचा निर्णय घेतला. यंदाच्या निवडणुकीतही अवघ्या ६०८ मतांनी त्यांचा पराभव झाला. मात्र, न्यूझीलंडच्या पक्षनियुक्त खासदार पद्धतीमुळे त्यांना पुन्हा कायदेमंडळात स्थान मिळाले. न्यूझीलंडच्या नव्या पंतप्रधान जेसिंडा आर्डेन यांनी बहुतांश महिला असलेल्या आपल्या मंत्रिमंडळात, जनतेच्या आकांक्षांच्या पूर्ततेसाठी नव्या, तरुण चेहर्‍यांना संधी दिली आहे. समाज विकास, शिक्षण आदी व्यवहारांच्या खात्याची जबाबदारी त्यांच्याकडे देण्यात आली आहे. विद्यार्थी असल्यापासून राजकारण व संघटन कार्यात गुंतलेल्या प्रियांका राधाकृष्णन यांच्यासाठी हे आव्हानात्मक काम आहे. ती जबाबदारी त्या यशस्वीपणे पेलताना पाहणे, ही सर्व भारतीयांसाठी एक अभिमानाची बाब राहणार असून प्रियांका राधाकृष्णन यांना दै. ‘मुंबई तरुण भारत’चा सलाम.



-रामचंद्र नाईक
@@AUTHORINFO_V1@@