कार्तिकी यात्रेत पंढरपुरातील विठ्ठलाचे मुखदर्शनही बंद राहणार

22 Nov 2020 17:02:39

pandharpur_1  H



पंढरपूर :
कार्तिकी एकादशी सोहळा दरम्यान पंढरीत गर्दी होऊन कोरोनाचा प्रसार वाढू नये, यासाठी २५ ते २७ नोव्हेंबर या तीन दिवशी विठ्ठलाच्या मुखदर्शनासाठी आवश्यक असणारे ऑनलाईन पास देखील बंद ठेवण्याचा निर्णय श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती घेतला असल्याची माहिती सहाय्यक अध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली. मात्र, देवाचे नित्योपचार परंपरेनुसार केले जाणार असल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.

शासन आदेशानुसार १६ नोव्हेंबरपासून श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर मंदिर खुले करण्यात आले आहे. विठ्ठलाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी होऊ नये. यासाठी दर्शन पासची ऑनलाईन बुकिंग आवश्यक करण्यात आले आहे. त्याचबरोबर दिवसभरात मोजक्याच भाविकांना विठ्ठलाचे दर्शन घेता येणार आहे. असे असले तरी पंढरपूरमध्ये कार्तिकी यात्रेच्या पार्श्वभूमीवर २५ व २६ नोव्हेंबर संचार बंदी करण्यात आली आहे. यामुळे २५ ते २७ नोव्हेंबर पर्यंत मुखदर्शन देखील बंद करण्यात आले असल्याचे मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी व सहाय्यक अध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितले.

कार्तिकी एकादशीची शासकीय महापूजा २६ नोव्हेंबरला पहाटे २ वाजून २० मिनिटांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या पत्नीच्या हस्ते होणार आहे. तर मानाचा वारकरी म्हणून मंदिरातील ६ विणेकऱ्यांपैकी एकाची चिठ्ठी काढून तो मान दिला जाणार आहे. २३ आणि २४ नोव्हेंबरला विठ्ठल-रुक्मिणीचं मुखदर्शन सुरु असणार आहे. त्यासाठी ऑनलाईन दर्शन पासची व्यवस्थाही सुरु आहे. तर २५ ते २७ नोव्हेंबर दरम्यान बंद असलेले मुखदर्शन पुन्हा २८ नोव्हेंबरपासून सुरु करण्यात येणार असल्याची माहितीही मंदिर समितीने दिली आहे.
Powered By Sangraha 9.0