सर्वसामान्यांसाठी `लोकल`प्रवेश लांबणीवरच !

    दिनांक  21-Nov-2020 17:33:58
|

local_1  H x W:मुंबई :
कोरोना लॉकडाऊननंतर मंदिरे आणि शाळा सुरू झाल्याने सर्वसामान्यांसाठी लोकल सुरू होण्याबाबत आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र सध्या कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर शाळा सुरू करण्याचा निर्णय स्थगित झाला असतानाच सर्वसामान्यांसाठी लोकल प्रवेशही लांबणीवर पडला आहे.

दिवाळीनंतर शाळा सुरू करण्याचा शासनाने निर्णय घेतला होता. सोमवार २३ नोव्हेंबरपासून नववी ते बारावीचे वर्ग सुरू होणार होते. मात्र कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर शाळा सुरू करण्याचा निर्णय शुक्रवारी अचानक स्थागित करण्यात आला. आता मुंबईतील शाळा ३१ डिसेंबरपर्यंत बंदच राहणार आहेत. त्यानंतर परिस्थिती पाहून निर्णय घेण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे सर्वमासान्यांना लोकलमध्ये प्रवेश देण्याचा निर्णयही लांबणीवर पडणार आहे. मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी प्रसार माध्यमांना माहिती देताना सर्वसामान्यांसाठी लोकल प्रवेश लांबणीवर पडणार असण्याच्या शक्यतेला दुजोरा दिला.

दिल्लीमध्ये करोनाचे रुग्ण पुन्हा एकदा वेगाने वाढत आहेत. दिल्लीपाठोपाठ मुंबईत, पुणे आणि नागपूरमध्येही परिस्थिती नियंत्रणात असली तरी चिंताजनक होताना दिसत आहे. मुंबईत ऑक्टोबरपासून आटोक्यात आलेला कोरोना दिवाळीनंतर पुन्हा विळखा घालताना दिसत आहे. त्यामुळे कदाचित दुसरी लाट येण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. त्यातच मुंबईत अत्यावश्यक सेवेसाठी असलेली लोकल सेवा सर्वसामान्यांसाठी सुरू केली तर ते कोरोनाच्या प्रसारासाठी पोषकच ठरणार आहे. लोकलमध्ये होणारी गर्दी लक्षात घेता कोरोनासंसर्गीतांची संख्या वेगाने वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आहे. त्यामुळे सध्या तरी सर्वसामान्यांसाठी लोकलसेवा सुरू होण्याची शक्यता नाही. परिणामी सर्वसामान्य चाकरमान्यांना अजून काही दिवस रस्ते वाहतुकीवर अवलंबून राहावे लागणार आहे.मुंबईसाठी पुढील तीन ते चार आठवडे खूप महत्त्वाचे आहेत. मात्र, मुंबईत कोणत्याही प्रकारचे निर्बंध लागू करण्यात येणार नाही. तीन ते चार आठवड्यानंतर परिस्थितीचा आढावा घेण्यात येईल. त्यानंतरच निर्णय घेतला जाईल. स्वीमिंग पूल, शाळा आणि रेल्वे सेवा सुरू करण्यासंदर्भात नियोजन करण्यात आले होते. मात्र, आता या तिन्ही गोष्टी बंद राहतील. इतर ठिकाणावर सध्या कोणताही परिणाम होणार नाही, असे चहल यांनी स्पष्ट केले.


धोका नको म्हणून...


सोमवारपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्याबाबत पूर्वतयारीही झाली होती. मात्र कोरोना संसर्गितांच्या वाढत्या संख्येमुळे मुलांना धोका पोहोचू नये म्हणून आणखी काही दिवस शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पालिका प्रशासन नेहमीच बिकट परिस्थितीवर मात करण्यासाठी योजना आखते आणि चांगले करण्याचा विचार करते. त्यामुळे एकाही मुलाला धोको पोहोचता कामा नये यासाठी आम्ही आणखी काही दिवस शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. सध्या शाळा बंद आहेत आणि आणखी काही दिवस बंदच राहतील. शाळा सुरू होत्या आणि त्या बंद करण्याचा निर्णय घेतला, असे घडलेले नाही, असे आयुक्तांनी स्पष्ट केले.

शिक्षक-शिक्षकेतरांना परवानगी


दरम्यान माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षांच्या पार्श्वभूमीवर रेल्वे मंत्रालयाने शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना १० डिसेंबर २०२० पर्यंत मुंबई उपनगर रेल्वेने प्रवास करण्याची मुभा दिली आहे. शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी त्यांचे अधिकृत ओळखपत्र सोबत बाळगणे आवश्यक आहे. तसेच विद्यार्थ्यांनी त्यांचे हॉलतिकीट सोबत बाळगणे आवश्यक आहे. शिवाय कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तोंडाला मास्क, सोशल डिस्टन्सिंग यांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.