मला भावलेले नाह...

    दिनांक  21-Nov-2020 21:29:15
|

N H Apte_1  H x
 
 
 
केदार गाडगीळ हे त्यांचे आजोबा आणि ज्येष्ठ मराठी साहित्यिक ना. ह. आपटे यांचे चरित्रलेखन करीत आहेत. त्यांच्यावरील अभ्यास करताना त्यांना जे ना. ह. आपटे भावले, त्यावरून त्यांनी त्यांचे व्यक्तिचित्रण साकारले आहे. दि. १४ नोव्हेंबर १९७१ रोजी आपटे यांचे निधन झाले. तेव्हा त्यांच्या नुकत्याच झालेल्या पुण्यतिथीनिमित्त नाहंचे शब्दबद्ध केलेले हे व्यक्तिचित्रण...
 
 
नाहंवर त्यांचे वडील, वहिनी, सातारा न्यू इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक देवधर गुरुजी, जयपूर येथील वीरेश्वर शास्त्री द्रविड आणि जयपूर महाराजा ग्रंथालयाचे ग्रंथपाल यांचा प्रभाव होता. याच लोकांकडून सभ्यता, नम्रता आणि शिष्टाचार ते शिकले. देवधर गुरुजींनी पुनर्विवाह केलेला होता. स्त्री-शिक्षणाबाबतचे विचार आणि समाजसुधारणेची उदार दृष्टी, नाह देवधर मास्तरांकडून शिकले.
 
 
श्रीकृष्ण, शिवाजी महाराज आणि लोकमान्य टिळक ही नाहंची दैवते. ‘गीतारहस्य’चा नाहंवर प्रभाव असल्याने त्यांनी त्याचे सखोल वाचन केले होते. त्यांना ‘गीतारहस्य’च्या वाचनाने उद्योगी व नम्र होण्यास शिकविले. “ज्ञानी माणसे गर्व न करता आपण किती अज्ञानी आहोत हे शोधावे म्हणजे नम्रता टिकून राहते,” असे ते म्हणत (अमृत मे १९७२, वि. वि. भागवत).
उंच अंगकाठी, शेलाटी शरीरयष्टी, सावळा वर्ण, मोठे कपाळ, हाताची लांबसडक बोटे, बसकी गालफडे, लांबट उभा चेहेरा, उंच मान, खोलगट व विचारशील असे पिंगट रंगाचे डोळे, असे नाहंचे वर्णन करता येईल. साधासा गळाबंद पूर्ण बाह्यांचा शर्ट आणि धोतर, डोक्यावर संघाची काळी किंवा तपकिरी टोपी. कानामध्ये हमखास ठेवलेला हीना अत्तराचा फाया, असा त्यांचा पेहराव असे.
 
 
त्यांचा स्वभाव शांत होता. बोलणे माफक आणि थोडेसे तुटक असल्यामुळे काही वेळा गैरसमज होत असत. नंतर ते गैरसमज विरून जात असत. त्यांचे अक्षर मोत्यासारखे सुंदर. त्यांचा पत्रव्यवहारही खूप दांडगा होता. पत्र आले की, वाटे जणू ते आपल्याशी बोलत आहेत. प्रेमळ आणि मृदू स्वभाव ही त्यांची वैशिष्ट्ये. दुसर्‍याला मदत करणे त्यांचा स्वभाव होता. दुसर्‍या व्यक्तीस आपल्याकडून काही त्रास होऊ नये, यासाठी ते विलक्षण काळजी घेत. वाईट होऊ नये आणि वाईट घडू नये, या पद्धतीने जगण्याची ते काळजी घेत असत. वडिलांनी त्यांच्या मनाची चांगली जोपासना केली असल्यामुळे आणि स्वभावाची ठेवण चांगली असल्याने त्यांना देशाटनावेळी कोणतेही व्यसन लागले नाही. (सौदामिनी पाटील प्रबंध, पान २)
 
 
नाह यांचा कनवाळूपणा
 
 
साधेपणा हा त्यांचा स्थायीभाव असला तरी ते मनाने खंबीर आणि करारी होते. आर्थिकदृष्ट्या ते गरीब होते. पण, पैशाची हाव नव्हती. दारिद्य्र असतानाही दुसर्‍याला मदत करावी हा त्यांचा स्थायीभाव होता. त्यासाठी योग्य ती हृदयाची श्रीमंती त्यांच्या जवळ होती. या त्यांच्या स्वभावामुळे, त्यांनी गडकरी, शांताराम आठवले आणि दादासाहेब फाळके यांना मदत केली आहे. ही काही वानगीदाखल उदाहरणे आहेत.
 
 
गडकरी
 
 
नाहंनी मदत करायची इच्छा राम गणेश गडकरी यांच्या शेवटच्या काळात केली आहे. त्या वेळी राम गणेश गडकरी अंथरुणावर पडून होते. गडकरी यांना इन्फ्लुएंझा झाला होता. त्यामुळे गडकरी यांना, “कोरेगावी येऊन माझ्याकडे राहा,” अशी विनंती दि. १ मे, १९१८ ला पत्र पाठवून केली आहे (अप्रकाशित गडकरी संपादन प्र. के. अत्रे, पान १४१).
 
 
दादासाहेब फाळके
 
 
‘गंगावतरण’हा बोलपट पूर्ण झाल्यानंतर, चित्रपटसृष्टीतील फाळके व अन्य भागीदारातील मतभेदांमुळे दादासाहेबांच्या मनाला खूप ताण आला होता. त्यांच्या मनाला शांतता मिळावी म्हणून विश्रांतीसाठी १९३९ मध्ये नाहंनी कोरेगावला आणले होते. तेथे दादासाहेब आपल्या कुटुंबासमवेत जवळपास एक वर्ष राहिले होते. नाह मुलींना किंवा पत्नीस हाक मारताना आदरपूर्वक उल्लेख करत असत. पुरुषी ऐदीपणा किंवा अरेरावीवृत्ती त्यांच्या वागणुकीत कधीही दिसायची नाही. स्वयंपाकघरातील किंवा इतर गृहकृत्ये ते अगदी उत्तम तर्‍हेने पार पाडीत असत. पाकसिद्धीत ते एखाद्या सुगृहिणीलाही हार मानावयास लावतील. छापखान्यातून घरी येताच भाकर्‍या झाल्या नसल्यास ते तोंडाची वाफ न दवडता, चुलीचा चार्ज घेऊन फर्मास अशा भाकर्‍या बनवतील की जणू चुरचुरीत लघुकथाच. (ध्रुव मे १९३६ शांताराम आठवले)
 
 
रात्रीचे जेवण सर्वांनी मिळून एकत्र घ्यायचे, असा त्यांचा परिपाठ होता. जेवण करताना ते मुलींशी गप्पागोष्टी करत, स्वत:चे विविध अनुभव सांगत. मुलींचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून ते दक्ष असत. काही वेळा त्यांना कडक पित्याची भूमिकाही घ्यावी लागे. ते शिस्तीचे भोक्ते होते, तरी ते प्रेमळ पिताही होते. कौतुकाच्या प्रसंगी अभिमानाने पाठीवर प्रेमाची थाप देणारे होते. आनंदाच्या प्रसंगी त्यांनी मुलींचा आनंद वाढविला, तर हुशारीच्या वेळी शाबासकी दिली, तर दु:खाच्या वेळी व्यथित झालेला थरथरणारा, कृश, पण प्रेमळ धीर देणारा त्यांचा हात मुलांवरून फिरत राही. ते म्हणायचे, “अपयश केवळ जगाची ओळख करून देत नाही, तर आपलाही ‘कस’ ते घासून पाहते. आपली निष्ठा, आपली श्रमशीलताही पणाला लागते. थोडक्यात आपले चारित्र्य चांगले असेल, तर अपयश अद्भुतरम्य आहे यात शंका नाही.” (मंगल पटवर्धन, आठवणी, २००३)
 
 
गीतेतील श्लोक, ‘सुख-दुःखे समे कृत्वा लाभालाभौ जयाजयौ’ असे त्यांचे वागणे बोलणे होते. जय-पराजय, लाभ-हानी आणि सुख-दुःखाला समान मानून त्यांनी स्वतःचा संसार केला आणि चरितार्थ चालविला. गीतेप्रमाणेच महाभारत, रामायण, दासबोध इ. प्राचीन व अर्वाचीन धार्मिक ग्रंथांचा सखोल अभ्यास, देशाचे प्राचीन वैभव व सद्यःस्थिती आणि त्याबरोबरच पाश्चात्त्यांची विलक्षण प्रगती यांच्या विरोधी चित्राने होणारी हृदयाची तगमग, स्वदेश, स्वभाषा, स्वसंस्कृती या विषयी जाज्वल्य अभिमान, एकीकडे जबरदस्त महत्त्वाकांक्षा, विशाल बुद्धिमत्ता व याच्याउलट दारिद्य्राने केलेला पाठपुरावा व प्रतिकूल परिस्थितीने केलेला दारुण छळ, या सर्व गोष्टी ध्यानात घेऊन मगच त्यांच्या स्वभावाकडे आणि वाङ्मयाकडे पाहिले पाहिजे. त्याखेरीज कित्येक गोष्टींचा उलगडा होणार नाही. (ध्रुव, १९३६, शांताराम आठवले).
 
 
मन:स्थिती-मनमुराद हसत, थट्टाविनोद सुटलेले नाहीत, उगीच लांबट चेहरा करून बसत नाही. कल्पनाशक्ती बोथट झालेली नाही. मनाने मी दिलदार आहे. आधी दुसर्‍याची सोय, सुख, व्यवस्था मी यथाशक्ती पाहतो. एकट्याने खाणे-पिणे, मौज करणे मला आवडत नाही, साधत नाही. असे असूनसुद्धा लक्ष्मीच्या अवकृपेमुळे शिष्टाचार पाळता येत नाहीत, याचे वाईट वाटते. लोक म्हणतात, ‘पक्का कोकणस्थ आहे’ हे मनाला फार लागते. पण, द्रव्याची टंचाई असली की, मनासारखी दिलदारी दाखवता येत नाही. रडका स्वभाव नसल्यामुळे लोकांना हे आतील चित्र दिसत नाही. त्यामुळे तुसडेपणाचा, अहंकाराचा, स्वार्थीपणाचा दोष पदरी येतो, मोठे वाईट वाटते. पण, करणार काय? हसून घालवतो. (मनोहर, ऑगस्ट १९६४, शांताराम आठवले).
 
 
रोज पहाटे ब्रह्ममुहूर्तावर ३ वाजता उठून नित्यकर्मे आवरले की लेखन करणे, पत्रव्यवहार करणे, विहिरीचे पाणी शेंदून (उपसणे) डोणीत (दगडी भांडे) भरून ठेवणे. साधारणपणे ६च्या दरम्यान दूरवर आठ-दहा किमी फिरायला जाऊन निसर्गाच्या सान्निध्यात रमणे. घरी आल्यावर बागकाम, वाफ्यांची स्वच्छता, विहिरीचे पाणी काढून झारीने सर्व फळाफुलांच्या झाडांना घालणे किंवा गुरांच्या गोठ्यातील कामे करणे. नंतर थंड पाण्याने अंघोळ करून चहा-नाश्ता सर्व कुटुंबाबरोबर घेणे. चहा घेताना घरातील सर्वांशी गप्पा मारणे. गुलमोहराच्या झाडाखाली थोडावेळ विश्रांती घेणे. दुपारचे जेवणही अगदी हलके फुलके. कधीही ढेकर येईपर्यंत जेवण नाही. जेवण झाल्यावर अंमळ विश्रांती. विश्रांती नंतर सरूबाईंशी (पत्नी) लिहित असलेल्या कादंबरीवर चर्चा करणे. पुन्हा संध्याकाळ मित्रांच्या सान्निध्यात घालविणे किंवा कुटुंबीयांच्या बरोबर गुलमोहराखाली कट्ट्यावर बसून गप्पा मारणे. रात्रीचे जेवण न करता, सूर्यास्तानंतर काही वेळाने फक्त मिताहार किंवा कपभर दूध पिणे. नंतर वाचन करणे. पुरेशा कालावधीनंतर झोपावयास जाणे, असा त्यांचा सर्वसाधारण दिनक्रम होता, असे म्हणता येईल.
 
 
उद्योजक म्हणून उभे राहताना त्यांच्याजवळ दुर्दम्य आशावाद, गगनाला गवसणी घालणारी महत्त्वाकांक्षा, कार्यतत्परता, कष्टसहिष्णुता आणि जीवंत प्रामाणिकपणा हे गुण त्यांनी जोपासले आहेत. (नारायण हरी आपटे वाङ्मय सूची, पान २).
 
 
मराठीमध्ये कथा-कादंबरीकार आणि ऐतिहासिक कादंबरी लेखन केलेल्या साहित्यिकांच्या परंपरेतील एक मानाचे पान म्हणून नाहंकडे पाहता येईल. वाचकांना सहज समजेल अशी भाषा, विनाकारण लालित्याचे अथवा शाब्दिक फुलोरे नसलेले त्यांचे लेखन वाचकाला बांधून ठेवण्यात यशस्वी होत असे. नारायण हरी आपटे (१८८९-१९७१), सहकारी कृष्ण (१८८६-१९१६) असे आणखी काही थोड्या वेगळ्या प्रकृतीचे कादंबरीकार या कालखंडात आढळत असले, तरी त्यांच्या कादंबरी लेखनामागील महत्त्वाची प्रेरणा बोधवादाचे बाळकडू देण्याची आहे.
 
 
या काळातील अशा कादंबरीवर वाचक लुब्ध होता, याचे आणखी एक कारण म्हणजे तिच्या रचनेतील चातुर्य. या चातुर्यामुळे खर्‍याखुर्‍या, अस्सल जीवनानुभूतीतून स्फुरलेली कादंबरी आणि ही कल्पनारम्य कादंबरी यात सकृतदर्शनी कोणताही फरक जाणत्या, सुबुद्ध वाचकांनाही जाणवत नसे. दैनंदिन जीवनाचे दर्शन घडविणारा कादंबरीचा उपप्रकार शोधला. सहसा मध्यमवर्गीयांच्या जीवनात घडणार्‍या प्रसंगावर आधारित ते लिहित. (पाच ते पाच, वेटिंग रूम). Encyclopaedia of Indian Cinema Ashish Rajadhyaksha, Paul Willemen, पान ४४).
 
 
सोज्वळ, सात्त्विक आणि सकस लिखाण करणारे कादंबरीकार, असे त्यांचे वर्णन करता येईल. नीतिबोधासारखा उदात्त हेतू मनात ठेवून सात्त्विकवृत्तीने बाळबोध वळणाच्या पण कथानक प्रधान कादंबर्‍या आपटे यांनी लिहिल्या आहेत. देशहित आणि समाजहित हे त्यांच्या लेखनाचे विषय आहेत. त्यांच्या कादंबर्‍यातील नायक-नायिका समाजात वावरताना त्या काळात सहजपणे दिसत होत्या, हे त्यांच्या लिखाणाचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. उदाहरणार्थ, ‘न पटणारी गोष्ट’ मधील काकासाहेब, ‘त्या अबला होत्या’ मधील संकटात आल्यावर हातपाय गाळून बसणारा नवरा आणि चार कामं करून संसार सावरू पाहणारी त्याची बायको (हे चित्र आजही आपण बघतो), ‘उमज पडेल तर’मधील त्र्यंबकराव मास्तर आणि कमल, ‘जाऊबाई’मधील कुसुम, ‘आम्ही दोघं’मधील माधव व त्याची पत्नी सुंदर ही पात्रे त्या काळात समाजात वावरताना दिसत असत. मराठी कादंबरी सुटसुटीत करण्याचे पहिले प्रयत्न केले आपटे यांनी. त्यांच्या कादंबरीमधील संवाद अगदी आपण घरी बोलतो तसेच असायचे. त्यात कोठेही कृत्रिमपणा किंवा अलंकारिक भाषा नसायची, त्यामुळे त्या कादंबर्‍या वाचताना आपल्या आहेत, अशी भावना व्हायची. (वि. ग. कानिटकर, एकता, जानेवारी १९७०)
 
 
खेडेगावात एकाकी राहून आपल्या लेखनाच्या बळावर समाजाच्या स्थैर्यासाठी, व्यक्तीच्या विकासासाठी त्यांनी जी साहित्य साधना केली, ती अवर्णनीय आहे. हे कार्य अखंड करीत राहणे हा त्यांच्या जीवनाचा जणू स्थायीभाव होता, सूत्र होते आणि तळमळही होती. सामाजिकदृष्ट्या पाहता पिढी बदललेली होती. समाजाचे मानसिक आरोग्य चांगले राहावे, अशा काही बोधदायक हेतूने ललित साहित्य लिहणार्‍यांविषयी वाचकांची आस्था हळूहळू कमी होत चालली होती. त्यामुळे नारायण हरी मागे पडले असावेत. (‘नारायण हरी आपटे, एक पत्रबंध’: जयंत वष्ट, ललित नोव्हेंबर- डिसेंबर २०१२ पान११७-१२२).
 
 
हरीभाऊंच्या काळातील सामाजिक आशयाचा या काळातील प्रवाह नारायण हरी आपटे, आनंदीबाई शिर्के, वा. ना. देशपांडे यांनी पुढे चालू ठेवला. ऐतिहासिक आणि रहस्यकथांचा त्यांचा वारसा ना. ह. आपटे यांनी चालविलेला दिसतो. १९१५-१९२५ या कालखंडातील दुसरे महत्त्वाचे लेखक म्हणजे ना. ह. आपटे. त्यांची भूमिका उपदेशप्रधान असल्यामुळे त्यांच्या कथासृष्टीवर बोधवादाची छाप आहे. मध्यमवर्गीय जीवनातील विविध छटा आपल्या कथांतून रंगवून कौटुंबिक जीवनातील आदर्श ते समाजापुढे ठेवू पाहतात. ‘बनारसी बोरे’, ‘आराम-विराम’, ‘हसा किंवा रुसा’, ‘कोंडाकणी’, ‘पाणी व शेवाळ’ हे त्यांचे कथासंग्रह. पाहिले तर सत्याचा विजय व असत्याचा पराभव हे सूत्र त्यांच्या कथात आढळते. प्रा. म. ना. अदवंत म्हणतात, “त्यांचा दृष्टिकोन प्रामुख्याने उपदेशप्रधान आहे. जुनी मूल्ये, जुने कौटुंबिक संस्कार व जीवनातील आदर्श यांचे वर्णनही यांच्या कथेत येते. कौटुंबिक घटना आणि प्रसंग हा त्यांच्या कथालेखनाचा मुख्य गाभा असून, त्यांच्या कथेतील जीवन पांढरपेशे व मध्यमवर्गीयांचेच वाटते. कथेची भाषा अत्यंत साधी, संवाद आणि प्रसंगही जेमतेमच असून क्वचित विनोद त्यांनी केलेला दिसतो.”
 
 
त्यांनी साहित्य सरस्वतीची सेवा अर्धशतक केली. त्यांनी मुख्यत: सामाजिक कादंबर्‍या व थोड्या ऐतिहासिक कादंबर्‍यांचे लेखन केले असले, तरी लघुकथा, निबंध यांसारखे साहित्यप्रकारही हाताळले आहेत. तसेच त्यांचे वैचारिक लेखनही प्रकाशित झाले आहे. त्यांनी जवळपास १०० कादंबर्‍या लिहून मनोरंजनाबरोबर समाज प्रबोधन केले आहे. ‘न पटणारी गोष्ट’ या कादंबरीवर ‘कुंकू’ (मराठी) किंवा ‘दुनिया न माने’ (हिंदी)हे चित्रपट निघाले, ‘सुखाचा मूलमंत्र’, ‘पहाटेपूर्वींचा काळोख’, ‘उमज पडेल तर’, ‘एकटी’ या त्यांच्या काही प्रसिद्ध सामाजिक कादंबर्‍या होत. त्यांच्या ऐतिहासिक कादंबर्‍यापैकी ‘अजिंक्यतारा’, ‘संधिकाल’, ‘लांच्छित चंद्रमा’ आणि ‘रजपूतांचा भीष्म’ या विशेष उल्लेखनीय आहेत. ‘आराम-विराम’ आणि ‘बनारसी बोरे’ हे त्यांचे कथासंग्रह आहेत. याशिवाय ‘गृहसौख्य’, ‘आयुष्याचा पाया’, ‘कुर्यात सदा मंगलम’ यांसारख्या ग्रंथांतून, संसार सुखाचे मूलभूत सिद्धांत, वैवाहिक नीती, गृहस्थाश्रम, तरुण विद्यार्थ्यांचे आदर्श वर्तन इ. विषयांसंबंधी विवेचन त्यांनी केले आहे. त्यांनी सारेच लेखन बोधवादी भूमिकेतून केलेले आहे. त्यांची शैली प्रासादपूर्ण आणि प्रसन्न आहे. समाजातील असंख्य लोकांना ‘सुखाचा मूलमंत्र’ सांगणारे हे थोर साहित्यमहर्षी ठरतात.
 
 
बेताचे शिक्षण, स्वाभिमानी वृत्ती, आर्थिक परिस्थितीमुळे बनलेला एकांतप्रिय स्वभाव आणि संकोची वृत्ती, त्यामुळे पुढे पुढे करणे, सभा-संमेलनात दिसणे हे त्यांच्याकडून व्हायचे नाही. केवळ लेखन हेच ध्येय ठेवल्यामुळे विपुल असे साहित्य त्यांनी निर्माण केले आहे. संख्या मोजली तर त्यांची १०० एक पुस्तके प्रकाशित झाली आहेत.(परिशिष्ठ क्र. १).
 
 
‘हरी नारायण आपटे’ व ‘नारायण हरी आपटे’ यांच्यातील नामसदृशामुळे अनेक वेळा चांगल्या जाणकारांनीसुद्धा दोघांचे नातेसंबंध असून, नारायण हरी आपटे हे हरी नारायण आपटे यांचे चिरंजीव आहेत, अशी चुकीची समजूत करून घेतली आहे. पण, साहित्यिक दृष्टीने नारायण हरी आपटे हे हरी नारायण आपटे यांचे सुपुत्र आहेत, असे मानण्यास वाव आहे. हरीभाऊंचीच साहित्यपरंपरा नाहंनी चालविलेली आढळते. हरीभाऊंप्रमाणेच विशाल साहित्यनिर्मिती करून त्यांनी मराठी वाचकांसमोर ठेवली आहे. साहित्यसम्राट न. चिं. तथा तात्यासाहेब केळकर यांनी करून दिलेला परिचय पुढीलप्रमाणे आहे. आपटे हे कोरेगाव सारख्या एका बाजूच्या लहानशा गावी राहून छापखाना व वाड्.मय या साधनांनी आपली उपजीविका करीत राहिले. यामुळे त्यांच्या साहित्याची थोडीबहुत उपेक्षा झाली, असे म्हणण्यास हरकत नाही. तसे पाहिले तर त्यांच्या अनेक पुस्तकांच्या अनेक आवृत्त्या निघाल्या. यावरून वाचकवर्गाने तरी त्याची उपेक्षा केली नाही हे खास. परंतु, ‘उपेक्षा’ हा शब्द या अर्थाने मी योजू इच्छितो की, पुण्या-मुंबईसारख्या शहरी ते राहते, तर लोकदृष्ट्या ते प्रमुख साहित्यिकाच्या मेळ्यात वावरताना जितके दिसते असते, तितके ते एका बाजूस पडल्यामुळे दिसले नाहीत. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाकरिता जी नावे प्रायः सुचविण्यात येतात, त्यात त्यांचा समावेश होण्यासारखाच होता. आपटे यांचे वाड्.मय ललित या प्रकारापेक्षा बोधप्रद या प्रकाराकडे अधिक झुकते. यामुळे आजकालच्या झगझगीत कादंबर्‍या वाचल्याने तरुण वाचकवर्गाच्या मनावर जी छाप पडल्याचे आपण पाहतो, ती त्याच्या वाड्.मयाने पडत नसावी, असे मला वाटते. परंतु, त्यांचे वाड्.मय बोधप्रदतेच्या हेतूने लिहिले असले तरी त्यात त्याची प्रज्ञा व प्रतिभा म्हणजे ज्ञान व ते प्रगट करण्याची कला ही विचारी मनाला मान्यच करावी लागते. ते अगदी सनातनी नसले, तरी आधुनिकात आधुनिक असे जे नागरजीवन, त्याचे आकर्षण त्यांच्या बुद्धीला फारसे वेधू शकत नाही. महाराष्ट्र समाजातील जुन्या जीवनात जे सद्गुण आढळतात ते स्थायी व्हावे, हे ध्येय त्यांनी आपल्या वाड्.मयात डोळ्यापुढे ठेवलेले दिसते आणि या दृष्टीने त्यांनी आपल्या कादंबर्‍यांद्वारे पुष्कळच यश मिळविले, असे निश्चितच म्हणता येते. तथापि, प्रतिभेच्या गुणाने वाड्.मयाचे जे प्रकार लेखकाला सुचतात, तेही त्यांनी हाताळले आहेत. यामुळे त्यांच्या लघुकथा व कादंबर्‍या यातून गुप्त अभिप्रायात्मक थट्टेखोर बहाणेदार अशीही कथानके आढळतात. त्याची भाषा साधी सोपी असून, तीत पांडित्य प्रदर्शनाचे अवडंबर नाहीच म्हटले तरी चालेल. तथापि, चांगल्या साहित्यिकाच्या गणनेच्या दृष्टीने मी, जेव्हा महाराष्ट्रभर नजर फिरवितो, तेव्हा कोरेगावावर ती काही काळ खिळून राहते, यात शंका नाही. (‘कोंडाकणी लघुकथा संग्रहा’ची प्रस्तावना)
नाहंवर हरीभाऊ आपटे आणि राम गणेश गडकरी यांचा प्रभाव पडलेला दिसतो. तसेच नाहंच्या वाङ्मयाचा परिणाम ब. ल. वष्ट (ब. ल. वष्ट : एक जीवनप्रवास पान २४), स्नेहलता दसनूरकर (भाग्यश्री-संक्षिप्त कादंबरी प्रस्तावना) या लेखक मंडळींवर झाल्याचेही त्या लेखकांनी म्हणले आहे.
 
 
जरी ते सातारा साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष झाले, तरी मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष मात्र होऊ शकले नाहीत आणि लक्ष्मीच्या दरबारात मात्र त्यांची उपेक्षाच झाली, ही खंत व्यक्त करावी वाटते.
 
 
‘पहिल्या मानाची मोहर’ नाह आपटे यांच्या नावावर उमटते. त्या घटना खाली दिल्या आहेत.
 
 
> ‘अमृतमंथन’ चित्रपट रौप्य महोत्सव
 
> ‘पंजाबचा लढवय्या शीख’ही शीख इतिहासावरील पहिली मराठी कादंबरी
 
> ‘किर्लोस्कर खबर’ या मासिकाचे आद्य सह-संपादक
 
> ‘स्वदेशी औद्योगिक प्रदर्शन’ भरवावे ही आगळीवेगळी कल्पना त्यांनी मांडली आहे. (जानेवारी १९२५ किर्लोस्कर खबर)
 
> कादंबरीवरून पहिला सिनेमा : नारायण हरी आपटे यांच्या ‘लांच्छित चंद्रमा’ या कादंबरीवरून १९२५ साली ‘राणा हमीर’ या बाबूराव पेंटर दिग्दर्शित चित्रपटाची निर्मिती झाली आहे.
 
> भारतात शास्त्रीय विषयांवरील चित्रपट निर्माण व्हावेत हा विचार मांडला (१९३६).
 
> ‘सावकारी पाश’ (१९३६) हा चित्रपट मराठीतील पहिला बोलपट म्हणून ओळखला जातो.
 
> ‘कुंकू’ हा भारतातील पहिला सामाजिक बोलपट १९३७ साली प्रदर्शित झाला. (‘कुंकू’ची हिंदी आवृत्ती ‘दुनिया न माने’ हा सिनेमा व्हेनिस आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात १९३८ साली दाखवला गेला. त्या सालचे सर्वोत्तम हिंदी चित्रपटाचं ‘गोहर गोल्ड मेडल’ या चित्रपटास मिळालं होतं.)
 
> ‘न पटणारी गोष्ट’ ही कादंबरी हिंगणे शिक्षण संस्थेतील मुलींना स्थूल वाचनासाठी होती.
 
 
- केदार गाडगीळ
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.