एक ध्येयव्रती : अशोकजी सिंघल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Nov-2020
Total Views |

ashok singhal_1 &nbs


संघाच्या अमृतवेलीला लागलेले हे 'अशोक' नावाचे श्रीराम चरणी अर्पण झालेले फळ रसाळही निघाले आणि गोमटेही. अशोकजींच्या १७ नोव्हेंबर रोजी झालेल्या पुण्यतिथीनिमित्त हे पुण्यस्मरण...
 
 
“काय करू इंजिनिअर बनून?” अकरावी-बारावीच्या काळात २००५-०६च्या सुमारास म्हणजे साधारण १४ वर्षांपूर्वी मी, आईला विचारलेला हा प्रश्न.
 
“काही नाही, तुला आवडेल ते कर. परिस्थितीने आम्हा दोघांना संधी नाही दिली. एकच मुलगा तो शिकला, गव्हर्नमेंट कॉलेजमधून इंजिनिअर झाला की, मध्यमवर्गातल्या कुटुंबाला थोडं समाजात वावरताना बरं वाटतं म्हणून कर.”
 
कमी-अधिक फरकाने हीच परिस्थिती बऱ्याच घरात अगदी आजही आहेच, गमती-जमतीत आपण म्हणतो, हल्ली काय पुण्या-बंगळुरूला दगड फेकला तरी इंजिनिअरलाच लागतो. पण, तरीही IIT, NIT, BHU अशा संस्थांची 'क्रेझ' आहेच आणि काही प्रमाणात डोक्यात थोडं वेगळेपण निर्माण करणारं ते वातावरण असतंच.
 
ज्यांचे कशात काही नाही, अशी बरीच गर्दी आईबापाच्या जीवावर 'टिमकी' मारत फिरते, गावाकडची जमीन विकून कर्जतला, ताथवड्याला दोन-तीन बीएचके बुक केला हे अभिमानाने सांगणारी मंडळी आहेत. त्या तुलनेत तर हे वेगळेपण जरूर आहेच, उगीच का नाकारावे?
 
साधारण ८०-८५ वर्षांपूर्वी काय परिस्थिती असेल हो? त्या काळच्या एका मोठ्या अधिकाऱ्याचा मुलगा. बीएचयूचा इंजिनिअर असलेल्या अशाच एका मुलाला जगातले कुठले सुख मिळाले नसते? पण, ते सगळं सोडून अशोक नावाचा एक पोरगा संघाचा प्रचारक म्हणून निघतो आणि आयुष्यभर एका ध्येयासाठी काम करतो काय आणि अगदी शेवटपर्यंत, कुठल्याही अपेक्षेशिवाय आणि हे वेगळेपण आहेच! 'गेलं खूप, Monotonous आहे हो, Growth नाही' च्या जगात तर आहेच आहे. आता कोरोना आहे म्हणून, पण मोठ्या-मोठ्या ऑफिसेसमधील 'So Called Executive' लोक वृक्षारोपण करताना माती हाताला लागू नये म्हणून हातमोजे वापरतात अशा दुनियेत, अशोकजींनी प्रभू श्रीरामचंद्रांसाठी सांडलेल्या रक्ताची किंमत कोण लावणार?
 
श्रीराम आणि रावण या संघर्षामध्ये रावण पैसा, संपत्ती, ताकद, बुद्धी, शक्ती, भक्ती सर्वच बाबतीत मोठा होता. पण, तरीही प्रभू श्रीरामचंद्र यांचा विजय झाला. त्याचं कारण म्हणजे, त्यांचे चारित्र्य आणि चरित्र या प्रभू श्रीरामचंद्रांची सातत्याने सफलतापूर्वक राष्ट्रहित आणि समाजहित डोळ्यासमोर ठेवून उपासना करणाऱ्या आणि तेच आदर्श समाजात रुजावेत म्हणून कार्यरत राहिलेल्या अशोकजींच्या कर्तृत्वाला तोड नाही.
 
दोन दशकांपर्यंत अशोकजींचे स्वीय सचिव असलेले डॉक्टर चंद्र प्रकाश सिंग यांनी आपल्या आठवणीत लिहिलंय की, “संघाचे द्वितीय सरसंघचालक पूजनीय श्री. गोळवलकर गुरुजींचा प्रचंड प्रभाव अशोकजींवर होता, इटावापासून दूर असलेल्या ग्रामीण भागात एका संतांची अशोकजींशी भेट झाली, महाराजांना संघाबद्दल माहिती नसावी, या अंदाजाने अशोकजींनी त्यांना सांगितलं की, “ते महात्मा गोळवलकर गुरुजींचे अनुयायी आहेत.”
 
“गोळवलकर काय करताहेत माहिती आहे का?” महात्म्यांनी विचारले.
 
“आपणच मार्गदर्शन करा,” अशोकजी उत्तरले.
 
“जमिनीला पडलेल्या दोन-चार भेगा तुम्ही पाहिल्या असतील. हिंदू धर्मालाही अशा भेगा पडल्यात आणि त्या इतक्या मोठ्या झाल्या आहेत की, त्यातून एखादा हत्तीही सहज जाईल, गोळवलकर गुरुजी या भेगा भरण्याचं काम करतायेत. मोठं काम आहे, तुम्हीही मोठं काम करत आहात.”
 
महात्माजींच्या शब्दांना अशोकजी जगले, ६५ वर्षांहून अधिक काळ संघ प्रचारक असो किंवा विश्व हिंदू परिषदेत आल्यावर घेतलेली प्रसिद्ध धर्मसंसद असो, वा रामजन्मभूमीचे आंदोलन असो. पंथ, जात, पात, भाषा, प्रांत असेच सर्व भेदाभेद विसरून 'हिंदू सारा एक' या भावनेने कार्यरत राहून मातृभूमीच्या सेवेचे व्रत अशोकजींनी आयुष्यभर जपले.
 
धामधुमीच्या काळात राम मंदिर आंदोलनाला दाबण्याचे, थांबविण्याचे, शमविण्याचे प्रयत्न झाले नसतील का? अगदी उच्च पातळीवरून झाले, उंच उंच लोकांनी केले. पण, या प्रत्येक प्रयत्नाला आपल्या संघटनात्मक बांधणीच्या आणि अत्यंत तार्किक बुद्धीतून आणि कठोर कर्मयोगातून अशोकजी पुरून उरले. अशोक सिंघल नसते, तर राम मंदिर आंदोलनाचे काय झाले असते? ही कल्पनाही करवत नाही.
 
विविध आखाड्याच्या संत-महंत यांना एकत्र घेऊन, त्यांना सांभाळून त्या सर्वांना एका व्यासपीठावर आणण्याचे आणि या सर्वांना एका अद्वितीय अशा ध्येयासाठी रत करणे, हे अवघड कार्य अशोकजींमुळेच शक्य झाले. वैयक्तिक व्यवहारात अत्यंत मृदू, पण हाती घेतलेल्या कामासाठी अत्यंत दृढतेने व्यक्त होणारे अशोकजी यांनी समरसतेसाठी, हिंदू एकतेसाठी, अयोध्येतील प्रभू श्रीरामचंद्रांच्या भव्य मंदिरासाठी आयुष्यातील कण न कण झिजविला आणि क्षण न क्षण खर्ची घातला.
 
२०१४च्या निवडणूक निकालानंतर अशोकजी विशेष आनंदले होते. 'दोन चपला मारा. पण, आम्हाला हिंदू म्हणू नका,' अशी परिस्थिती काही वर्षांपूर्वी खरंच होती. प्रामुख्याने विविध मोघली स्पष्टच बोलायचे, तर मुस्लीम आक्रमणांनी विविध प्रसंगी येथे यथेच्छ लुटालूट केली. या देशावर राज्य करण्यासाठी अधिकार कुणाचा असेल, तर तो अल्लाच्या बंद्यांचा हा समज ठाम होता. लिखित होता आणि त्याला अनुसरूनच शेकडो मंदिरे तोडली गेली. अब्रू लुटली गेली. धर्मांतरे घातली गेली. कर्णावतीचे 'अहमदाबाद' झाले, कोशांबीचे 'इलाहाबाद' झाले, देवगिरी 'दौलताबाद' म्हणून ओळखू जाऊ लागले, अशी असंख्य उदाहरणे आहेत. आक्रमकांनी आपली ओळख येनकेन प्रकारेण दाखविली, हे सत्य आहे. काळाच्या ओघात ब्रिटिश आले, स्वातंत्र्य जवळ येऊ लागले आणि 'राज्य करण्याचा दैवी अधिकार आम्हालाच आहे,' किंवा तत्सम भावनेतूनच जिनांचा हट्ट जन्मला, लोकशाहीत तलवारीच्या जोरावर मागणी करायची नसते, हे ते विसरले आणि कचखाऊ नेतृत्वाने पाकिस्तानच्या जन्माला मदत केली. पण, त्यानंतरही अगदी परवा परवापर्यंत 'माझ्या धर्माचा अधिकार, इतर धर्मापेक्षा श्रेष्ठ आणि अधिक आहे,' या भावनेला खतपाणी देणारे नेतृत्व देशाच्या मुख्यस्थानी होते, हे दुर्दैव बदलले. मुस्लिमांचा वापर मतांच्या राजकारणासाठी करून घेणारे पक्ष हरले आणि मुस्लिमांच्या बहुतांशी विरोधानंतरही स्थिर सत्ता या राष्ट्रात आली आणि टिकलीही, या सर्व गोष्टी सूर्यप्रकाशाइतक्या स्पष्ट आहेत. याचाच एका प्रकारे पुनरुच्चार अशोकजी सिंघल यांनी, “मुसलमानों के साथ के बिना भी चुनाव जीता जा सकता हैं।” या शब्दांत केला होता.
 
सगळे आर्किओलोजिकल सर्व्हे आणि इतर इतिहास स्पष्ट सांगतो की, मंदिरे तोडली गेलीत, त्यांचे पुनरुत्थान संस्कृती रक्षणासाठी झाले पाहिजे. कालच कर्नाटकमधील होयसळा साम्राज्यात घडलेली शेकडो वर्षे जुनी कालीमातेची मूर्ती तोडण्याची बातमी कानावर आली. या सार्वभौम, बाबासाहेबांच्या संविधानाचा स्वीकार केलेल्या राष्ट्रातील सर्व नागरिक एक आहेत, समान आहेत म्हणून राष्ट्राच्या पुढील प्रगतीसाठी, समान नागरी कायदा आवश्यकच आहे. याच रेषेवर अशोकजी, “देश के मुसलमानों को अयोध्या, काशी और मथुरा पर अपना दावा छोड़ देना चाहिए और 'युनिफॉर्म सिव्हिल कोड' स्वीकार कर लेना चाहिए। अगर ऐसा होता हैं, तो हम उन्हें प्यार देंगे और किसी अन्य मस्जिद पर दावा नहीं करेंगे। जबकी हजारों मस्जिद मंदिरों को तोडकर बनाए गए हैं।” या शब्दांत आपलं स्पष्ट मत मांडले होते. यात चूक ते काय? हिंदू जनांनी इतर सर्वांचा आदर करावा हे जितके योग्य, तितकेच इतर सर्वांनी हिंदू धर्माचाही आदर करावा, या अपेक्षेमध्ये गैर ते काय? आणि हेच अशोकजी वारंवार मांडत असत.
 
संघाच्या अमृतवेलीला लागलेले हे 'अशोक' नावाचे श्रीराम चरणाशी अर्पण झालेले फळ रसाळही निघाले आणि गोमटेही.
 
बहुसंख्य असलेल्या हिंदूंच्या या देशात, कापडाच्या मंडपाखाली राहिलेल्या आपल्या प्रभू श्रीरामासही आज अशोकजींची आठवण येत असणार हे नक्की. रामचंद्रदास परमहंस २००३ साली गेले. त्यानंतर अशोकजींचे जाणे, ही रामजन्मभूमी आंदोलनाची सर्वात मोठी हानी ठरली.
 
आज राम मंदिराचा प्रश्न मार्गी लागलाय, भव्य दिव्य मंदिर उभं राहतंय. 'तारीख नही बतायेंगे' म्हणणाऱ्या अनेकांच्या तोंडाला कुलूप लागलंय. पण, हिंदुत्व म्हणा, राम मंदिर की आणखी काही, हे केवळ राजकारणाचे विषय नाहीत आणि कधीच नव्हतेही; पण प्रमुख मुद्दे आहेत आणि राहतीलच!
 
केवळ भव्य राम मंदिर नाही, काशी, मथुरा नाही. या देशावरील पारतंत्र्याची, मानसिक गुलामगिरीची, मनामनातील हीन भावना दर्शविणारी शेवटची खूण संविधानाचा मान राखत संपेपर्यंत हा संघर्ष चालणार आहे, पळणार आहे आणि पूर्ण होणार आहे. लोकांना वाटतं की, लढा केवळ मंदिराचा आहे, तसा तो नाहीये. खरा लढा या भूभागावर विकसित झालेल्या संस्कृतीच्या संवर्धनाचा आहे, राष्ट्र्निर्माणाचा आहे, परम वैभवापर्यंत जाणाऱ्या प्रवासाचा आहे आणि मंदिर तर असं भव्य मंदिर बनणार आहे, एवढी मोठी ताकद उभी राहणार आहे की, कोणा बाबराच्या मनात, स्वप्नातही पुन्हा कधी ते तोडण्याचा विचारसुद्धा येता कामा नये, तीच अशोकजींना खरी श्रद्धांजली ठरेल.
 
सुब्रह्मण्यम स्वामींनी आणि अनेकांनी अशोकजींना 'भारतरत्न' देण्याची मागणी केली होती, त्याचा योग्य तो निर्णय होईलच; पण देवालाही स्वतःच्या कर्तृत्वाने कापडी मंदिरातून भव्य मंदिरात नेण्यासाठी जे जे प्रयत्न झाले, त्यात अशोकजी एक देवदुर्लभ कार्यकर्ता राहिले, हे निश्चित.
 
काळापुढे सगळे थकतात, हरतात. पण, संकल्पपूर्तीसाठी झटणाऱ्यांसाठी काही आयुष्ये दीपस्तंभांसारखी नेहमी दिशा देत राहतात. अशाच या आयुष्यास कोटी कोटी नमस्कार, कोटी कोटी नमस्कार.
जय श्रीराम...
भारतमाता की जय ...
 
- शंतनु पांढरकर
 
 
@@AUTHORINFO_V1@@