लढवय्यी एन. सिक्की रेड्डी!

20 Nov 2020 20:10:03
लढवय्यी एन_1  H


भारतीय बॅडमिंटनमध्ये एक उगवती तारका म्हणून नावारूपास येणार्‍या एन. सिक्की रेड्डीची कहाणी...
 
भारतातील अनेक बॅडमिंटनपटू जगभरामध्ये देशाचे नाव उंचावत आहेत. भारतामध्ये कित्येक वर्षांपासून खेळला जाणारा हा खेळ. मात्र, सध्याच्या युगामध्ये या खेळाचेही खास आकर्षण आहे. याचे कारण म्हणजे भारतीय बॅडमिंटन खेळाडूंची परदेशातील स्पर्धांमध्ये केलेली उत्तम कामगिरी आहे. भारतीय बॅडमिंटन इतिहासात अनेक असे खेळाडू आहेत ज्यांनी या खेळाचा भारतामध्ये पाया रचण्याचे कार्य केले आहे. त्यानंतर ‘प्रीमियर बॅडमिंटन लीग’मुळे या खेळाला देशामध्ये ‘ग्लॅमर’ मिळाले.
 
यामुळे अनेक तरुण खेळाडू गावाखेड्यातून नावारूपास आले. प्रकाश पादुकोण यांच्यापासून सुरु झालेला हा बॅडमिंटनचा इतिहास पुढे पुल्लेला गोपीचंद, चेतन आनंद, अश्विनी पोनप्पा यांच्यानंतर सायना नेहवाल, श्रीकांत किदंबी अशा तरुण पिढीने हा वारसा पुढे नेला. अशामध्ये आणखी एक नाव म्हणजे तेलंगण राज्यातील एन. सिक्की रेड्डी. पुल्लेला गोपीचंद यांच्या प्रशिक्षणाखाली अपयशाशी लढून तिने भारतीय बॅडमिंटनमध्ये आपले स्वतःचे विशेष स्थान निर्माण केले. जाणून घेऊया तिच्या या प्रवासाबद्दल...
 
नेलाकुरीही सिक्की रेड्डी हिचा जन्म हा १८ ऑगस्ट, १९९३ रोजी तेलंगणमधील कोदादमध्ये झाला. लहानपणापासूनच तिचा कल हा खेळांकडे अधिक होता. शैक्षणिक वर्षामध्ये तिने अनेक खेळांमध्ये भाग घेतला. २००२ मध्ये तिने बॅडमिंटन उन्हाळी शिबिरामध्ये भाग घेतला. येथून तिची बॅडमिंटनमधील उत्सुकता वाढत गेली. उन्हाळी शिबिरात तिने बॅडमिंटनमध्ये चांगली कामगिरी केली. इथूनच तिने या खेळामध्ये आपला पाय रोवण्यास सुरुवात केली. तिने हैदराबादमध्ये वाणिज्य व व्यवसाय प्रशासनात उच्च शिक्षण घेतले. शिक्षणासोबतच तिने बॅडमिंटनमधील आपला संघर्ष कायम ठेवला.
 
 
स्थानिक स्पर्धांमध्ये उत्तम कामगिरी करत तिने देशभरामध्ये आपले नाव प्रस्थापित केले. बॅडमिंटनमधील एकेरी आणि दुहेरी अशा दोन्ही प्रकारांमध्ये तिने प्रभुत्त्व मिळवले होते. सलग सहा वर्षे स्थानिक आणि राज्यस्तरीय स्पर्धा केल्यानंतर २००८मध्ये तिला ‘इंडियन ग्रॅण्ड प्रिक्स गोल्ड’ या स्पर्धेमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली. मात्र, पहिल्याच फेरीत तिला पराभव स्वीकारावा लागला. मात्र, तिने जिद्द सोडली नाही. २००७ पासून ती राष्ट्रीय संघाची सदस्य होती. २००९ची सुरुवात ही तिच्या कारकिर्दीसाठी खूप महत्त्वाची होती. लखनौमध्ये झालेल्या ‘सय्यद मोदी इंडियन ग्रांपी’ स्पर्धेमध्ये दुहेरी प्रकारात पदार्पण केले. विशेष म्हणजे, एकेरी आणि दुहेरी प्रकारामध्ये उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली.
 
 
 
यामुळे तिच्या कारकिर्दीला एक सुरुवात मिळाली आणि आत्मविश्वासात भर पडली. तिने ‘स्माईलिंग फिश इंटरनॅशनल सीरिज चॅम्पियनशिप’मध्ये पहिल्यांदा एकेरी प्रकारात भाग घेत स्पर्धा स्वतःच्या नावावर केली. दुहेरी प्रकारात तिने अंतिम फेरीत प्रवेश केला. मात्र, तिला दुसर्‍या स्थानावर समाधान मानावे लागले. तिच्या कारकिर्दीला सुरुवात होते, तोवर तिला मोठ्या दुखापतीचा सामना करावा लागला. गुडघ्यातील लिगामेंटला दुखापत झाल्याने ती तब्बल १३ महिने खेळापासून दूर होती. हा काळ तिच्यासाठी खूप संघर्षपूर्ण होता. तरीही या संकटावर मात करत तिने पुन्हा एकदा पुनरागमनासाठी कंबर कसली.
 
 
 
दुखापतीतून सावरत एन. सिक्की रेड्डीने आंतरराष्ट्रीय पातळीवर पुनरागमन केले. २०११ मध्ये सय्यद मोदी मेमोरियल स्पर्धेमध्ये भाग घेतला आणि उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली. याचवर्षी झालेल्या बेहरण आंतरराष्ट्रीय आव्हान स्पर्धेत अंतिम फेरी गाठली. दोन्ही स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी करत भारतीय बॅडमिंटन संघात आपले स्थान कायम ठेवले. २०१३मध्ये तिने दुहेरी प्रकारात प्रज्ञा गद्रेच्या साथीने टाटा ओपन इंडिया आंतरराष्ट्रीय स्पर्धेत चमकदार कामगिरी करत स्पर्धेचे विजेते पद पटकावले. विशेष म्हणजे, अंतिम सामन्यात त्यावेळची प्रसिद्ध जोडी ज्वाला गुट्टा आणि अश्विनी पोनप्पा यांना नमवत हे चषक पटकावले होते.
 
 
त्यामुळे तिच्या या कामगिरीचे देशभरातून कौतुक झाले. २०१४ मध्ये तिने दोन चषक स्वतःच्या नावावर केले. यामध्ये एकेरी, महिला दुहेरी तसेच मिश्र दुहेरी या तीनही प्रकारामध्ये उत्तम कामगिरी केली. पुढे एक पाऊल पुढे टाकत २०१५ मध्ये तिने पाच चषक आपल्या नावावर केले. यानंतर तिचा आलेख हा चढताच राहिला. तिची मिश्र दुहेरीसाठी प्रणव जेरी चोप्रासोबत केलेली भागीदारी फायदेशीर ठरली. कारण, त्यांनी २०१६ मध्ये दोन महत्त्वाच्या स्पर्धांमध्ये यश प्राप्त केले. दक्षिण आशियाई फेडरेशन गेम्समध्ये त्यांनी भारताला सुवर्णपदक जिंकून दिले. पुढे कॉमनवेल्थ गेम्समध्ये तिने उत्तम कामगिरी केली. खेळामधील तिची सजगता आणि जिद्द यामुळे भारतीय बॅडमिंटनमध्ये एन. सिक्की रेड्डी हे नाव भविष्यात अनेकदा लोकांसमोर येईल हे नक्की. तिच्या पुढच्या वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून हार्दिक शुभेच्छा...!



Powered By Sangraha 9.0