सुवर्णमहोत्सवी ‘शाकम'@ ३२८ किला-ए-अर्क’

    दिनांक  20-Nov-2020 22:01:32
|

Untitled-1_1  H
 
 
 
 
 
भारतात महाराष्ट्राला सांस्कृतिक सार्वभौमतेसह समृद्ध कला परंपरा लाभलेली आहे. कला हा शब्द उच्चारला तर लगेच मुंबईच्या सर जे. जे. कला महाविद्यालय समूहाचं नावं ओघाने येतंच. १८५० ते १८५७ या काळात तत्कालीन ‘कंपनी सरकार’कडे ‘टेक्सटाईल अ‍ॅण्ड वेव्हिंग’चे उद्योजक दानशूर सर जमशेठजी जिजिभाई टाटा यांनी पुढाकार घेऊन जे. जे. स्कूलची स्थापना केली.
 
 
तत्पूर्वी ‘विद्येचं माहेरघर’ म्हणून एकेकाळी ओळखल्या जाणार्‍या पुण्यातील शनिवारवाड्यात १७९० मध्ये आर्ट स्कूल चालविले जात होते, हे फार कमी लोकांना माहीत असेल. सुमारे ३५ वर्षे सुरू राहिलेल्या या आर्ट स्कूलची धुरा गणपतराव तांबट यांनी सांभाळलेली होती. सतरावे-अठरावे शतक तर कलेकडे गरज म्हणून पाहण्यासाठी गेले असे निरीक्षणांती दिसते. कारण, त्यावेळी कलाविद्यार्थी असं न म्हणता कारागीर असं म्हटलं जायचं.
 
 
कलाकुसरीचं काम करायला बाहेरून कारागीर मागवले जायचे. तो व्याप-ताप -खर्च आपल्याच स्थानिक कौशल्यधारकांवर, इच्छुकांवर व्हावा ही उदात्त भावना त्यावेळी अधिक प्रकार्षाने जपली जायची. पुढे पुढे कलेला कौतुक आणि प्रोत्साहन मिळाले. कारागिरी व्यवसायाला स्वावलंबित्त्व मिळाले. कला महाविद्यालयांची संख्या वाढविण्याची तयारी सुरू झाली आणि त्यातच एक भाग म्हणून शासनाच्याच अधिपत्याखालील मराठवाडा पातळीवर औरंगाबाद येथे १९७१ साली शासकीय कला महाविद्यालय सुरू झाले. मुंबई येथील सर ज. जी. उपयोजित कला महाविद्यालयाचे एक प्राध्यापक जी. के. देशपांडे आणि त्यांच्या संबंधितांनी पुढाकार घेऊन मराठवाड्याचा कलास्तंभ ठरू पाहणार्‍या शासकीय कला महाविद्यालयाची मुहूर्तमेढ रोवली.
 
 
२०२० हे वर्ष या शाकमचे पन्नासावे वर्ष आहे. २०२०-२०२१ हे पन्नासावे अर्थात सुवर्णमहोत्सवी वर्ष! ५० वर्षांत या महाविद्यालयाने महाराष्ट्रासह देशाला किंबहुना जगाला स्वतंत्र कला जगताकडे घेऊन जाणारे दीहिमान प्रतिभाशक्ती लाभलेले विद्यार्थी दिलेत, हे कथन करतानाही अभिमानाने उर भरून येते.
 
 
‘किले अर्क’ किंवा ‘किला-ए-अर्क’ या नावाने औरंगाबादच्या शहागंज रोडवर जी ऐतिहासिक वास्तू उभी आहे, त्या वास्तुत १९७१ साली शासकीय कला महाविद्यालय सुरू करण्यात आले. तत्पूर्वी एक पुरातन ऐतिहासिक वास्तू म्हणून किला-ए-अर्क उभी होती. सुमारे १६९२ मध्ये म्हणजे ३२८ वर्षाच्या या वास्तूची निर्मिती औरंगजेब याच्या मोठ्या मुलीसाठी झेब उन निसा हिच्यासाठी तिच्याच नावाने पॅलेस म्हणून उभी केली.पुढे याच पॅलेसमध्ये औरंगजेबाच्या अनेक राण्यांना ठेवण्यात आले. पुढे पॅलेस हे नाव मागेे पडून किला-ए-अर्क हे नाव पुढे आले. ‘बीबी का मकबरा’, ‘बावन्न गेट’, ‘बावन्नपुरे’ (जसे फाजिलपुरा, उस्मानपुरा इ.) पवनचक्की नव्हे पानचक्की अशा ऐतिहासिक वास्तूंनी ओळखल्या जाणार्‍या या औरंगाबादच्या ऐतिहासिक शिरपेचामध्ये ‘किला-ए-अर्क’ अर्थात शासकीय कला महाविद्यालय ही सुरुवातीला ऐतिहासिक आणि १९७१ ते नंतर शासकीय कला महाविद्यालय म्हणून ओळख निर्माण करणारी वास्तू ३२८ वर्षांची झालेली असून ‘शाकम’ने पन्नासाव्या सुवर्णमहोत्सवी वर्षात पदार्पण केले आहे.
 
 
‘शाकम’ने गेल्या ५० वर्षांत कला जगतासह आधुनिक जगाला काय दिले, हा सहज प्रश्न मनामध्ये येतो. मी या ‘शाकम’चा माजी विद्यार्थी नुसता विद्यार्थीच नाही तर जबाबदारीने प्रामाणिकपणे कलोपासना आणि कलासाधना कराणारा विद्यार्थी. त्यावेळच्या मराठा विद्यापीठात प्रथम श्रेणीत सर्वप्रथम येऊन ‘कलारत्न’ सन्मान मिळवणारा मी. मुंबईच्या सर ज. जी. उपयोजित कला महाविद्यालयात अध्यापन करता करता दोन तपं उलटून तीन वर्षं झालीत. मला प्रश्न पडला की, ‘शाकम’ ने गेल्या ५० वर्षांत आधुनिक जगाला कला क्षेत्रांशी संबंधित सार्‍याच विभागांसाठी काय दिले नाही ? प्रत्येक क्षेत्रात उच्च पदांवर कार्यरत असलेले अनेक विद्यार्थी-विद्यार्थिनी ‘शाकम’ने या कलाविश्वाला दिले आहेत.
 
 
मुख्य म्हणजे ‘शाकम’मधून बाहेर पडलेला कला विद्यार्थी हा त्याचा श्वास सुरू आहे तोपर्यंत खंबीरपणे, स्वावलंबत्त्वाची पताका खांद्यावर घेऊन कलाकार्य करीत आहे, ते दिवंगत झालेत, ते अखेरच्या श्वासापर्यंत कलासाधनेवरच उपजीविका साधत होते. याच पुंजीवर त्यांच्या उत्तरआयुष्यातील पश्चात कुटुंबीयांची ही काळजी त्यांनी घेतलेली आहे. बहुचर्चित सर ज. जी. उपयोजित कला महाविद्याल्यांच्या सध्या कार्यरत कलाध्यापकांच्या एकूण संख्येत सुमारे ८० टक्के कलाध्यापक हेही दस्तखुद्द ‘शाकम’ या मातृसंस्थेनेच बहाल केलेले आहेत.
 
महाराष्ट्र इतर राज्ये आणि केंद्र सरकारी कार्यालयांमध्ये शाकमचे अनेक विद्यार्थी अधिकारी म्हणून कर्तव्य बजावत आहेत. देशाच्या औद्यागिक क्षेत्रात तर ‘माईलस्टोन’प्रमाणे ‘शाकम’चे विद्यार्थी सन्मानाने जगत आहेत आणि इतरांनाही जगवत आहेत. देश-विदेशात सर्वदूर कुणी एखाद्या उद्योग समूहाशी जोडलेले आहेत. कुणी स्वतंत्रपणे कलाविश्व निर्माण करून इतरांनाही रोजगार पुरवून एक सामाजिक भान, बांधिलकी जपत आहेत. ५० वर्षांतील दरवर्षी सुमारे १०० विद्यार्थी बाहेर पडतात, असे प्रमाण धरले तर शाकमने २०२० पर्यंत सुमारे पाच हजार कला विद्यार्थी जगाला बहाल केलेत. या पाच हजारांपैकी दिवंगत झालेले वगळता सर्वजण स्वांतसुखाय आहेत. स्वतःच्या कुटुंबाची मूलभूत गरजांसह काळजी घेत आहेत. बहुतांशी जणांनी तर सामाजिक बांधिलकी जपत कलाकार्यासह सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, ऐतिहासिक, शास्त्रीय, औद्यागिक, फिल्मीजगत, विज्ञान अणि तंत्रज्ञान, दृश्यकला, ललितकला, माहिती आणि तंत्रज्ञान अशा अनेक क्षेत्रांमध्ये दीपस्ंतभाप्रमाणे कलातेजाचा प्रकाश पसरवला आहे.
 
 
या सुवर्णवर्षाचं औचित्य साधून मी ज्या जुन्या वरिष्ठ माजी विद्यार्थ्यांशी संवाद साधला की, जेणेकरून मला ‘शाकम’च्या ‘कलास्तंभा’ची माहिती मिळेल. त्यापैकी काही जणांनी जी जी नावे आणि कलाकार्याची माहिती दिली, ती नावे या लेखात नमूद करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहेच तथापि कुणा कुणा यशशिखर गाठलेल्या कलाकारांची नावे जरी या लेखात आलेली नसली तरी त्यांचं अस्तित्व आणि त्यांची ‘शाकम’शी असलेली बांधिलकी ही अखंड आणि अतूटच आहे. मी औरंगाबादच्या आमच्या ज्येष्ठ माजी विद्यार्थ्यांस सर्वप्रथम वरीलप्रमाणे संपर्क साधला. त्यांंना त्यांच्या कार्यबाहुल्यामुळे वेळ मिळाला नाही. मग इतरांशीही जेव्हा माहिती होण्याच्या इराद्याने संपर्क साधला तेव्हा, डॉ. राहुल वेलदोडे वा किशोर निकम, श्याम तापसकर अशा ‘शाकम’ माजी विद्यार्थी मित्रांनी काही नावं दिली. सगळ्यांचेच उल्लेख जरी या लेखात करता आले नाहीत तरी ज्यांची नावे वाचूनही ‘शितावरुन भाताची परीक्षा’ जशी करतात त्याप्रमाणे ‘अंदाज अपना अपना’ असे शाकमच्या बाबतीत करायला सुलभ होईल, अशी खात्री आहे.
 
कलाकार ते समाजकारण आणि पुढे राजकारण असा अव्याहत प्रवास करणारे शाकमचे माजी विद्यार्थी गोविंद गोंडे पाटील यांचं नाव मराठवाड्यासह सर्वदूर सुपरिचित आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील ‘ताऊ’ ज्येष्ठ निर्माते, दिग्दर्शक महेश कोठारे यांनी ‘साईबाबा’ चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी ज्यांच्यावर सोपविली, ते सतीश पांचाळ, हे मराठवाड्यातील चाकूर येथून ‘शाकम’त आले. फोटोग्राफर ते कलादिग्दर्शक या प्रवासात त्यांनी ‘जय मल्हार’, ‘एक तास भुताचा’, ‘अनोळखी दिशा’, ‘प्रेमाचा गेम’, ‘सेम टू सेम’, ‘आनंदी’, ‘तुझ्यात जीव रंगला’, ‘हृदयात वाजे समथिंग’, ‘तुझ्या वाचून करमेना’ अशा मराठी-हिंदी अनेक मालिकांसह ‘श्रीदेवी फाटका’, ‘रेडी’, ‘नो प्रोब्लेम’, ‘बर्फी’, ‘राज-३’, ‘आशिकी-३’, ‘शापित’, ‘फीर स्माईल प्लीज’ अशा अनेक चित्रपटांचे दिग्दर्शन केले. हिंदी, मराठी, गुजराती मालिका आणि चित्रपटांच्या दिग्दर्शनासाठी सतीश पांचाळ यांचं नाव म्हणजे एक समीकरणच होय! भारतीय आणि जागतिक जाहिरात संस्थांमध्ये अंबेजोगाई येथील ‘शाकम’चे विद्यार्थी राहिलेले रवी देशपांडे, ‘एल्झीर इंटिग्रेटेड ब्रॅण्डकॉम प्रा. लि.’ या जागतिक स्तरावरील जाहिरात संस्थेचे संस्थापक गणेश गडाख, ज्यांचा या क्षेत्रावर नेहमीच दबदबा राहिलाय हेही ‘शाकम’नेच दिले.
 
महेंद्र भगत, प्रदीप कुळकर्णी, प्रवीण काटेपालेवार ही नावे जाहिरात युगातील ‘युगस्तंभ’च म्हणावी लागतील. मुंबईच्या बॉलीवूडमध्ये आर्ट डायरेक्टर म्हणून दीपक बच्छाव यांचं नांव कसं विसरता येईल? अनेक चित्रपट, अनेक मालिका, अनेक पुरस्कार कार्यक्रम, अनेक प्रॉडक्ट लॉन्चिंग, अनेक प्रदर्शने, अनेक मोठ्या कार्यक्रमांचे सेट डिझायनिंग या माणसाच्या नावावर आहे. चंद्रकांता (प्राईम चॅनेल), संत मीराबाई (णढत), मायकेल जॅक्सन शो, फिल्मफेअर अ‍ॅवॉर्ड (माणिकचंद), झी सिने अ‍ॅवॉर्ड, स्टार सिने अ‍ॅवॉर्ड, ए. आर. रहेमान शो, फाल्गुनी पाठक शो, अंबानी वेडिंग सेट, कॅनडा येथे मित्तल वेडिंग सेट अशा शेकडो कार्यक्रम प्रकारांशी दीपक बच्छाव यांचं नाव जोडलेलं आहे. जाहिरात संस्थांमधील, ऑक्सिजन म्हणजे प्रशांत गोडबोले हेही एक आकाशाला गवसणी घालणारं नाव ‘शाकम’ने कथाविश्वाला बहाल केलं आहे.
 
‘हमारा बजाज’ जाहिरात मोहिमेने प्रशांत गोडबोले यांनी प्रशांतच काय सारे महासागर आपल्या आडनावाप्रमाणे पादाक्रांत केले. भारतातील अशी एकही टॉप एजन्सी नाही की जिथे प्रशांत यांचा कलानुभव युक्त कल्पनाशक्तीची ऊर्जा पोहोचली नाही. फिल्म इंडस्ट्रीज, रमाकांत मुंडे हा असा एक छायाचित्रकार आहे, जो ‘शाकम’ने या इंडस्ट्रीला दिला आहे की, फिल्मी नट-नट्या आणि इतर कलाकारच, रमाकांत मुंडेंबरोबर स्वतःचे फोटो काढून संग्रही ठेवतात. याच छायाचित्रात औरंगाबादलाच जन्म आणि कर्मभूमी मानून सार्‍या जगभरात आपल्या ‘व्ह्यू-फाईंडर’ची जादू सिद्ध करणारा आणखी एक अवलिया ‘शाकम’ ने जगाला दिलाय, तो किशोर निकम!
 
आंतरराष्ट्रीय स्तरावर जशी पेंटिंग्ज विकली जातात, तशी या निकम नामक अवलियाची छायाचित्रे, पुरस्कारांसह विकली जातात. किती नावे सांगावीत? कधी कधी वाटतं जर ‘जेजे’प्रमाणे ‘सेलिब्रिटी स्किल’ ‘शाकम’नेही आचरणात आणलं असतं तर १५०-१७० वर्षांचे ‘जेजे’ आणि ५० वर्षांचे ‘शाकम’ यांच्यात, ‘जगाला सर्वाधिक आयकॉन्स कुणी दिलेत?’ या विषयावर शीतयुद्धच सुरू झालं असतं. असो, मजेचा भाग सोडा पण ‘शाकम’चं अस्तित्व म्हणजे, अथांग पाण्यावर तरंगणार्‍या बर्फाप्रमाणेच मानावे लागे. जितका भाग डोळ्यांना दिसतो, त्यापेक्षा अधिक भाग अस्तित्व असूनही खोल पाण्यात दडलेला असतो, असेच म्हणावे लागेल.
 
अब्दुल गफार, विकास जोशी, प्रकाश चांदवडकर, राजेंद्र गिरी, प्रमोद गायकवाड, प्रदीप कुलकर्णी, समीर सहस्रबुद्धे, सुरेश देशमाने, खोमणे, दिनेश मालटे, दीपक जोगदंड, नंदकुमार जोगदंड, विवेक लाड, स्वाती जपे, स्वाती साळुंखे, नरेंद्र राहुरीकर, सुनील जयस्वाल, कृष्णा पुलकुंडवार, राहुल थोरात, डॉ. राहूल बेलदोडे, बालाजी उबाळे, गणेश नागनाथ बोबडे, राजा मानकर (हे सध्या नागपूरच्या शासकीय कला व अभिकल्प महाविद्यालयाचे अधिष्ठाता आहेत.) डॉ. गणेश तरतरे, शिरीष निकम अशी एकेक नावे म्हणजे कला व उपयोजित कला आणि शिल्पकला क्षेत्रातील ‘इतिहास’ ठरलेली आहेत.
 
 
अनंत आणि प्रणिता देशपांडे यांची औरंगाबादेतील २५ वर्षांहून अधिक काळ सुरू असलेली कलाशिक्षण संस्था म्हणजे ‘शाकम’ने निर्माण केलेले व्यासपीठच आहे. राहूल थोरात, हेमंत रवंदळे, राम कस्तुरे, नीला चौधरी, भरत वद्देवार, संजय दारमवार, संजय घुगे, अरविंद जोशी, किरण डहाळे, पी.एम्. महाजन, धर्मेंद्र देवपुजारी, रवींद्र वेदपाठक, कृष्णकांत बारब्दे, सानप अशी एकेक नावे ही ‘शाकम’च्या कलाप्रज्ञेने भारलेली आहेत.
 
आता हे सारं कुणामुळे घडलं? अर्थात तत्कालीन अधिष्ठाता वसंत परब, लोखंडे सर, देशपांडे सर, म. भा. इंगळे सर, धर्मराज भोईर सर, गो. रा. पवार सर, बढे सर, विद्यार्थीप्रिय, शशिकांत पेंडसे सर, प्रा. श्री. व सौ. कुरेकर, नीळकंठ कुंभार सर, मोरे सर अशा जवळजवळ सर्वच प्राध्यापकवृंदांच्या आशीर्वादाने ‘शाकम’चे शेकडो-हजारो ‘कलास्तंभ’ अढळपणे, ठामपणे कला क्षेत्रात पाय रोवून आहेत. कलाध्यापकेतर कर्मचार्‍यांमधील समुद्र, दहीवाल, गौतम, भालेराव अशा अनेकांचं अस्तित्व म्हणजे ‘शाकम’ची मेरुमणीच...!!
 
या लेखाचं प्रयोजनच मुळी ‘शाकम’चं, भारतीय कलाइतिहासात असलेलं सुवर्णस्थान विशद करणं! जी नावे उल्लेखिलेली आहेत, ती ‘शाकम’च्या पाच हजार कलास्तंभांचं प्रातिनिधिक संदर्भ आहेत. या पुरातत्त्व ऐतिहासिक वास्तूचं जतन व्हावं, ही रास्त अपेक्षा आहेत. तथापि या कलाक्षेत्रात, जरी ‘पद्म’ पुरस्कार दिले जात नसले किंवा या क्षेत्राला हवं तेवढं महत्त्व दिलं जात नसलं तरी बरबटलेल्या अनेक प्रकारच्या दलदलीमधून आमची ही ‘शाकम-पद्म’ उभी आहेत आणि फुलली आहेत!
 
 
 
 
 
- प्रा. गजानन शेपाळ
(‘शाकम’चा कलारत्न-विद्यार्थी)
८१०८०४०२१३
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.