सोनिया गांधींना दिल्लीतील हवा मानवेना ; नेटकऱ्यांनी दिला 'हा' सल्ला

20 Nov 2020 18:04:28

sonia gandhi rahul gandhi



नवी दिल्ली :
दिल्लीतील हवा मानवत नसल्याकारणाने काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आपला मुक्काम दिल्लीतून गोव्याच्या दिशेने हलविला आहे. दिल्लीतील वायू प्रदूषण वाढल्यामुळे डॉक्टरांनी सोनिया गांधी यांना दिल्लीबाहेर जाण्याचा सल्ला दिला आहे. त्यानुसार सोनिया गांधी आता एका आठवड्यासाठी गोव्यात राहायला जाणार आहेत. यावेळी त्यांच्यासोबत राहुल गांधीही असतील. काहीवेळापूर्वीच हे दोघे पणजी विमानतळावर दाखल झाले. मात्र त्यांच्या या निर्णयानंतर सोशलमिडीयावर नेटकऱ्यांनी गांधी कुटुंबाला ट्रोल केले. यावेळी सोशलमिडीयावर 'इटली' हे शहर ट्रेंड होत आहे.



italy_1  H x W:



सध्या काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोपांचे सत्र पाहायला मिळत आहे. अशा परिस्थितीत सोनिया गांधी आणि राहुल गांधी दिल्लीबाहेर जात आहेत. त्यामुळे आता यावर काय पडसाद उमटणार, हे पाहावे लागेल. तर दुसरीकडे बिहार विधानसभा निवडणुकीत राहुल यांनी स्वारस्य दाखवलं नव्हतं. काँग्रेसला पराभवाला सामोरं जावं लागलं. याशिवाय विविध राज्यात झालेल्या पोटनिवडणुकीतही काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे काँग्रेस पक्षातही विरोधाचे वारे वाहत आहेत. मात्र, यानंतरही पक्षनेतृत्त्वाकडून अपेक्षित हालचाली होत नसल्याचे सांगत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी नाराजी व्यक्त केली होती.


यापूर्वी जुलै महिन्यात सोनिया गांधी यांना प्रकृती बिघडल्यामुळे रुग्णालयात दाखल करावे लागले होते. तेव्हापासून सोनिया गांधी यांना छातीमधील संसर्गाची समस्या जाणवत आहे. सप्टेंबर महिन्यात त्या वैद्यकीय तपासणीसाठी परदेशातही जाऊन आल्या होत्या. तेव्हादेखील राहुल गांधीही त्यांच्यासोबत होते. यामुळे राहुल गांधी यांना संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला उपस्थित राहता आले नव्हते. याच काळात भाजपने संसदेत कृषी विधेयके मंजूर करवून घेतली होती. या विधेयकांना काँग्रेसकडून जोरदार विरोध करण्यात आला होता. मात्र, अशा महत्त्वाच्या प्रसंगी राहुल गांधी संसदेत उपस्थित नसल्यामुळे त्यांच्यावर टीका झाली होती.
Powered By Sangraha 9.0