'धार्मिकस्थळे उघडल्यामुळेच मुंबईत कोरोनारुग्ण वाढले' ; महापौरांचा अजब दावा

20 Nov 2020 19:15:12

kishori pednekar_1 &



मुंबई :
दिवाळीत राज्यातील मंदिरे उघडली म्हणूनच मुंबईतील रुग्णांची संख्या वाढते आहे, असे वक्तव्य मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केले. एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले.मुंबईत कोरोनाची दुसरी लाट आलेली नाही. मात्र, ती येण्यास वेळही लागणार नाही. कोरोना खूप वाईट आहे, तो अजून संपलेला नाही. त्यामुळे योग्य काळजी न घेतल्यास हाहा:कार उडेल, असेही महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या. किशोरी पेडणेकर यांच्या या विधानामुळे विरोधी पक्ष भाजपने त्यांच्यावर टीकेची झोड उठवली.




भाजप नेते व आमदार अतुल भातखळकर म्हणतात, "दारूची दुकाने, बार, रेस्टॉरण्ट राज्य सरकारने केव्हाच उघडली आहेत. परंतु रुग्ण मात्र चार दिवसांपूर्वी उघडलेल्या मंदिरांमुळे वाढले हे महापौरांचे तर्कट आहे. हा तर्क नाही, तर शिवसेनेचा खरा चेहरा आहे." तर भाजप नेते निलेश राणे यांनीही पेडणेकर यांच्यावर टीकास्त्र सोडले. ते म्हणतात,"सर्वात अगोदर दारूची दुकाने उघडली, दारुमुळे किती कोरोना रुग्ण बरे झाले अगोदर ती यादी जाहीर करा. शिवसेनेत सगळेच विद्वान एकापेक्षा एक आहेत." असा टोलाही त्यांनी शिवसेनेला लगावला.




लोकल ट्रेन सुरु झाल्यास कोरोना सर्वदूर पसरण्याचा धोका आहे. ट्रेन सुरु झाल्यास सर्व शहरांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव शिगेला पोहोचू शकतो. परिणामी मुंबईत बिकट परिस्थिती उद्भवेल. त्यामुळे तुर्तास रेल्वे सुरु होऊ नये, हे माझे प्रामाणिक मत असल्याचेही किशोरी पेडणेकर यांनी सांगितले.

Powered By Sangraha 9.0