काँग्रेसची खासगी मालमत्ता नाही!

    दिनांक  20-Nov-2020 21:44:52
|
Edit _1  H x W:

स्वातंत्र्यलढा देशाचा होता, स्वातंत्र्यसैनिक देशाचे होते आणि देश आपल्या सर्वांचा आहे, त्यामुळे पक्षासाठी नव्हे तर देशासाठी लढणारा प्रत्येकजण आमचा आहे, काँग्रेसची पापे लपवणारी ती खासगी मालमत्ता नाही!
 
 
 
‘देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी प्राणांची बाजी लावली. इंदिरा गांधी व राजीव गांधी यांच्यासह काँग्रेस नेत्यांनी देशासाठी बलिदान दिले. देशप्रेम काँग्रेसच्या नसानसात आहे. स्वातंत्र्याच्या लढ्यात ज्यांचे पूर्वज इंग्रजांना मदत करत होते, त्यांनी आम्हाला देशप्रेम शिकवू नये,’ अशा त्याच त्याच चावून चोथा झालेल्या शब्दांत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी नुकतेच विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेला उत्तर दिले. थोरातांनी काँग्रेसची आणि गांधी कुटुंबाची महती गाण्याला कारण ठरले, ते देवेंद्र फडणवीस यांनी ‘गुपकर गँग’ व त्यांना काँग्रेसने दिलेल्या पाठिंब्यावर केलेल्या हल्ल्याचे.
 
जम्मू-काश्मीरला लागू असलेले ‘कलम ३७०’ व ‘३५ अ’ गेल्या वर्षी केंद्र सरकारने रद्द केले. मात्र, ही कलमे पुन्हा एकदा लागू करण्यासाठी स्थानिक राजकीय पक्षांनी ‘गुपकर’ ठराव केला. केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरच्या अनुषंगाने निर्णय घेतेवेळी नॅशनल कॉन्फरन्स, पीपल्स डेमोक्रेटिक पार्टी वगैरे स्थानिक पक्ष नेत्यांना व हुर्रियतसारख्या फुटीरतावाद्यांना स्थानबद्ध करण्यात आले होते, जेणेकरुन त्यांनी भडकावू वक्तव्ये, कृत्ये करु नयेत. पण जसजशी त्यांची स्थानबद्धतेतून सुटका झाली, तशी या नेत्यांनी ‘कलम ३७०’ व ‘३५ अ’साठी वळवळ सुरु केली.
 
 
सोबतच फुटीरतावाद्यांशी चर्चा करु, संधान साधू, असेही ‘गुपकर गँग’ने म्हटले. इतकेच नव्हे तर फारुख अब्दुल्ला या भारतात राहून इथल्या सोयीसुविधांचा यथेच्छ उपभोग घेणार्‍या नेत्याने जम्मू-काश्मीरची स्थिती पूर्ववत करण्यासाठी थेट चीनची मदत घेऊ, असे अतिशय संतापजनक विधान केले. अशा ‘गुपकर’ ठराव करणार्‍या, फुटीरतावाद्यांच्या गळ्यात गळे घालणार्‍या व चीनला भारतात हस्तक्षेप करण्याचे आवताण देणार्‍यांशी काँग्रेसने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी आघाडी केली.
 
 
वस्तुतः काँग्रेस देशातील संसदीय निर्णय व प्रक्रियेला मानत असेल तर त्या पक्षाने तिथे स्वतंत्र निवडणुका लढवायला हव्या होत्या, पण ‘गुपकर गँग’शी आघाडी करुन काँग्रेसने आपला हात राष्ट्रविरोधी व भारतविरोधी शक्तींच्याच बरोबर असल्याचे दाखवून दिले. तसेच काँग्रेसाध्यक्ष सोनिया गांधी व खासदार राहुल गांधी यांनी स्वतः या महत्त्वाच्या मुद्द्यावर पक्षाची नेमकी भूमिका काय, हे कधीच सांगितले नाही. परिणामी, अशा देशविघातक ‘गुपकर गँग’ आणि त्यांना पाठिंबा देणार्‍या काँग्रेसची पोलखोल करणे, काँग्रेसचा काळा चेहरा उघडा पाडणे, हे देशभक्त व राष्ट्रीय पक्ष, नेत्यांचे कर्तव्य होते, तेच देवेंद्र फडणवीस यांनी केले.
 
 
मात्र, फडणवीसांनी काँग्रेसला जम्मू-काश्मीर, ‘गुपकर गँग’ व ‘गुपकर’ ठरावाबद्दल प्रश्न विचारले, तर बाळासाहेब थोरातांनी जुन्या-पुराण्या व निरर्थक मुद्द्यांचा आधार घेतला. काँग्रेसकडे देवेंद्र फडणवीसांच्या प्रश्नांची थेट उत्तरे नसल्याने आपल्या नेत्यांनी इतिहासात काय केले, याचे दाखले देण्याची वेळ त्यांच्यावर आली. तसेच कोणतीही माहिती न घेता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला मध्ये आणत आपली बाजू सावरण्याचे काम थोरातांना करावे लागले. पण, त्यांनी अगदी स्वातंत्र्यलढा आणि इंग्रजांना केलेल्या मदतीचा किंवा देशप्रेमाचा विषयच काढला, तर हा मुद्दा थेट काँग्रेसच्या स्थापनेपर्यंतही जाऊ शकतो आणि त्यामुळे या शतायुषी पक्षाची पुरतीच चिरफाड होऊन जाईल.
 
कारण काँग्रेसच्या स्थापनेआधी तत्कालीन व्हाईसरॉय लॉर्ड डफरीन, लॉर्ड लिटन यांच्यासह अनेक इंग्रज अधिकार्‍यांनी गुप्त बैठक का घेतली? अ‍ॅलन ह्यूम यांच्यावर सदर बैठकीत काँग्रेसची स्थापना करण्याची जबाबदारी का सोपवण्यात आली? काँग्रेस खरेच देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी स्थापन केली गेली की इंग्रजांसाठी एक सेफ्टी व्हॉल्व म्हणून? काँग्रेस स्वातंत्र्यासाठी स्थापन झाली होती तर कित्येक वर्षे देशाच्या पूर्ण स्वातंत्र्याची मागणीसुद्धा तिला का करता आली नव्हती? काँग्रेसने खिलाफत चळवळीचे समर्थन कशाला केले? काँग्रेसने नेताजी सुभाषचंद्र बोस यांना अध्यक्षपदावरुन दूर का केले, आझाद हिंद सेनेला कधीही सहकार्य का केले नाही? देशाच्या फाळणीचे नेमके कारण काय होते, स्वातंत्र्य की काँग्रेसी नेत्याची सत्ताकांक्षा? स्वातंत्र्यानंतर भारतीय सैन्य जम्मू-काश्मीरमध्ये धडक देत होते, तेव्हा अचानक युद्धविराम का केला गेला?
 
 
तिबेट चीनला आंदण म्हणून का दिले गेले? गिलगिट बाल्टिस्तान व अक्साई चीनचा प्रदेश काँग्रेसने का गमावला? पाकिस्तानने बळकावलेला भारतीय प्रदेश मुक्त करण्याच्या मागणीऐवजी इंदिरा गांधींनी शरण आलेल्या नापाक सैनिकांना का सोडले? राजीव गांधींना श्रीलंकेत शांतीसेना पाठवण्याची काय आवश्यकता होती? तसेच अलीकडच्या काळात चिनी कम्युनिस्ट पक्षाशी केलेल्या गुप्त करारातून काँग्रेसला कोणत्या देशप्रेमाचे प्रदर्शन करायचे होते? असे अनेक प्रश्न विचारले जातील व त्यांची उत्तरे देताना बाळासाहेब थोरातांच्या नाकी नऊ येईल.
 
 
दरम्यान, काँग्रेस व त्यांच्या पाळीव इतिहासकारांनी स्वतःची प्रतिमा देशासमोर अशी काही निर्माण करुन ठेवली की कोणीही त्या पक्षाला व त्यांच्या नेत्यांना प्रश्न विचारु नये. काँग्रेसरुपी देव्हार्‍यातील नेत्यांचे दैवतीकरण केले गेले जेणेकरुन त्या पक्षाची, त्यांच्या नेत्यांच्या भूमिकेची चिकित्सा करणेही दुरापास्त ठरावे. काँग्रेसने हे अर्थातच वर्षानुवर्षे उपभोगलेल्या सत्तेच्या बळावर केले, पण म्हणून सूर्य उगवायचा राहत नाही. देशातील जनतेत जसजशी जागृती येत गेली, तसतशी काँग्रेसची एक एक काळी करतुत समोर येत गेली. आता तर त्या पक्षाचे वस्त्रहरण झाले असून त्यांच्याकडे स्वतःची अब्रू झाकण्यासाठी कोणताही मुद्दा शिल्लक नाही.
 
 
ठिकठिकाणी झालेल्या लागोपाठच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसला जनता सातत्याने लाथाडत आहे, तरीही त्या पक्षाला अजूनही उमज आलेली दिसत नाही. म्हणूनच जम्मू-काश्मीरच्या ‘कलम ३७०’ व ‘३५ अ’च्या पुनर्स्थापनेसाठी प्रयत्नशील असलेल्या ‘गुपकर गँग’लाही काँग्रेसने पाठिंबा दिला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी यावरुनच काँग्रेसच्या नियतबद्दल सवाल केला.
 
 
मात्र, त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देण्यापेक्षा व आपली उडालेली भंबेरी लपवण्यासाठी थोरातांनी कालबाह्य मुद्दे उपस्थित केले. पण देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात इंग्रजांविरोधात लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर, महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस, चंद्रशेखर आझाद, भगतसिंग, सुखदेव, राजगुरु यांच्यासह लाखो योद्धे लढले, ते सर्वच आपल्या सर्वांचे पूर्वज आहेत. कारण स्वातंत्र्यलढा देशाचा होता, स्वातंत्र्यसैनिक देशाचे होते आणि देश आपल्या सर्वांचा आहे, त्यामुळे पक्षासाठी नव्हे तर देशासाठी लढणारा प्रत्येकजण आमचा आहे, काँग्रेसची पापे लपवणारी ती खासगी मालमत्ता नाही!
 


 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.