ज्येष्ठ गायक पं. दिनकर पणशीकर यांचे निधन

02 Nov 2020 19:56:08

Dinkar Panshikar_1 &
अंबरनाथ : जयपूर अत्रोली घराण्याचे ज्येष्ठ शास्त्रीय गायक आणि शिक्षक पं. दिनकर पणशीकर यांचे अल्पशा आजाराने अंबरनाथ येथे एका खाजगी रुग्णालयात निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात शंतनू आणि भूपाल ही दोन मुले आहेत. शंतनू पणशीकर तबलावादक तर भूपाल सतारवादक आणि गायक म्हणून कार्यरत आहे.
 
 
दिनकर पणशीकर यांचा जन्म १९३६ मध्ये मुंबईत झाला. गुजरातमधील पाटण येथे दत्तात्रय कुंटे यांच्याकडून त्यांनी शास्त्रीय संगीताचे धडे घेतले. त्यानंतर मुंबईत येऊन त्यांनी पं. वसंतराव कुलकर्णी, पं. सुरेश हळदणकर आणि माणिकराव ठाकुरदास यांच्याकडून शास्त्रीय संगीताचे रितसर शिक्षण घेतले. पुढे पं. निवृत्तीबुवा सरनाईक यांच्याकडून त्यांनी प्रदिर्घकाळ गाणे आत्मसात केले.
 
 
‘कट्यार काळजात घुसली' नाटकात पं. वसंतराव देशपांडे यांच्यासमवेत भूमिका साकारण्याची संधी पं. दिनकर पणशीकरांना लाभली. आडाचौताल या वैशिष्ट्यपूर्ण तालात त्यांची विशेष संशोधन केले. या तालात त्यांनी २०० हून अधिक बंदिशी रचल्या. कोलकत्ता येथील आयटीसी संगीत संशोधक अकादमीतर्फे त्यांना संगीत क्षेत्रातील संशोधनासाठी शिष्यवृत्ती मिळाली. गोवा कला अकादमीमध्ये संचालक म्हणून त्यांनी काम पाहिले. कर्नाटकमधील षडाक्षरी बुवांच्या नावाने दिला जाणारा मानाचा पुरस्कार, चतुरंग संगीत सन्मान आदी अनेक पुरस्कार त्यांना मिळाले. त्यांच्या निधनाने जुन्या पिढीतील एक विचारशील गायक कलावंत हरपल्याची भावना शास्त्रीय संगीत वर्तुळात व्यक्त होत आहे.
 
Powered By Sangraha 9.0