दार उघड बये दार उघड!

02 Nov 2020 19:24:21

Tulaja Bhavani_1 &nb

५ नोव्हेंबरपासून `तुळजाभवानी`समोर जागर

 
 
मुंबई : राज्यातील बंद असलेली मंदिरे १ नोव्हेंबरपर्यंत उघडण्याच्या मागणीला राज्य सरकारने कोणताही प्रतिसाद न दिल्याने आध्यात्मिक समन्वय आघाडीतर्फे गुरुवार दि. ५ नोव्हेंबरपासून श्रीक्षेत्र तुळजापूर येथे महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या प्रवेशद्वारासमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. आई तुळजाभवानीलाच आता 'दार उघड बये दार उघड' अशी आर्त साद घालण्यात येणार आहे. मंदिरे उघडण्यास सरकार परवानगी देईपर्यंत हे आंदोलन चालू राहणार आहे, अशी घोषणा आध्यात्मिक समन्वय आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी केली आहे.
 
 
आचार्य भोसले यांनी म्हटले आहे की, "राज्यपाल महोदयांना भेटून आध्यात्मिक समन्वय आघाडीने राज्य सरकारकडे १ नोव्हेंबरपर्यंत मंदिरे उघडण्याची मागणी केली होती. मात्र, राज्य सरकारने त्याबाबत कोणताही निर्णय घेतला नाही. तसेच, साधु- संतांच्या शिष्टमंडळाशी चर्चा देखील केली नाही. राज्यातील भाविक जनतेच्या भावनांपेक्षा ठाकरे सरकारला आपला अहंकार जपायचा आहे. त्यामुळे आता राज्यातील भाविक जनता मंदिरांवर लावलेले अन्याय आणि अहंकाराचे टाळे तोडून मंदिरे उघडणे सुरू करणार आहे. परंतु, लाखो कुटुंबांची उपजीविका अवलंबून असलेली सर्वच मोठी देवस्थाने राज्य सरकारच्या अधिपत्याखाली आहेत. त्याठिकाणी कडक पोलिस बंदोबस्त ठेवून देव-भक्तांच्या आड येण्याचे पाप हे हिरण्यकश्यपू राज्य सरकार करत आहे."
 
या विरोधात आध्यात्मिक समन्वय आघाडी गुरुवार ५ नोव्हेंबर रोजी श्रीक्षेत्र तुळजापूर येथे तुळजाभवानी मातेच्या प्रवेशद्वारासमोर ठिय्या आंदोलन करणार आहे. मंदिरे उघडण्याची घोषणा होत नाही आणि आम्हाला आई तुळजाभवानी मातेचे दर्शन होत नाही, तोपर्यंत आमचे आंदोलन कोणत्याही परिस्थितीत आम्ही मागे घेणार नाही अशी घोषणा आचार्य तुषार भोसले यांनी केली. आचार्य तुषार भोसले यांच्यासह प्रमुख साधु-संत, धर्माचार्य आंदोलन करणार आहे. या आंदोलनात सर्व धार्मिक-आध्यात्मिक संघटना, स्थानिक व्यावसायिक, तसेच सर्व राजकीय पक्ष व लोकप्रतिनिधी यांनाही सहभागी होण्याचे आवाहन आध्यात्मिक समन्वय आघाडीतर्फे करण्यात आले आहे.
 
राज्याचे प्रमुख म्हणून मंदिरांच्या दरवाजांचे टाळे उघडण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली. मात्र त्यांनी आमची मागणी ऐकली नाही. टाळे तोडण्याची इशारा दिला, तरीही सरकार ढिम्मच आहे. त्यामुळे आता आई तुळजा भवानीलाच `दार उघड बये दार उघड!` अशी आर्त साद घालण्यात येणार आहे. ५ नोव्हेंबरपासून छोट्या छोट्या मंदिरांना लावलेले अन्याय-अहंकाराचे टाळे तोडण्यात येतील. मात्र मोठ्या मंदिरांसमोर पोलीस बंदोबस्त असल्याने देवीचा जागर, गोंधळ, भारूड अशी गाणी गाऊन शासनाचा अहंकार दूर करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. मंदिर खुले होईपर्यंत हे आंदोलन चालू राहील, असा निर्धार आचार्य तुषार भोसले यांनी व्यक्त केला.
 
Powered By Sangraha 9.0