फडणवीसांची सिंहगर्जना!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Nov-2020
Total Views |

Devendra Fadanvis _1 
 
 
 
मुजोर शिवसेनेवर जनतेत प्रचंड रोष आहे आणि त्यांना आपली चीड व्यक्त करण्यासाठी मुंबई महापालिका निवडणूक ही संधीसारखी वाटते. परिणामी, शिवसेनेने कितीही हातपाय आपटले तरी तिची गच्छंती अटळच! देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेच्या तथाकथित वाघाविरोधात सिंहगर्जना करत तोच इशारा दिला.
 
 
नव्या कार्यकारिणीच्या काळातच मुंबई महानगरपालिकेवर भारतीय जनता पक्षाचा झेंडा फडकेल, अशी सिंहगर्जना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. मुंबई महापालिकेवर सध्या हिंदुत्वाशी व महाजनादेशाशी बेईमानी करणार्‍या शिवसेनेची सत्ता आहे. मात्र, फडणवीसांनी आतापासूनच शिवसेनेचे राज्य खालसा करण्याचा पण केला व भाजपचे पुढचे लक्ष्य मुंबई महापालिकाच असल्याचे स्पष्ट केले.
 
 
 
परिणामी, शिवसेनेने कितीही प्रयत्न केला तरी येत्या वर्ष-दीड वर्षात म्हणजेच २०२२ साली होणार्‍या महापालिका निवडणुकीत तो पक्ष यश मिळवू शकणार नाही, असे वाटते. कारण, देवेंद्र फडणवीस कधीही तोंडाने वाफा दवडण्याचे काम करत नाहीत किंवा रडतराऊंसारखे बरळतही नाहीत. मुंबईसह महाराष्ट्रातील एकूण स्थितीच अशी आहे की, विद्यमान सत्ताधारी पक्षाला सर्वच कंटाळले असून यांचे कधी एकदाचे विसर्जन करु, अशी मतदारांची भावना आहे. फडणवीसांनाही हे चांगलेच समजते व म्हणूनच जनतेच्या मनात काय सुरु आहे, ते ओळखून त्यांनी मुंबई महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकावण्याचा विश्वास व्यक्त केला.
 
 
दरम्यान, परंपरेने सांगितल्या जाणार्‍या एका गोष्टीचा उल्लेखही देवेंद्र फडणवीस यांनी केला. बुधवारी भारतीय जनता पक्षाच्या नव्या कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली, तेव्हा ते बोलत होते. राजाचा जीव पोपटामध्ये असतो, तसाच काही लोकांचा जीव मुंबई महापालिकेमध्ये गुंतलेला असल्याचे फडणवीसांनी सांगितले. ते ‘काही लोक’ म्हणजेच शिवसेना व शिवसेनेचे कर्तेधर्ते, पण गोष्टीतला राजा पोपटाचे किती लाड करतो, पोपटाची किती जपणूक करतो, हेही नेहमी सांगितले जाते.
 
 
इथे नेमकी त्याच्या उलट परिस्थिती आहे, आताचा कोरोना महामारीचा काळ असो किंवा मागील २५ वर्षांचा काळ असो, शिवसेनेने मुंबई महापालिकेचे लाड किंवा जपणूक करण्याऐवजी मातेरे करण्याचेच काम केले. देवेंद्र फडणवीसांच्याच शब्दांत सांगितले तर, “मुंबई महापालिका आज भ्रष्टाचाराचे आगार झाली आहे. आता भ्रष्टाचार कोण करणार तर महापालिकेतील सत्ताधारीच आणि अशा लोकांना सत्तेतून उखडून फेकणे, हे प्रत्येक मुंबईकराचे कर्तव्य ठरते. कारण, मुंबई महापालिकेत शिवसेनेचा जीव आहे, पण तो फक्त अर्थपूर्ण सत्तेपुरता, सर्वसामान्य मुंबईकरांसाठी नव्हे!”
 
 
 
सर्वसामान्य मुंबईकराच्या नशिबी सत्ताधारी शिवसेनेने फक्त खड्डेमय रस्त्यातून जीवघेणा प्रवास, पावसाळ्यात गटारात पडून मृत्यू, नालेसफाईच्या नावाखाली पैसाच साफ करणे, दळणवळण साधनांची अनुपलब्धता, मुर्दाड आरोग्य सुविधा आणि अशाच कितीतरी समस्या दिल्या. मराठी माणसांच्या भल्याच्या नावाखाली त्याला गिरगाव, लालबाग, परळ, दादर वगैरे भागातून थेट वसई-विरार, अंबरनाथ-बदलापूर किंवा पनवेलपर्यंत मागे रेटले. हिंदुत्वाचे कैवारी म्हणत करिश्मा भोसले, पालघरमधील साधू आणि हिंदूंना न्याय देण्यापेक्षा अन्याय करण्याचेच काम केले. सर्वात वाईट स्थिती तर कोरोनाच्या संकटात झाली, शिवसेना सत्तेत असूनही रुग्णांचे, स्थलांतरितांचे हाल झाले.
 
 
 
रुग्णांना रुग्णवाहिका किंवा रुग्णशय्या मिळण्याचीही मारामार झाली, स्थलांतरित मजुरांना कोणत्याही सोयी-सुविधेसह इथून जायला भाग पाडले गेले. अलीकडच्या काळात बॉलीवूडमधील नशेडींना पाठीशी घालण्यासाठी अमली पदार्थांविरोधात बोलणार्‍यांविरोधातच कारवाई करण्याची तत्परता दाखवली. म्हणजे सत्ताधारी म्हणून जनहिताची जी जी कामे करणे गरजेचे होते, ते सोडून शिवसेनेने मुंबईत सारे काही केले. अशा शिवसेनेविरोधात सर्वसामान्य मुंबईकरांत प्रचंड चीड असून त्याचा उद्रेक महापालिका निवडणूक घडवण्यासाठी मतदार उत्सुक आहे. देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेच्या याच नाकर्तेपणाच्या कारभाराला फेकून देण्याची घोषणा केली व त्यात ते यशस्वीही होतील.
 
 
 
शिवसेनेने आपल्याकडे सत्ता असल्याचा गैरफायदा घेत दहशत माजवण्याचा प्रकारही वेळोवेळी केला. विरोधी व्यक्तीचा आवाज दाबण्यासाठी त्याचे मुंडण करणे किंवा व्यंगचित्र सामायिक केल्याने थेट माजी नौदल अधिकार्‍याला मारहाण करण्याचे संतापजनक कृत्य शिवसेनेने केले. इतकेच नव्हे, तर विद्यमान राज्य सरकारमधील मंत्र्याच्या बंगल्यावर नेऊन विरोधी बोलणार्‍या तरुणाला मारहाण केली गेली, पण त्याचाही साधा निषेध शिवसेनेने केला नाही. म्हणजेच शिवसेनेला सर्वसामान्य मुंबईकरांची कदर नाही, हे तर इथली बजबजपुरी पाहून समजतेच, पण लोकशाही व्यवस्थेतील वेगळे मत व्यक्त करण्याच्या स्वातंत्र्याला शिवसेना मान्य करत नाही,हेही यातून स्पष्ट होते. अशा मुजोर शिवसेनेवर जनतेत प्रचंड रोष आहे आणि त्यांना आपली चीड व्यक्त करण्यासाठी मुंबई महापालिका निवडणूक ही संधीसारखी वाटते. परिणामी, शिवसेनेने कितीही हातपाय आपटले तरी तिची गच्छंती अटळच!
 
 
 
दरम्यान, फडणवीसांनी मुंबई महापालिकेवर भाजपची सत्ता आणण्याच्या विश्वासाला आकडेवारीचाही आधार आहे. गेल्यावेळी २०१७ सालच्या महापालिका निवडणुकीत शिवसेनेने ८४ जागा जिंकल्या होत्या, तर भाजपने ८२. तत्पूर्वी २०१२ साली शिवसेनेने ७५, तर भाजपने ३१ जागा, म्हणजेच पाच वर्षांत भाजपच्या ५१ जागा वाढल्या. तसेच मतविभागणी पाहता २०१७ साली भाजपला २७-२८ टक्के, तर शिवसेनेला २८.२९ टक्के मते मिळाली होती. २०१२ साली भाजपला ६.७८ टक्के आणि शिवसेनेला १७.३४ टक्के मते मिळाली होती. एकूणच मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपला मिळणार्‍या मतदारांच्या प्रतिसादाची शिवसेनेशी तुलना करता, कोण अधिक प्रबळ व लोकप्रिय हे सहज दिसून येते.
 
 
 
सोबतच लोकसभा व विधानसभा निवडणुकीतील मतदानाचाही मपाहालिका निवडणुकीवर प्रभाव पडू शकतो. आता तर भाजप संपूर्ण ताकदीनिशी स्वबळावर मुंबई महापालिका निवडणूक लढवेल, आधी मैत्रीखातर, दोस्तीत कुस्ती नको म्हणून भाजपने शिवसेनेला मुंबई महापालिकेची सत्ता दिली होती. पण, गेल्या काळातील शिवसेनेने चालवलेला कडवा भाजपविरोध, भाजपद्वेष पाहता भाजप कार्यकर्ते आगामी निवडणुकीत शिवसेनेची मस्ती उतरवल्याशिवाय राहणार नाहीत. देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेच्या तथाकथित वाघाविरोधात सिंहगर्जना करत तोच इशारा दिला.





@@AUTHORINFO_V1@@