कॉंग्रेसमध्ये ज्येष्ठ नेत्यांना डावलण्यास सुरुवात ?

19 Nov 2020 15:09:07

Kapil Sibbal_1  
 
 
नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये एनडीएने बाजी मारल्यानंतर कॉंग्रेसचा समावेश असलेल्या महागठबंधन आघाडीला हार मानावी लागली. एकीकडे भाजपला ७४ जागांवर यश आले, तर दुसरीकडे कॉंग्रेस पक्षाला फक्त १९ जागांवरच समाधान मानावे लागले. त्यांच्या या अपयशामुळे कॉंग्रेस नेत्यांमध्ये मोठी दरी निर्माण झाल्याचे चित्र दिसून येत आहे. कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी निवडणुकांवरून झालेल्या कॉंग्रेसच्या पराजयावर घराचा आहेर दिला. यावर अधीर रंजन चौधरी यांनी त्यांना पक्ष सोडण्याचा सल्ला दिला.
 
 
बिहार निवडणूक तसेच, गुजरात पोटनिवडणूकही कॉंग्रेसला पराभवाचा सामना करावा लागला. यावर कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी मत व्यक्त करताना सांगितले की, "केवळ बिहारच नाही तर देशातील ज्या ठिकाणी पोटनिवडणुका झाल्या. तेथील जनतेने काँग्रेसला सपशेल नाकारले आहे. काँग्रेसला गुजरातच्या पोटनिवडणुकीत एकाही जागेवर विजय मिळालेला नाही. तर तीन ठिकाणी काँग्रेसच्या उमेदवारांचे डिपॉझिटही जप्त झाले आहे. गुजरातमध्येही लोकसभा निवडणुकीत हेच घडले होते. तर काँग्रेसच्या उमेदवारांना उत्तर प्रदेशच्या पोटनिवडणुकीतही काही ठिकाणी दोन टक्के मते मिळाल्यामुळे जनमताचा संदेश स्पष्ट आहे की त्यांनी आपल्याला नाकारले आहे."
 
 
'ज्यांना काँग्रेस पसंत नसेल त्यांनी दुसऱ्या पक्षात जावे किंवा नवा पक्ष काढावा,' असा सल्ला काँग्रेसचे लोकसभेतील गटनेते अधीर रंजन यांनी कपिल सिबल यांना दिला. ते म्हणाले की, "काही न करताच बोलणं याला आत्मपरिक्षण म्हणायचं का? कपिल सिब्बल यांनी यापूर्वीही असेच मत व्यक्त केले होते. ते काँग्रेस पक्ष आणि आत्मपरिक्षणाच्या मुद्द्यावर खूप चिंतित आहेत. पण आम्ही त्यांना बिहार, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, गुजरात निवडणुकीत कुठेच पाहिले नाही."
 
 
 
Powered By Sangraha 9.0