वीजबिल माफीच्या लढ्यात भाजपही राज ठाकरेंसोबत: बावनकुळे

19 Nov 2020 13:17:06

raj thackeray_1 &nbs


मुंबई :
वाढीव वीजबिलाबाबतच्या भूमिकेबद्दल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं मनापासून अभिनंदन. भाजप सुद्धा त्यांच्यासोबत या आंदोलनात असेल, अशी मोठी घोषणा भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. भाजपने महापालिका निवडणुकीसाठी मुंबईत मोर्चेबांधणी सुरू केलेली असतानाच बावनकुळे यांनी हे विधान केल्याने या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि मनसेत खलबत सुरु असल्याच्या चर्चाना उधाण आले आहे. भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज पत्रकार परिषदेदरम्यान हे विधान केले.



दरम्यान,राज्यातील वाढीव वीजबिलांबाबत ठाकरे सरकारने कोणताही दिलासा नाही, इतकचं नाही तर वीज वापरली असेल तर बिल भरावेच लागेल, कुठलीही माफी आणि सवलत देणार नाही असं स्पष्टपणे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी जनतेला सांगितले, त्यामुळे लॉकडाऊन काळात आर्थिक संकटात असणाऱ्या वीज ग्राहकांना मोठा झटका बसला. मात्र सरकारच्या या निर्णयावरुन सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील संघर्ष पेटण्याची चिन्हे आहेत.


ठाकरे सरकारच्या या निर्णयाविरोधात आज मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या उपस्थितीत पक्षाची महत्त्वाची बैठक पार पडत आहे, परंतु तत्पूर्वी मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विट करुन सरकारला इशाराच दिला. संदीप देशपांडे यांनी ट्विटमध्ये म्हटलंय की, वीज बिला संदर्भात निवेदन, अर्ज, बैठका, विनवण्या सगळं झालं. पण सरकार ढिम्म आहे. जनतेला दिलासा देण्यासाठी साहेबांच्या आदेशानंतर रस्त्यावर संघर्ष करावाच लागेल कारण"लाथो के भूत बातों से नही मानते" अशा शब्दात येणाऱ्या काळात मनसे वीजबिलाच्या माफीसाठी रस्त्यावर उतरण्याचे संकेत मिळत आहेत.

तर मनसेच्या या आंदोलनात भाजप मनसेसोबत असल्याचे चंद्रशेखर बावनकुळेंनी सांगितले. ते म्हणतात, "महावितरण वीज कनेक्शन तोडणीसाठी आलं तर भाजप आपला झेंडा घेवून तिथे हजर राहणार. नितीन राऊत यांच्या पाठीशी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री नाही, त्यामुळे अधिकारी त्यांना गांभीर्यानं घेत नाहीत. आजच्या आज साडेतीन हजार कोटी रुपये ऊर्जा विभागाला दिले तर सर्व प्रश्न सुटतील.१९५६ च्या नागपूर करारानुसार हिवाळी अधिवेशन नागपुरात घेतलं नाही. मुंबईत अधिवेशन होऊ शकतं नागपूरात होऊ शकत नाही? या अधिवेशनात मोठ्या संख्येनं मोर्चे येणार म्हणून अधिवेशन मुंबईत नेलं. मुख्यमंत्री नागपूरला यायला घाबरतात, मग दिल्लीला काय जाणार?विदर्भ वैधानिक महामंडळ बंद पाडण्याचं काम या सरकारने केलंय. मुख्यमंत्री, उपमुख्यनंत्र्यांची जबाबदारी काय?, ते कधी दिल्लीला गेलेत का? पंतप्रधानांना भेटले का? विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस उद्या आणि परवा नागपूरच्या दौऱ्यावर असल्याचेही त्यांनी सांगितले.
Powered By Sangraha 9.0