दिव्यत्वाची जेथ संगती...!

    दिनांक  18-Nov-2020 21:36:34
|

page 8 _1  H x
 
 
 
 
 
आज आपला देश आणि सारे जग वाईट व राक्षसी प्रवृत्तींकडे वळत आहे. सर्व प्रकारची साधने व सांपत्तिक ऐश्वर्य उपलब्ध असतानादेखील तो आसुरी प्रवृत्तींमुळे दुःखाच्या सागरात स्वतःला ओढवून घेत उद्ध्वस्त होत आहे. अशा या विनाशकाळामध्ये माणसाला माणुसकीच्या व दिव्यत्वाच्या मार्गावर आणण्याकरिता आणि मानवतेची तत्वे धारण करण्याकरिता वरील मंत्रांश फारच उपयुक्त ठरणारा आहे.
 
 
 
देवानां भद्रा सुमतिर्ऋजुयतां, देवानां रातिरभि नो निवर्तताम्।
देवानां सख्यमुपसेदिमा वयं, देवा न आयु: प्रतिरन्तु जीवसे॥

(ऋ.१/८९/२, यजु.२५/१५)
 
 
अन्वयार्थ
 
 
हे परमेश्वरा, या जगात (ऋजुयतां देवानाम्) जे ऋजुगामी म्हणजेच सरळमार्गी, सत्यगामी, प्रामाणिक, निष्कपटी, दिव्य गुण-कर्म स्वभावी लोक आहेत, अशांची (सुमति:) सद्बुद्धी, सदिच्छा (न:) आम्हा सर्वांवर बरसू दे! (देवानां) अशाच देवजनांच्या (राति:) दानाचा (न:) आम्हांवर (अभि निवर्तताम्) चहुबाजूंनी वर्षाव होत राहो. (वयं) आम्ही सर्वजण (देवानाम्) या देवांच्या (सख्यम्) मित्रसंगतीला (उपसेदिम) नेहमीच प्राप्त करोत, त्यांच्याशी समान संगती करोत. (देवा:) हे दिव्यजन (जीवसे) सर्वस्वी पूर्ण जीवनाकरिता (न: आयु:) आमचे आयुष्य (प्रतिरन्तु) वाढवित राहो..!
 
 
विवेचन
 
 
सामाजिक आरोग्य सुदृढ ठेवण्याकरिता चांगल्या सदाचारी माणसांची गरज असते. आपल्या उत्तम गुण, कर्म, स्वभावांनी स्वत:चे जगणे आदर्श बनविलेले प्रतिष्ठित लोक समाजात असले की सभ्य व सुसंस्कृत पिढी घडण्यास मदत होते. अशी माणसे प्रामाणिक, निष्कपटी, निर्मळ मनाची आणि दूरदृष्टी बाळगणारी असतात. विशालहृदयी, सुस्वभावी, परोपकारी आणि चारित्र्यसंपन्न असलेली ही मंडळी दिव्योत्तम ठरतात. म्हणूनच अशांकरिता ‘देव’ ही संज्ञा दिली जातात. कारण, देव हे दिव्यत्वांच्या गुणांनी परिपूर्ण असतात.
 
 
सामान्य लोकांप्रमाणे त्यांचे जीवन नसते. समाज व राष्ट्राच्या कल्याणासाठी ते सतत प्रयत्नशील असतात. यास्काचार्यानुसार - ‘देवो दानाद् वा, द्योतनाद्दीपनाद् वा’ म्हणजेच जे दान करतात, आपल्या सद्गुणांनी स्वत: चमकतात व इतरांना चमकवतात. अर्थातच, जे प्रकाशमान असतात, ते देव असतात. समाजात अशा दिव्य गुणांना हृदयात बाळगणारे लोक असले की परमेश्वराची व्यवस्थादेखील चांगल्या पद्धतीने चालते. हे देवलोक नेहमी ऋजुगामी असल्याने जगात ते इतरांकरिता जणू कांही प्रेरणास्तंभ ठरतात.
 
 
सदरील मंत्रात चारही चरणात चार वेळा ‘देव’ शब्दाचा उल्लेख आला आहे. देव लोक हे इतरांचे भले करण्यात तल्लीन असतात. त्यांची बुद्धी व विचार हे सर्वसामान्य लोकांच्या कल्याणाकरिता सदैव तत्पर असतात. अहर्निश त्यांना हाच एक ध्यास असतो की, समाज सद्विचारांनी कसा मार्गक्रमण करेल? म्हणूनच प्रारंभी समाजातील इतर लोकांवर देवजनांच्या सुबुद्धीचा, सद्विचारांचा वर्षाव होवो, अशी प्रार्थना केली आहे.
 
 
 
 
त्याचबरोबरच देवलोकांचे दानही आम्हाला मिळत राहो, अशी कामना व्यक्त झाली आहे. कारण, त्यांचे धन हे धर्मपूर्वक मिळवलेले असते. सत्यमार्गाने व प्रामाणिकपणे आलेली पुण्याईची कमाई म्हणजे पवित्र संपदा...! या पवित्र धनाचे दान मिळाले, तर त्याचे लाभदेखील मोठ्या प्रमाणात होतात. भ्रष्ट मार्गाने कमविलेल्या संपत्तीचे दान हे अशुद्ध, अपवित्र मानले जाते. पण, सन्मार्गाने, कष्टाने, मेहनतीने प्राप्त केलेल्या दानामुळे मोठ्या प्रमाणावर समाजनिर्मितीचे कार्य घडते. यासाठीच अशा देवलोकांकडून लोकांवर दानाचा वर्षाव होत राहो, वाईटांकडून, दुर्जनांकडून कदापि नव्हे..!
 
 
 
 
देवजनांची मित्रता फारच मोलाची असते. त्यांच्याशी झालेले सख्य इतरांना सन्मार्गावर आणणारे ठरते. दुष्टांचे मित्रत्व अपायकारक तर सज्जनांचे (देवतांचे) मित्रत्व उपायकारक आणि अनेक श्रेष्ठ गुणांचा लाभ मिळवून देणारे असते. म्हणूनच आमचे दिव्य अशा महापुरुषांशी मित्रत्वाचे नाते स्थापन व्हावे, अशी प्रार्थना करण्यात आली आहे. कारण, देवाजनांमुळे माणसांचे मानसिक, आत्मिक, शारीरिक व सामाजिक आरोग्य विकसित होऊन दीर्घायुष्य वाढण्यास मदत होते. याउलट राक्षसी वृत्तीच्या असुरांमुळे, दुर्जनांमुळे आयुष्य घटते. या मंत्रातून सत्पुरुषांची संगती करण्याचा मौलिक संदेश मिळतो.
 
 
 
 
देव हे दोन प्रकारचे असतात. पहिले जड तर दुसरे चेतन! जड देव हे ३३ आहेत. आपण शास्त्रात ३३ कोटी देवतांचा उल्लेख वाचतो. खरेतर ‘कोटी’ शब्दालाच प्रकार तेव्हा विभाग असेदेखील म्हणतात. म्हणूनच ते ३३ कोटी नसून ३३ प्रकारचे देव असे समजले पाहिजे. यामध्ये ८ वसू ,११ रुद्र, १२ आदित्य, १ विद्युत, १ यज्ञ असे एकूण ३३ जड देव आहेत. आकाश, वायु, अग्नि, जल, पृथ्वी, सूर्य, चंद्र आणि नक्षत्र असे हे आठ वसू होय. ज्यावर की सर्व जीवसमूह वसतात, म्हणजेच निवास करतात.
म्हणूनच हे वसू आहेत. प्राण, अपान, समान, उदान, व्यान, नाग, कूर्म, कृकल, देवदत्त, धनंजय व जीवात्मा हे अकरा रुद्र आहेत. म्हणजेच हे शरीराबाहेर पडताना प्राणिमात्राला रडवतात. म्हणून यांचे नाव रुद्र होय. बारा आदित्य म्हणजेच वर्षातील बारा महिने! जसे की चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, आश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ आणि फाल्गुन! हे बारा महिने आम्हा सर्वांच्या आयुष्याला वाढवितात. म्हणूनच यांचे नाव आदित्य आहे, तर बत्तिसावा देव विद्युत म्हणजेच वीज! हा परम ऐश्वर्याचे कारण आहे, तर शेवटचा तेहतिसावा देवता यज्ञ होय. कारण, यज्ञ म्हणजेच अग्निहोत्राच्या माध्यमाने हा समग्र विश्वातील वायू आणि जलाची शुद्धी होते.
 
 
 
हे ३३ जड देव, तर चेतन देव म्हणजेच माता, पिता, आचार्य, विद्वान, अतिथी आणि परिसरातील सज्जनवृंद किंवा गाव व शहरातील प्रतिष्ठित मंडळी! या चेतन देवता अन्न, वस्त्र, निवारा या गरजा पुरविण्याबरोबरच ज्ञान, विद्या व आचार-विचारांनी आम्हा सर्वांचे जीवन पवित्र व मंगलमय बनवतात! देशातील संत, सुधारक, समाजसेवक, विचारवंत, वैज्ञानिक आणि धर्मात्मे, भले पुरुष हे सर्व देवच आहेत. या सर्वांमुळे व्यक्ती, कुटुंब, समाज व राष्ट्राची जडणघडण होते. नवी दिशा व चालना मिळते. सभ्य व संस्कारशील समाज उदयास येण्यास मदत मिळते. म्हणूनच अशा दिव्य तत्त्वांनी परिपूर्ण अशा देवांचे सहकार्य, सदिच्छा, आशीर्वाद व शुभेच्छा सर्व समाजघटकांना मिळत राहतील. तेव्हा निश्चितच ती भूमी धन्य होते. म्हणूनच वेदमंत्र म्हणतो- ‘देवानां राति: अभि नो निवर्तताम्!’
 
 
 
‘राति:’ म्हणजेच दानशीलता आणि ‘अराति:’ म्हणजेच दानहीनता! वरील सर्व देवता या मुळातच राति आहेत. पण, माणूस मात्र अराति आहे. त्याची चेंगट व दानहीन वृत्ती त्याला प्रगतीपासून रोखते. उन्नती आणि विकास हा दातृत्वाने घडत असतो. म्हणूनच माणसाने या समग्र जड व चेतन देवतांकडून दानशूरता शिकावी. या देवता आम्हा सर्वांवर चहुकडून ज्ञान, ऐश्वर्य, सुख-समृद्धी व सद्बुद्धीचा वर्षाव करीत असतात. कोणत्याही प्रकारच्या मोबदल्याची अपेक्षा न करता, हे सर्वजण सार्‍या जगावर दिव्य गुणांची वृष्टी करण्यात तल्लीन असतात. मंत्राचा उत्तरार्ध अशा देवांच्या व सज्जनांच्या संगतीत राहण्याचा उपदेश करतो. त्यांच्या सान्निध्यात राहत आम्ही आमचे जीवन यशस्वी करावे व सदैव प्रगतीच्या दिशेने झेप घ्यावी. खरोखरच सत्संग हा मानवाला सन्मार्ग दाखविणारे व समुज्ज्वल बनविणारे खरे तीर्थ आहे.
 
 
 
 
आचार्य भर्तृहरी सत्संगाचे महत्त्व वर्णन करताना म्हणतात - सत्संगति: कथय किं न करोति पुसाम्। अर्थात, दिव्यतत्वांची, देवांची व संतांची संगती ही माणसाचे कोणते कल्याण साधत नाही? थोरामोठ्यांची व महापुरुषांची संगती ही आपल्या बुद्धीचे जडत्व दूर करते. वाणीमध्ये सत्याचे सिंचन करते. आम्हां सर्वांच्या मान-सन्मानाचा व उन्नतीचा मार्ग प्रशस्त करते. पापाला नाहीसे करते. मनाला प्रसन्न व आनंदी बनविते.
 
 
 
सर्व दिशांमध्ये आपले यश व कीर्ती पसरवते. म्हणूनच वेदमंत्र म्हणतो- देवानां सख्यम् उपसेदिम वयम्। याच अनुषंगाने आपल्या संतांनीदेखील किती सुंदर शब्दात म्हटले आहे - ‘सत्संगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो!!’ या देवांच्या संगतीमुळे सर्वात मोठा लाभ होतो, तो म्हणजे माणूस दुःख-दारिद्य्रापासून व अज्ञानापासून दूर होऊन उत्तम आरोग्य प्राप्त करतो. माणसाचे दीर्घायुष्य हे सत्संगतीमुळेच वाढते, अन्यथा दुर्जनांची संगती ही माणसाला अनर्थाकडे घेऊन जाते. दुष्टांच्या संगतीत राहून माणूस राक्षस बनतो आणि जीवन उद्ध्वस्त करावयास तत्पर होतो. त्याची उन्नती कदापि होऊ शकत नाही. याउलट अधोगती मात्र सतत होत राहते.
 
 
 
आज आपला देश आणि सारे जग वाईट व राक्षसी प्रवृत्तींकडे वळत आहे. सर्व प्रकारची साधने व सांपत्तिक ऐश्वर्य उपलब्ध असतानादेखील तो आसुरी प्रवृत्तींमुळे दुःखाच्या सागरात स्वतःला ओढवून घेत उद्ध्वस्त होत आहे. अशा या विनाशकाळामध्ये माणसाला माणुसकीच्या व दिव्यत्वाच्या मार्गावर आणण्याकरिता आणि मानवतेची तत्वे धारण करण्याकरिता वरील मंत्रांश फारच उपयुक्त ठरणारा आहे. हा सदाशय जगाच्या प्रत्येक मानवाच्या हृदयात उतरो आणि सर्वजण शाश्वत सुखी व आनंदी बनोत, हीच कामना!!प्रा. डॉ. नयनकुमार आचार्य  
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.