कोरेगाव भीमा प्रकरण : वरावरा राव यांना नानावटीत दाखल करण्याचे निर्देश

18 Nov 2020 14:46:08

Varavara rao_1  
 
 
पुणे : भीमा कोरेगाव प्रकरणामध्ये अटक करण्यात आलेल्या वरवरा राव यांना नानावटी रुग्णालयात दाखल करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी तसे आदेश दिले आहेत. त्यांना १५ दिवस उपचारासाठी दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हा उपचाराचा खर्च राज्य सरकारने उचलावा असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. रुग्णालयाच्या अटींनुसार त्यांच्या कुटुंबियांना भेटण्याची परवानगी द्यावी, असेही न्यायालयाने म्हटले आहे.
 
 
 
मुंबई उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती शिंदे व न्यायमूर्ती माधव जामदार यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. वरावरा राव यांच्या जामीन अर्जाला एनआयएकडून विरोध करण्यात आलेला आहे. ज्येष्ठ विचारवंत वरावरा राव यांना २०१८ मध्ये यूएपीएअंतर्गत अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांच्या कुटुंबाकडून त्यांच्या प्रकृतीसंदर्भात पुढील उपचार करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयामध्ये जामीन अर्ज दाखल करण्यात आला होता.
 
 
 
राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून त्याला विरोध करण्यात आला होता. कोरोना संक्रमण पाहता वरावरा यांचे वय ८१ वर्ष असून, त्यांना इतर आजार असल्यामुळे उपचार करण्यासाठी जामीन देत नानावटी रुग्णालयामध्ये उपचार घेण्याचे आदेश द्यावेत, याबाबत राव यांच्या कुटुंबीयांकडून याचिका दाखल करण्यात आली होती. तसेच, वरावरा राव यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी ९ डिसेंबरपर्यंत स्थगित करण्यात आली आहे. मे महिन्यात त्यांची प्रकृती खालावल्यामुळे जामीनाची मागणी करण्यात आली होती. मात्र, ही मागणी फेटाळत त्यांच्यावर तळोजा कारागृहातच उपचार सुरू ठेवण्यात आले होते. त्यानंतर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून ८१ वर्षांच्या वरावरा राव यांना जामीन देण्यात यावा अशी मागणी त्यांच्या वकिलांनी केली होती. मात्र, अद्याप त्यांना जामीन देण्यात आला नाही.
 
 
 
Powered By Sangraha 9.0