किन्नर भगिनींचे स्नेहसंमेलन आणि त्यांच्यातले माणूसपण

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Nov-2020   
Total Views |
1_1  H x W: 0 x
स्वयं महिला मंडळाने दि.१३ नोव्हेंबर रोजी भांडुप येथे किन्नर भगिनींसोबत दिवाळी साजरी केली. ते एक अनोखे स्नेहसंमेलनच होते. यावेळी स्वयं महिला मंडळासोबत विविध सामाजिक संस्था यामध्ये सहभागी झाल्या होत्या. रा.स्व.संघ कोकण प्रांत कार्यवाह विठ्ठल कांबळे हेसुद्धा सहभागी झाले होते. किन्नर भगिनींना साडी आणि मिठाई वाटप असे कार्यक्रमाचे स्वरूप होते. मात्र, विठ्ठल कांबळे यांनी किन्नर रामायण संदर्भ दिला आणि स्नेहसंमेलनाचे चौकट स्वरूप बदलले. किन्नर भगिनींनी आपले सुखदु:ख, आपले जगणे, आपले असणे यावर मनमोकळ्या गप्पा मारल्या. त्यांनी जे काही सांगितले, ते सभ्य मानवतावादी समाजाला विचार करायला लावणारे आहे. आजही समाजाने यावर विचार करून कृती करायला हवी. त्या स्नेहसंमेलनाचा घेतलेला मागोवा...
 
 
भारतीय संस्कृती आणि कार्यशक्तीमध्ये तुम्हा सगळ्यांचे मोठे योगदान आहे. रामायणातली कथा माहिती आहे ना? राम ज्यावेळी रावणवध करून अयोध्येला निघाले. १४ वर्षे वनवास संपवून अयोध्येत परततात, तेव्हा त्यांना वेशीवर काही लोक त्यांची प्रतीक्षा करताना आढळतात. त्यांची विचारणा केल्यावर प्रभू रामचंद्रांना कळते की, १४ वर्षांपूर्वी प्रभू श्रीरामचंद्रांना अयोध्या सोडताना निरोप द्यायला आलेल्यांना श्रीराम म्हणाले, “बंधू, तुम्ही माघारी जा, भगिनींनो, तुम्ही पण माघारी जा.”
 
 
त्यावेळी प्रभू श्रीरामचंद्रांना निरोप द्यायला आलेले बंधूभगिनी जड अंत:करणाने अश्रू दाटल्या नयनांनी प्रभू रामचंद्रांना निरोप देत माघारी गेले. पण हे लोक तिथेच श्रीरामाची प्रतीक्षा करत थांबले होते. प्रभूंनी विचारले, “तुम्ही नाही गेलात का?” यावर ते लोक म्हणाले, ’‘भगवंत, आम्ही बंधूही नाहीत आणि भगिनीही नाहीत. आम्ही किन्नर आहोत. तुम्ही ‘किन्नरांनो, माघारी जा’ असे म्हणाला नाहीत. म्हणून आम्ही इथेच आहोत, तुमची प्रतीक्षा करत.” त्यांची भक्ती श्रद्धा पाहून प्रभू रामचंद्र त्यांना आशीर्वाद देतात की, तुमचा आशीर्वाद कधीही वाया जाणार नाही. साक्षात प्रभू श्रीरामांचा आशीर्वाद लाभलेले तुम्ही सगळे आहात. तुम्हाला नमस्कार...”
 
 
रा.स्व.संघ कोकण प्रांत कार्यवाह विठ्ठल कांबळे असे म्हणाले आणि समोर बसलेल्या किन्नर भगिनींच्या चेहर्‍यावर स्मितहास्य पसरले, डोळ्यात तेज उमलले. त्यातल्या काही जणी म्हणून लागल्या, ”अगदी खरं हाय. आमचा आशीर्वाद कदी बी वाया जात नाय.” या स्वयं महिला मंडळाने दिवाळीनिमित्त किन्नर भगिनींचे स्नेहसंमेलन आयोजित केले होते. तिथे या सर्वजणी उपस्थित होत्या. दिवाळी, त्यातही १३ तारखेचा कार्यक्रम होता. दुसर्‍या दिवशी लक्ष्मीपूजनाचा दिवस. किन्नर भगिनींसाठी हा मुहूर्त अत्यंत महत्त्वाचा. त्यामुळे या दिवाळी स्नेहसंमेलनाला किन्नर भगिनी प्रतिसाद देतील का, असे वाटले होते. पण, विठ्ठल कांबळे यांनी रामायण, प्रभू रामचंद्र, आशीर्वाद वगैरे वगैरे संवाद सुरू केल्यावर या सगळ्या किन्नर भगिनीही संवाद चर्चा करू लागल्या. काही मिनिटांपूर्वी जायची घाई असणार्‍या या भगिनी मग आपापले अनुभव सांगू लागल्या आणि कार्यक्रम दोन तास रंगला.
 
 
 
किन्नर भगिनींचे वैयक्तिक आयुष्य कसे असेल? आपण त्यांना ज्या स्वरूपात पाहतो ती त्यांची स्वयंप्रेरणा आहे की त्यांच्यावर ते तसे लादलेले आहे? त्यांचे कुटुंब असते का? असेल तर मग किन्नर भगिनी कुटुंबासोबत राहतात का की नाही राहत? हा विचार सहसा कुणी करत नाही. दुर्दैवाने म्हणावे लागेल की, स्त्री आणि पुरूष या दोन कक्षांच्यापुढे आपण मानवी स्वरूप स्वीकारायलाच पाहत नाही. पण या स्नेहसंमेलनामध्ये संवाद करताना या सगळ्या प्रश्नांची अवचितपणे वाट मोकळी झाली. या सगळ्या प्रश्नांचा संदर्भ घेत अत्यंत मोकळ्या वातावरणात स्नेहसंमेलन सुरू झाले. या किन्नर भगिनींमध्ये सर्वच वयोगटातील भगिनी होत्या. एकीने सलवार कुर्ता घातला होता, बाकी सर्वजणी साडी नेसल्या होत्या.
 
 
ती सलवार कुर्ता घातलेली भगिनी आधुनिक दिसत होती. तिची माहिती अशी की, ती एका संपन्न घरातली एकुलती एक. ती किन्नर होती, पण तिच्या पालकांनी हे तिचे अस्तित्व अमान्य केले. तिचे मुलींसारखे नटणे, सजणे यावर कठोर आक्षेप घेतला. या सगळ्या वातावरणात तिने फार्मसी डिप्लोमापर्यंत शिक्षण घेतले. घरची आर्थिक परिस्थिती सुसंपन्न असल्याने नोकरीची गरज नव्हतीच, मग ती या किन्नर भगिनींमध्ये सामील झाली. तिच्या मते तिला मोकळा श्वास घ्यायला मिळाला. तिची कहाणी ऐकून वाटले जर तिला तिच्या घरून, समाजाने आहे त्या स्वरूपात स्वीकरले असते, माणूस म्हणून सन्मान दिला असता तर कदाचित तिचे भवितव्य वेगळे असते.
 
 
असो, या सर्व भगिनींशी संवाद साधल्यावर कळले की, अरे यांचेही एक जग आहे, सुखदु:ख, आनंद, प्रेम, मैत्री आणि अशा सर्वच मानवी भावना जपत या भगिनी आपला आला दिवस साजरा करत आहेत. या कार्यक्रमामध्ये प्रमुख योगदान होते ते करिश्मा धोत्रे या किन्नर भगिनीचे. ती म्हणाल्या, “किन्नर म्हणून आम्हाला आर्थिक संपन्नता असते. पण जोपर्यंत हातपाय चालतात तोपर्यंत. पुढे काय ? अशावेळी रक्ताची नातीच कामाला येतात. किन्नर असलो तरी आम्ही त्यांच्या रक्ताचेच असतो ना. आमची काळजी त्यांना वाटतेच. उतारवयात तेच आम्हाला सुरक्षित आसरा देऊ शकतात. त्यामुळे किन्नर भले घराबाहेर राहत असतील तरी घरातल्यांशी कायम संपर्कात असतात. कुटुंबीयांना आर्थिक मदत करतात.”
 
 
करिश्मा यांचे म्हणणे बरोबरच होते, जेव्हा घरातल्यांना कळते की, आपल्या घरी जन्मलेले मुलगाही नाही आणि मुलगीही नाही. त्यावेळी त्या बाळाची काही चूक नसताना त्याच्या भविष्यात खूप काही चुकीचेच वाढून ठेवलेले असते. पुढे आंतरिक प्रेरणेने आणि समाजाने दिलेल्या दु:खद वागणुकीने मग हे बाळ किन्नरांमध्येच सामील होते. पुढे जगण्यासाठी खूप संघर्ष करावा लागतो, घरातून रस्त्यावर आल्यावर जे घडू शकते ते सारे यांच्यासोबत घडत असतेच. पण मग किन्नर समुदाय त्यांना सुरक्षा अणि आपलेपणही देतो, समदुखी म्हणून एकत्र राहतात, जगतात. ते घरच्यांना विसरलेले नसतातच, मग किन्नर भगिनी पैसे जमवून घरी पाठवतातच, त्यांच्या पैशावर घर सुरळीत होते, घरातील इतरांचे आयुष्य सुनिश्चित होते.
 
 
त्यामुळे काही अपवाद वगळता इतर सर्वच घरामध्ये काही वर्षांनी का होईना, किन्नर भगिनींना घरातले दार थोडे उघडे होते. लिहितानाही वाटत राहते पेटत्या निखार्‍याचे आणि विझलेल्या स्वप्नांचे जगणे पण या जगण्यालाही किन्नर भगिनी मानवी संवेदना जपत असतात. इथे उपस्थित असलेल्या किन्नर भगिनींना विठ्ठल कांबळे यांनी प्रश्न विचारला की, किती जणी घरातल्या सोबत राहतात. त्यावर तीन जणींनी सांगितले आम्ही घरातल्यांसोबत राहतो. अर्थात, बाकीच्यांनाही घरतल्यासोबत राहायचे आहे, पण समाजाचे वास्तव कधी बदलेले देव जाणे. असो, करिश्मा धोत्रे या किन्नर भगिनीच्या नावाने इथे मित्रमंडळ आहे. करिश्मा यांनी कोरोना काळात खूप मोठे समाजकार्य केलेले.
 
 
कोरोना ‘लॉकडाऊन’मुळे किन्नर भगिनींच्या दैनंदिनीमध्येही ‘लॉकडाऊन’ झालेले. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली, अशा काळात करिश्मा यांनी रा. स्व. संघाच्या मदतीने इथे अन्न वितरण, धान्य वाटप, औषध वितरण केले, इतकेच नाही तर कोरोनाबाबत समुपदेशन जागृतीही केली. करिश्मांनी इतक्या नि:स्वार्थी आणि निरलसपणे सेवाकार्य केले की किन्नर, स्त्री आणि पुरूष हा सगळा भेद लंघून तिच्या नावाने मित्रमंडळही तयार झाले. परिसराचा विकास करणे, प्रगती करणे आणि हे सर्व करत असताना कोणताही लिंगभेद, जातिभेद न करणे हे ध्येय या मंडळाचे आहे.
 
 
या स्नेहसंमेलनानिमित्त बोलताना करिश्मा म्हणाल्या की, ”दिवाळीला पूजा करायला किंवा शुभ मुहूर्तावर दान घ्यायला लोक आम्हाला बोलवतात. त्यात भाव हाच असतो की, आम्ही किन्नर आहोत. दान देताना किंवा पूजा करून घेताना समाज आमच्यात आणि त्यांच्यात अंतरच ठेवतो. पण आज दिवाळीनिमित्त तुम्ही आम्हाला भेटायला आलात. माणूस म्हणून आमची विचारपूस केली, आज मन भरून आलं. तुम्ही माणूस म्हणून आमचा सन्मान केला आहे. आमची पण दिवाळी असते, पण आमच्यासोबत दिवाळीचा दिवस साजरा करावा असे कधी कुणी केले नाही, तुम्ही, आम्हाला आपले मानून इथे आलात धन्यवाद.”
 
 
यावर तिथे उपस्थित असलेल्या काहीजणी म्हणू लागल्या,”लहानपणी आमच्या घरी दिवाळीला पै-पाहुणे यायचे मिठाई, कपडालत्ता घेऊन यायचे, घर सोडलं आतात तेव्हा ती दिवाळी पण संपली. पण आज आमच्यात बसून आमच्यासाठी नवी कोरी साडी आणि मिठाई आणली, घरची आठवण झाली.” त्यांचे म्हणणे ऐकून वाटले, आठवणी कधीच संपत नसतात. या भगिनी जरी किन्नर असल्या तरी आहेत तर माणूसच ना? त्यांनाही घरातल्यांच्या किती आठवणी असतील? एकटे राहताना त्यांना या आठवणी किती छळतील असतील? घरदार असून एकटेपणाचा वनवास यांना भोगावा लागतो. का? तर केवळ ते पुरूष किंवा स्त्री नाहीत म्हणून? तृतीयपंथी किंवा आणखीन काही संबोधन समाज त्यांना वापरतो. पण या भगिनींना ही उपनाम, विशेषण आवडत नाहीत. त्या म्हणतात, ”आम्हाला किन्नर ‘भगिनी’ म्हणा.” संपूर्ण चर्चेत कार्यक्रमात त्या स्वत:ला किन्नर म्हणूनच संबोधत होत्या.
 
 
करिश्मा म्हणाल्या, या परिसरात आणि आमच्या किन्नर भगिनींच्या आयुष्यात खूप समस्या असतात. आरोग्य आणि सुरक्षा या त्यातल्या प्रमुख समस्या, यावर विठ्ठल सर म्हणाले, ”आरोग्य तपासणी किंवा एखाद्या आजारावर उपचार वगैरे करायचे असतील तर तुम्ही आम्हाला जरूर सांगा, तसेच सुरक्षेबाबतही आपण योग्य ती योजना करूया. त्यासाठी तुम्ही सगळ्या जणींनी एकजुटीने सहकार्य करायला हवे.” यावर करिश्मा आणि इतर किन्नर भगिनी म्हणाल्या, ”आम्ही सर्वजणी तयार आहोत. आमचा त्रास कमी होत असेल तर आम्ही का नाही एकत्र येणार. विठ्ठल सर तुम्ही आरएसएसचे आहात. आम्हाला माहिती आहे की, आरएसएसवालेच आम्हाला कसलाच स्वार्थ न बाळगता मदत करू शकतात. आम्हाला आपले मानू शकतात. तुम्ही आम्हाला आपले मानले आता कदाचित आमचे प्रश्न सुटतील.”
 
 
यावर विठ्ठल सर म्हणाले, ”आम्ही सर्वच तुम्हा सर्वांच्या संपर्कात राहू. किन्नर भगिनी आता एकट्या नाहीत बरं. आम्ही आहोत ना तुमचे भा्ऊबंद.” विठ्ठल सर असे म्हणाले आणि उपस्थित सगळ्या किन्नर भगिनींच्या चेहर्‍यावर शब्दांत न सांगू शकणारा आनंद फुलला. त्यातल्या एक दोघी जणी हलकेच डोळ्याच्या कडा पुसू लागल्या. कदाचित त्यांना त्यांच्या घरची दिवाळी, भाऊ-बहीण आठवले असतील. कार्यक्रम सुरू होऊन दोन तास झाले होते. हनुमान मंदिरात दिवाळीनिमित्त दीपमाळ लावली जात होती.
 
 
त्या दीपमाळेचा प्रकाश मंदिरात सर्वत्र पसरला होता. पण या प्रकाशापेक्षाही उपस्थित किन्नर भगिनींच्या चेहर्‍यावरचे तेज जास्त दीप्तिमान होते. या तेजाचा आशय होता की, ‘लॉकडाऊन’मुळे अत्यंत निराशा आणि समस्या निर्माण झाल्या होत्या. माणुसकीवरचा विश्वास क्षीण झाला होता. पण अशा वातावरणातही त्यांच्या सोबत दिवाळी साजरी करायला. स्वयं महिला मंडळ आणि रा. स्व. संघाचे पदाधिकारी आले होते. बदलत्या समाजाच्या सुखद संदेशाचे आणि रा. स्व. संघाने दिलेल्या आपलेपणाचे तेज त्यांच्या चेहर्‍यावर होते.
 
 
या कार्यक्रमामध्ये किन्नर भगिनींना सुरेश गंगादयाल यादव यांनी साड्यांचे वितरण केले, तर स्मिता कवडे यांनी मिठाई वाटप केले. विठ्ठल कांबळे सर म्हणाले, ”तुमचा आशीर्वाद हा माणसाला संपन्न करतो. तुम्हाला साडी किंवा मिठाई देणारे आम्ही कोण? पण, आज दिवाळी आहे आणि ती आपलेपणाच्या बंधात साजरी करायला हवी, आज आम्ही तुमच्याकडे आलो आहोत. त्यामुळे ही छोटीशी भेट.” यावर किन्नर भगिनींचे म्हणणे होते की, ”शाप देऊ नये किंवा आणखीन काही बोलू नये म्हणून आम्हाला तोंड वाकडं करून पैसे देणारे लोकच जास्त आहेत. पण, घरचे समजून आम्हाला भेटवस्तू दिली. त्याची किंमत मोठी आहे.” या कार्यक्रमाला रा. स्व. संघ विक्रोळीचे सुधीर शर्मा आणि ‘दिव्यज्योती फाऊंडेशन’च्या ज्योती साठे, प्रितेश पटेल उपस्थित होते
 


1_2  H x W: 0 x

 
विठ्ठल कांबळे (रा.स्व.संघ, कोकण प्रांत कार्यवाह), करिश्मा धोत्रे,
सुरेश गंगादयाल यादव आणि ज्योती साठे.
@@AUTHORINFO_V1@@