रंगभूमीसेवक ‘कृष्णा’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |

mansa_1  H x W:


सतत नावीन्याचा शोध घेत आपल्यातील कलात्मकतेच्या जोरावर मराठी रंगभूमी अधिकाधिक समृद्ध करणार्‍या युवा कलाकार कृष्णा वाळके याच्या कलागुणांचा घेतलेला आढावा...


कोरोना काळात झालेल्या टाळेबंदीच्या काळात सर्वच नाट्यगृहे, चित्रपटगृहे पूर्णतः बंद ठेवण्यात आली. मात्र, या बंदच्या काळातही हार न मानता आपल्यातील कलाकार जीवंत ठेवत प्रेक्षकांना नवीन काहीतरी देण्याच्या उमेदीतून नगरच्या कृष्णा वाळके या तरुण कलाकाराने ऑनलाईन माध्यमातून रंगमंचीय सादरीकरणाची मुहूर्तमेढ रोवली. त्याच्या या प्रयोगांचे राज्यातूनच नव्हे तर परदेशातील प्रेक्षकांनीही भरभरून कौतुक केले.

नगरपासून २० किलोमीटर अंतरावर असणार्‍या लोणी सय्यद मीर या छोट्याशा गावात राहणारा कृष्णा यमुना विलास वाळके हा २४वर्षीय युवा रंगकर्मी. प्राथमिक शिक्षण घेत असताना शाळेतील शिक्षक छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास शिकवताना वर्गातील मुलांचे छोटे-छोटे नाट्यप्रयोग बसवत, यात कृष्णा मावळ्यांची भूमिका साकारत असे. येथेच त्याच्यामध्ये अभिनय, नाटकाविषयी आवड निर्माण झाली. पुढे माध्यमिक शिक्षण घेत असताना तो वार्षिक स्नेहसंमेलनात सहभागी झाला. आठवीत असताना मुलीची वेशभूषा करत कृष्णाने नृत्यसादरीकरण केले. त्याने केलेले सादरीकरण इतके हुबेहूब होते की गावातील व शाळेतील सर्वांकडूनच कौतुकाची थाप मिळाली. इथेच कृष्णाला आपण एखादे पात्र अगदी उत्तमरीत्या साकारू शकतो, याची खात्री झाली. पुढे अकरावीला कृष्णाने अहमदनगरमधील न्यू आर्ट्स कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स महाविद्यालयात प्रवेश घेतला. तत्पूर्वी, कृष्णाला आपल्या आयुष्यातील संदीप दंडवते दिग्दर्शित ‘हिय्या’ या नाटकामध्ये पहिली संधी मिळाली. ‘अहमदनगर महाकरंडक’ या स्पर्धेत या नाटकाला सांघिक द्वितीय पारितोषिक मिळाले. मात्र, संपूर्ण संघाला उत्कृष्ट अभिनयाचे प्रथम पारितोषिक मिळाले. कृष्णासाठी प्रेरणादायी प्रवासाची सुरुवात इथूनच झाली. 2013 मध्ये अकरावीत असतानाच कृष्णाने पुढाकार घेत ‘दोन रात्रीचा उत्तरार्ध’ हे पहिलेवहिले नाटक दिग्दर्शित केले, यात त्याने अभिनयदेखील केला. खरंतर ही सुरुवातच होती अजून अनेक तांत्रिक बाबी, अभिनय व दिग्दर्शन हे सर्वच शिकण्यासाठी कृष्णाची धडपड सुरूच होती. केवळ पाहून शिकण्यापेक्षा कृष्णाने प्रायोगिक रंगभूमीचा पुरेपूर वापर करत नवीन प्रयोग करत सादरीकरणावर जोर दिला.


prize_1  H x W:


२०१७हे वर्ष कृष्णाच्या अभिनय कारकिर्दीला कलाटणी देणारे ठरले. २०१७मध्ये महाविद्यालयीन सहभाग नोंदवत कृष्णा व टीमने ‘माईक’ ही एकांकिका पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धेसाठी उतरवली. पुणे विभागातून ही एकांकिका प्रथम आली. प्रायोगिक रंगमंचावर काम करणार्‍या प्रत्येकच कलाकाराचं स्वप्न असतं की, आपल्याला अभिनयाचे गणपतराव बोडस हे पारितोषिक मिळावं. अभिनयाचं आणि दिग्दर्शनाचं मानाचं पारितोषिक कृष्णाला मिळालं तसेच प्रथम पारितोषिकही त्यावर्षी ‘माईक’ या एकांकिकेला मिळाले. गेली कित्येक वर्षे अहमदनगरला प्रतीक्षा असणारा ‘पुरुषोत्तम करंडक २०१७'मध्ये कृष्णा व संघाच्या मेहनतीमुळे मिळाला. यश तर मिळत होते. मात्र, अडचणीही असंख्य येत होत्या. २०१७पूर्वी अनेकदा दिग्दर्शन करत असताना कृष्णा उत्तम विषय असणार्‍या संहितेच्या शोधात असे. मात्र, ही मुलं कोण आहेत, तसेच नव्यानेच या क्षेत्रात आलेली त्यामुळे अनेकवेळा नामांकित लेखक संहिता देण्यास नकार देत. मग अशावेळी स्पर्धेत तोडीस तोड एकांकिका उभी करताना संहिता मिळत नसल्याने अडचणी येत. यावर मार्ग काढत कृष्णा स्वतः लेखनाकडे वळला. समोर कितीही अडचणी येवो, त्यावर मार्ग काढत सतत नवीन काहीतरी शिकत राहणे हेच कृष्णाचे यशस्वी होण्याचे गमक आहे. नाटकांचे लेखन कसे करावे याबाबत तर काहीच कल्पना नव्हती, अशावेळी वेगवेगळ्या नाट्य कार्यशाळांमध्ये कृष्णा सहभागी झाला. ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’च्या लेखन कार्यशाळेतही तो सहभागी झाला. येथे त्याला नाटक म्हणजे काय? नाट्यलेखनातील मर्यादा व त्यापुढे जाऊन तुम्ही काय लिहू शकता, याबाबत मान्यवरांकडून मार्गदर्शन करण्यात येत होते. इथूनच त्याच्यातील लेखनशैली अधिकाधिक विकसित होत गेली. या कार्यशाळेतील विविध लेखनातून आपणही लिहू शकतो, हा विश्वास कृष्णामध्ये दृढ झाला. याआधी लेखक राजन खान यांच्या पुण्यातील एका लेखन कार्यशाळेतील सहभागाने लेखनात प्रगल्भता येत गेली. यातूनच कृष्णाची ‘लाली’ ही कथा समोर आली. पुढे त्याचे नाटक झाले. ‘लाली’ ही एकांकिका व पुढे नाटकाला अनेक नामांकित परितोषिके मिळाली. २०१९मध्येही ‘पुरुषोत्तम करंडक’मध्ये ‘लाली’ एकांकिकेला प्रथम पारितोषिक व गणपतराव बोडस दिग्दर्शनाचे आणि अभिनयाचे पारितोषिक मिळाले. ‘पुरुषोत्तम’साठी ‘शोकांतिका’ ही एकांकिका कृष्णाने लिहिली.



mansa_1  H x W:


नाटकांचे ऑनलाईन सादरीकरण हे कृष्णाला मान्य नाही. कृष्णा म्हणतो, “नाटक हे इतर माध्यमांपेक्षा वेगळं का आहे? कारण, इथे कलाकार आणि प्रेक्षक यांच्यात कोणतीही भिंत नसते. सादरीकरण करणार्‍याच्या डोळ्यात पाणी असेल तर ते पाहणार्‍याच्या डोळ्यातही येते. तो जीवंतपणा नाटकात असतो. मात्र, ऑनलाईनमध्ये तसं नसतं. मग यावर मार्ग कसा काढायचा, याच्याच शोधात मी होतो. मात्र, या संकटात तात्पुरता दिलासा म्हणून मी या माध्यमाकडे वळलो.” कोरोना महामारी येण्याच्या आधी ‘म्हातारा पाऊस’ हे नाटक कृष्णाने लिहून पूर्ण केले होते. मात्र, अचानक आलेल्या या महामारीने सादरीकरण व प्रयोगांच्या आशा धूसर होत गेल्या. मात्र, रंगमंचीय आभास हुबेहूब निर्माण करत ‘म्हातारा पाऊस’ या नव्याकोर्‍या संहितेचे सादरीकरण केले. लोणी सय्यद मीर या छोट्या खेड्यात येणार्‍या नेटवर्क कनेक्टिव्हिटीच्या अडचणीवर मत करत भर पावसात मित्राच्या नेट कॅफेचे रंगमंचात रूपांतरण करत गुगल मीटच्या साहाय्याने कृष्णाने १२ यशस्वी ऑनलाईन प्रयोग केले. या प्रयोगांना राज्यातील व परदेशातील दोन हजार मराठी रसिकांनी उपस्थिती दर्शविली. अभिनेत्री चिन्मय सुमित, अभिनेता अभिराम भडकमकर यांच्यासारख्या मराठी कलाकारांनी कृष्णाच्या या प्रयोगांचे कौतुक केले. वेबसीरिजच्या निर्मितीतही कृष्णा मागे नाही. आपल्या अभिनय, दिग्दर्शन व लेखनाच्या जोरावर अभिजात मराठी रंगभूमीचा हा वारसा अधिकाधिक समृद्ध करण्यासाठी कृष्णाला दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या खूप खूप शुभेच्छा!
@@AUTHORINFO_V1@@