शाप लाभे शापिताला

14 Nov 2020 23:25:50

book_1  H x W:


उतारवयात सरदार साहेबांनी लग्न करायचं ठरवलं. परिचयातील एका सुंदर तरुणीला त्यांनी मागणी घातली. दोघांच्या वयात खूप अंतर असूनही तिनं होकार दिला. दोघांचं लग्न झालं. लग्नानंतर दोघांनी शाही जहाजातून युरोपची वारी केली. आल्यावर संसार सुरू झाला. त्यांना अपत्य नव्हतं. पण, संसार अगदी सुखाचा चालला होता.



वृद्ध सरदार लॉर्ड ओखर्ट आपल्या आलिशान गढीमध्ये बहुधा शेवटच्या घटका मोजत होते. उघड्या खिडकीतून मंद वायुलहरी बाहेरच्या बागेतील फुलांचा सुगंध घेऊन आल्या होत्या. खोलीतले वातावरण शीतल आणि प्रसन्न होते. पण, मंद ज्वरामुळे लॉर्डना ग्लानी आली होती. त्यांच्या डोळ्यांसमोर गतकाळातली गुलाबी चित्रे उलटसुलट क्रमाने फिरत होती.उतारवयात सरदार साहेबांनी लग्न करायचं ठरवलं. परिचयातील एका सुंदर तरुणीला त्यांनी मागणी घातली. दोघांच्या वयात खूप अंतर असूनही तिनं होकार दिला. दोघांचं लग्न झालं. लग्नानंतर दोघांनी शाही जहाजातून युरोपची वारी केली. आल्यावर संसार सुरू झाला. त्यांना अपत्य नव्हतं. पण, संसार अगदी सुखाचा चालला होता. पत्नी सारी कर्तव्ये इमानेइतबारे पार पाडीत होती. पतीसाठी जे करायचं ते करीत आली होती. सरदार साहेबांनी कधीच आणि काहीच तक्रार केलेली नव्हती. या गोष्टीला अवघं एक वर्ष लोटलं होतं आणि सरदार साहेब आजारी पडले होते. या आजारातून आपण उठू असं त्यांना वाटत नव्हतं. त्यांनी क्षीण आवाजात पत्नीला हाक दिली. हाक ऐकून आधी नोकराणी आली. मग ती पत्नीला बोलवायला गेली. काही क्षणांनी चॉकलेट चघळत पत्नी आली.


“का हाक मारली, डिअर? मी, डॉक्टरना बोलावणं धाडलं आहे. येतीलच ते.”


“थोडा वेळ तू माझ्या जवळ बसशील का? मला, तुझ्याशी काही बोलायचं आहे. मी, आता काही जगेन, असं वाटत नाही. माझं मृत्युपत्र...”


“असं का बोलताय? डॉक्टर येतीलच आता.”


तेवढ्यात दारावरची घंटा वाजली. नोकराने दार उघडलं आणि डॉक्टरांना घेऊन आला. डॉक्टर सरदार साहेबांना तपासत असतानाच सरदारीण बाई चहाचं सामान घेऊन आल्या. तो सरंजाम मांडता मांडता त्यांनी विचारलं, “डॉक्टर, माझी चॉकलेट्स आणली?” डॉक्टरांनी आपल्या बॅगेतून चॉकलेट्सचा बॉक्स काढून तिच्या हाती दिला. मग ते सरदार साहेबांना काही विचारू लागले. पण, सरदार साहेबांनी डोळे मिटून घेतले होते. डॉक्टरांच्या प्रश्नाला त्यांनी उत्तर दिलं नाही. डॉक्टरांनी त्यांची नाडी तपासली. मग स्टेथोस्कोप काढून छातीचे ठोके तपासले. मग तो मिटून बॅगेत ठेवीत ते सरदारीण बाईंकडे वळून म्हणाले, “सारं संपलं आहे.”


बाईंना क्षणभर त्या वाक्याचा अर्थ समजला नाही आणि समजला तेव्हा त्या चटकन डॉक्टरांच्या मिठीत आल्या नि विचारलं, “हेन्री, तुला खात्री आहे?”


“अलबत. त्यांचं कपाट कुठे आहे? आणि किल्ली?”


दोघे सरदार साहेबांच्या अभ्यासिकेत गेले. त्यांचं कपाट उघडलं. वरच्या कप्प्यात कागदपत्रांच्या ढिगार्‍यात दोन फाईल्स होत्या. एका फाईलमध्ये सरदार साहेबांनी लग्नानंतर लगेच केलेलं मृत्युपत्र होतं. त्यात सगळी जायदाद तरुण पत्नीच्या नावे केलेली होती. पण, नंतर काही दिवसांनी त्या मृत्युपत्रावर लाल रेघांच्या मोठ्या फुल्या काढून ते बाद केलं होतं. दुसर्‍या फाईलमध्ये काही आठवड्यांपूर्वी केलेलं ताजं मृत्युपत्र होतं. हेन्रीने ते मोठ्या आवाजात वाचलं. त्यात पत्नी आणि डॉक्टर हेन्रीच्या अनैतिक संबंधांवर संशय व्यक्त केला होता आणि पत्नीच्या नावे फुटकी कवडीदेखील न ठेवता, स्वतःची सर्व जायदाद एका सेवाभावी संस्थेच्या नावे केली होती. मृत्युपत्रातला मजकूर ऐकून सरदारीण बाईंनी एक किंकाळी फोडली आणि बेशुद्ध पडल्या. डॉक्टर हेन्रीने क्षणभर इकडे तिकडे पाहिले. किंकाळी ऐकून आत आलेल्या नोकराणीच्या मदतीने सरदारीण बाईंना उचलून पलंगावर निजवले. बाहेरच्या खोलीतून आपली बॅग मागवली आणि बाईंना एक झोपेचे इंजेक्शन दिले. नोकराणी गेल्यावर पुन्हा कपाट उघडले. आत मिळालेली रोकड उचलून आपल्या बॅगेत भरली. बाईंच्या गळ्यातला आणि हिरेजडीत कंठा कोटाच्या वरच्या खिशात ठेवला. मग साळसूदपणे बाहेर येऊन सरदार साहेबांच्या मृत्यूचा दाखला लिहिला. तो नोकराच्या हाती देऊन आपली बॅग उचलून ते बाहेर पडले आणि आपल्या कारकडे निघाले. त्याच वेळी बागेत फिरणारा सरदार साहेबांचा धिप्पाड कुत्रा अचानक त्यांच्या अंगावर धावून आला. डॉक्टर दचकले. त्याने त्यांची बॅग हुंगली. मग डॉक्टरांच्या पायांचे लचके तोडले. डॉक्टर खाली पडले. कुत्र्याने त्यांची छाती हुंगली. खिशाजवळ त्याला त्या कंठ्याचा वास आला असावा. त्याने धडपडणार्‍या डॉक्टरांच्या छातीवर पंजे ठेवून नरडीचा घोट घेतला. उतारवयात विजोड मुलीशी लग्नाची घाई करणारे सरदार साहेब, त्यांच्याशी प्रतारणा करणारी युवा पत्नी आणि तिचा डॉक्टर प्रियकर - तिघांनी आपापल्या मस्तकावर आपापले शाप झेलले.


- विजय तरवडे
(ओ हेन्रीच्या ‘लॉर्ड ओखर्ट्स कर्स’ या कथेवर आधारित)
Powered By Sangraha 9.0