१२ नोव्हेंबरपासून फणसाड आणि कर्नाळा पक्षी अभयारण्य पर्यटकांसाठी खुले

    दिनांक  11-Nov-2020 15:54:27
|
karnala _1  H x

पक्षी सप्ताहात आनंदाची बातमी 


मुंबई (विशेष प्रतिनिधी) - राज्यात सध्या सुरू असलेल्या 'पक्षी सप्ताहा'मध्ये पक्षीनिरीक्षकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. निसर्ग प्रेमींचे आवडते ठिकाण असलेले 'कर्नाळा पक्षी अभयारण्य' आणि 'फणसाड वन्यजीव अभयारण्य' हे पर्यटकांसाठी खुले करण्याची घोषणा करण्यात आली आहे. काही अटी-नियमांनुसार १२ नोव्हेंबरपासून या दोन्ही अभयारण्यात पर्यटकांना प्रवेश दिला जाणार आहे. 
 
 
लाॅकडाऊनच्या पार्श्वभूमीवर गेल्या आठ महिन्यांपासून पनवेलचे 'कर्नाळा पक्षी अभयारण्य' आणि रायगडमधील 'फणसाड वन्यजीव अभयारण्य' बंद करण्यात आले होते. मात्र, पक्षीनिरीक्षकांचे आवडते ठिकाण असणारे हे अभयारण्य आता खुले होणार आहे. वन विभागाने १२ नोव्हेंबरपासून ही अभयारण्ये पर्यटकांसाठी खुले करण्याचा निर्णय घेतला आहे. अभयारण्य खुले करताना पर्यटकांनी घ्यायची खबरदारी आणि उपाययोजनेच्या हेतूने त्यांचे नियम व अटीशर्तींचे पालन करण्यात येईल. कर्नाळा पक्षी अभयारण्यामध्ये पर्यटाकांना फिरण्यासाठी असलेल्या इतर निसर्ग पायवाटा बंद राहणार असून केवळ कर्नाळा किल्ल्याकडे जाणारी पायवाट ही फिरण्यासाठी खुली राहणार असल्याची माहिती अभयारण्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण यांनी दिली. पुढील परिस्थितीचा विचार करुन टप्याटप्याने इतर निसर्ग पायवाटा सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. अभयारण्यातील बचतगट हा १ डिसेंबर पासून सुरु करण्यात येईल, असेही त्यांनी नमूद केले. तर फणसाड वन्यजीव अभयारण्यामध्ये केवळ भ्रमंतीसाठी पर्यटकांना प्रवेश देण्यात येईल. राहण्याची आणि भोजनगृहाची सुविधा बंद राहणार असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी राजवर्धन भोसले यांनी दिली. 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.