‘ब्रॅण्ड मोदी’चा दबदबा!

10 Nov 2020 23:04:43
NDA1_1  H x W:




मोदींनी बिहारमध्ये लागोपाठ १२ सभा घेतल्या आणि नितीश कुमारांवर काहीसा नाराज असलेला मतदार मोदींसाठी घराबाहेर पडला व भाजपसह रालोआला त्याने मतदान केले. इथेच ‘ब्रॅण्ड मोदी’चा दबदबा अजूनही जोरात असल्याचे व विरोधात जाणारी बाजी पालटवण्याची त्यात ताकद असल्याचे सिद्ध होते.
 
 
तीन टप्प्यांत पार पडलेल्या बिहार विधानसभेच्या निवडणुकांचे मंगळवारी निकाल लागले आणि सर्वच अंदाज फोल ठरवत ‘कमळ’ उमलले. तत्पूर्वी मतदानाच्या आधी आणि मतदानोत्तर चाचण्यांतही विविध वृत्तवाहिन्या व सर्वेक्षण संस्थांनी बिहारमध्ये जनता दल संयुक्तसह भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी (सरासरी ९७ जागा जिंकून) पराभूत होणार, असे भाकित केले. राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालूपुत्र तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखालील महागठबंधन दमदार कामगिरी करुन (सरासरी १३७ जागा जिंकून) सत्तेत येईल, असा दावा केला. तेजस्वी यादव यांनी दिलेले दहा लाख नोकर्‍यांचे आश्वासन आणि यामुळे त्यांचा जनाधार वाढल्याचे यामागे सांगितले जात होते. मतदानाचा एक एक टप्पा पुढे सरकत होता, तसे भाजप विरोधकांनी राष्ट्रीय जनता दलाच्या तेजस्वी यादव यांना तर मुख्यमंत्रिपदही बहाल करुन टाकले होते.
 
 
केवळ १० नोव्हेंबरचा दिवस उजाडणार आणि तेजस्वीच्या विजयाची औपचारिक घोषणा होणार, एवढेच काय ते या लोकांनी बाकी ठेवले होते. मात्र, ‘एक्झिट पोल’मधून भाजप व रालोआच्या पिच्छेहाटीचा दावा करणार्‍यांनी उडवलेल्या फुग्यांतली हवा मंगळवारी फुस्स झाली व जनतेने घराणेशाहीला नाकारले. सकाळी सकाळी राजद व काँग्रेसच्या महागठबंधनने आघाडी घेत विजयाची लालूच दाखवली, पण मतमोजणीच्या फेर्‍या पुढे पुढे जाऊ लागल्या आणि सायंकाळपर्यंत ‘एक्झिट पोल’च्या जोरावर सत्तेची स्वप्ने पाहणार्‍यांची दांडी गुल झाली. ‘एक्झिट पोल’मधून बिहारी मतदारांचा कौल सांगणार्‍यांचे दावे कोसळले आणि जनतेने आपल्या मनात नेमके कोण, हे प्रत्यक्षात दाखवून दिले. परिणामी, बिहार विधानसभेच्या निवडणूक निकालांनी ‘एक्झिट पोल’च्या विश्वासार्हतेवर, पारदर्शकतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह लावले. तसेच ‘एक्झिट पोल’ म्हणजे अंतिम निकाल तर नव्हेच, पण अंतिम कलही नाही, हेही सांगितले.
 
 
बिहार विधानसभा निवडणूक निकालांतली सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, भाजपचे वाढलेले संख्याबळ. गेल्या निवडणुकीत जनता दल संयुक्त, राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेसने एकत्र निवडणूक लढवत अनुक्रमे ७१, ८० व २७ जागा जिंकल्या होत्या. भाजपने छोट्या पक्षांच्या साथीने एकट्याने ५३ व इतरांनी पाच जागा जिंकल्या होत्या. यंदाच्या निवडणुकीत मात्र, भाजपने जोरदार मुसंडी मारली आणि तब्बल ७० पेक्षा अधिक जागांवर विजय मिळवला. त्यात भाजपचे बिहार प्रभारी देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सिंहाचा वाटा आहे. कारण, फडणवीस यांनी तिकीट वाटप, दौरे, चर्चा, नियोजन यांच्या माध्यमातून आपल्यावर सोपवलेली जबाबदारी सक्षमतेने पार पाडली.
 
 
नंतर मात्र कोरोना झाल्याने त्यांना बिहारच्या रणधुमाळीत अखेरपर्यंत सहभाग घेता आला नाही, पण सुरुवात नेमकेपणाने केल्याने कळसाचा पाया देवेंद्र फडणवीस यांनी घातल्याचे स्पष्ट होते. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारच्या निवडणुकीची सूत्रे आपल्या हाती घेतली. जनता दल संयुक्त आणि नितीश कुमारांच्या १५ वर्षांच्या सत्ताविरोधी हवेला त्यांनी थोपवले व त्याचे रुपांतर विजयी लाटेत केले.
 
मोदींनी बिहारमध्ये लागोपाठ १२ सभा घेतल्या आणि राजद व काँग्रेसच्या घराणेशाहीवर जबरदस्त प्रहार केला, तसेच लालूंच्या ‘जंगलराज’ची आठवण करुन दिली. विरोधकांवर निशाणा साधताना आपल्या सरकारच्या लोककल्याणकारी योजनांचाही पंतप्रधानांनी उल्लेख केला. त्यातूनच नितीश कुमारांवर काहीसा नाराज असलेला मतदार मोदींसाठी घराबाहेर पडला व भाजपसह रालोआला त्याने मतदान केले. इथेच ‘ब्रॅण्ड मोदी’चा दबदबा अजूनही जोरात असल्याचे व विरोधात जाणारी बाजी पलटवण्याची त्यात ताकद असल्याचे सिद्ध होते. मात्र, जनता दल संयुक्तला मिळालेल्या जागा पाहता, नितीश कुमारांची कारकिर्द घसरणीला लागल्याचे दिसते.
 
 
दरम्यान, नितीश कुमारांच्या पिछाडीत चिराग पासवान यांचा मोठा हातभार आहे. कारण, पासवान यांनी जनता दल संयुक्तविरोधातच उमेदवार दिले व त्या पक्षाला अपशकुन केला. पण, स्वतः चिराग पासवान यांचे जे स्वप्न होते, तितक्या जागा त्यांनाही जिंकता आल्या नाहीत. दुसर्‍या बाजूला राहुल-सोनिया गांधींच्या काँग्रेसचे अन्य राज्यांप्रमाणेच बिहारमध्येही पतनच झाले. निवडणुकीच्या आधी काँग्रेसला लालूप्रसादांच्या कंदिलाच्या प्रकाशात आपली अब्रु वाचवता येईल, अशी आशा होती. पण, तसे अजिबात झाले नाही, उलट राहुल गांधींनी आपले होडके तर बुडवलेच, पण तेजस्वी यादव यांना सोबत घेऊन त्यांच्या अभिलाषेचाही चुराडा केला.
 
 
काँग्रेसमधील नेतृत्वाचा अभाव, तिकीट विक्रीच्या आरोपाने त्या पक्षाची प्रतिमा मलीन झाली, तसेच भाजपद्वेषाशिवाय अन्य मुद्दा नसल्याने जनतेने काँग्रेसला दणका दिला. सोबतच असदुद्दीन ओवेसींच्या एमआयएममुळेही काँग्रेसला झटका बसला. चिराग पासवान यांनी जशी नितीश कुमारांची मते पळवली, तेच काम एमआयएमने सीमांचल भागात काँग्रेससाठी केले व मतदारांनी काँग्रेसचा ‘हात’ धुडकावला.
 
 
दरम्यान, बिहारमध्ये सर्वाधिक हसे झाले ते महाराष्ट्राच्या ‘ब्येश्ट शियम’च्या शिवसेनेचे! भाजपला पाण्यात पाहणार्‍या शिवसेनेने बिहारमध्ये क्षमता नसतानाही ५० उमेदवार दिले, पण शिवसेनेची तुतारी काही वाजलीच नाही नि बहुसंख्य ठिकाणी शिवसेनेने ‘नोटा’पेक्षाही कमी मते मिळवून दाखवली. हाही एक विक्रमच आणि याच पक्षाचे प्रवक्ते संजय राऊत मंगळवारी सुरुवातीच्या निकालावर बिहारमध्ये तेजस्वीच्या मंगलराजची कामना करत होते. नंतर मात्र भाजपसह रालोआने विजयी आघाडी घेतली आणि राऊतांची बोलती बंद झाली. अर्थात, तोंडावर आपटल्याने ते गप्प बसतील, असे नाहीच. कारण, पुन्हा पुन्हा थोबाड फोडून घेण्याची त्यांची हौस दांडगी आहे. मात्र, बिहारच्या निकालांनी ‘एक्झिट पोल’ला चुकीचे ठरवले, मोदींची जादू कायम असल्याचे सांगितले, तर यादव-गांधींच्या घराणेशाहीला नाकारले, हे निश्चित.


Powered By Sangraha 9.0