आहे का ‘या’ प्रश्नाचे उत्तर?

01 Nov 2020 19:57:52
Sanjay Raut_1  
 
 
काश्मीरमध्ये तिरंगा फडकणार नसेल तर जमिनीचे तुकडे घेऊन करायचे काय? अशी संजय राऊत यांनी तळमळ व्यक्त केली म्हणे. काश्मीर म्हणजे जमिनीचा तुकडा? देशाचे मस्तक असलेल्या काश्मीरला जमिनीचा तुकडा संबोधणे म्हणजे अतिच झाले. तसेही त्यांचे अति झाले आणि हसू झाले असेच झाले आहे. ‘ढवळ्या शेजारी बांधला पवळा वाण नाही पण गुण लागला’ अशी एक म्हण आहे. राऊत सध्या ज्या मित्रपक्षाचे पाईक आहेत, त्या मित्रपक्षाचे सर्वेसर्वा नेहरूही देशाच्या महत्त्वाच्या भूभागाबद्दल म्हणाले होते की, तिथे गवताचे एक पातेही उगवत नाही, ती जमीन घेऊन काय करायचे? त्यांच्या या वक्तव्याचा समर्पक वारसा राऊतांनी चालवला आणि त्यांनी काश्मीरला जमिनीचा तुकडा म्हणत ते घेऊन काय करायचे असे म्हटले. राऊत खासदारकी उपभोगत आहेत. देशाच्या भल्यासाठी झिजणे, अहोरात्र विचार करणे हे या खासदारकीत येत नसावे. नाहीतर देशाच्या इंचइंच जमिनीसाठी आयुष्य दावणीला लावणारे सैनिक आणि त्यांचा त्याग याची इज्जत राऊतांनी ठेवली असती. मुंबई-ठाण्यात अशा कितीतरी गल्ल्या आहेत की जिथे संघर्ष करून तिरंगा फडकवावा लागतो. चंद्रपूरच्या पुढच्या नक्षली भागात आजही तिरंगा फडकवणे जीवावर उदार होण्यासारखे आहे. पण आज ना उद्या या अशा देशविघातक शक्तींचा नायनाट होईल आणि राष्ट्रीय शक्ती सर्वत्र प्रकाशमान होईल, अशी प्रत्येक देशवासीयांस खात्री आहे. हीच खात्री काश्मीरबद्दलही आहे. पण राऊतांना ही खात्री नसावी. मागेही एका देशद्रोही मानसिकतेच्या मुलीने आझाद काश्मीरचा फलक मुंबईत नाचवला होता. त्यावेळी तिचे समर्थन राऊत यांनी केले होते. ‘तुकडे तुकडे गँग’चा म्होरक्या उमर खालीद मागे मुंबईत आला होता, त्यावेळी त्याला भेटण्यासाठी संजय राऊत गेले. असो, या भारत देशाच्या अंतर्भूत असलेली कोणतीही जमीन ही पूज्य-पवित्रच आहे, केवळ जमिनीचा तुकडा नाही. इतर अनेक गोष्टींत नाक खुपसून निरर्थक बोलून प्रसिद्धी मिळू शकते. पण सवंग प्रसिद्धीसाठी काश्मीरला जमिनीचा तुकडा ठरवून ते घेऊन करायचे काय? असा प्रश्न राऊतांनी पुन्हा विचारू नये. कारण, इथे महाराष्ट्रात जनता विचारते आहे की, “तुम्ही सत्तेत असताना जनता मरत आहे तर तुमची सत्ता घेऊन करायचे काय?” आहे का या प्रश्नाचे उत्तर?
 

‘स्वविकास आघाडी’चे चांगभले!

 
काँग्रेसच्या महानगरपालिकांना मुख्यमंत्र्यांकडून निधी मिळत नाही, म्हणून काँग्रेसच्या अशोक चव्हाण यांनी संताप आणि शोक वगैरे व्यक्त केला. चव्हाण यांना कोणी सांगावे की, तुमच्या महाविकास आघाडी राज्यात सगळेच स्थगित आहे. त्यामुळे निधीही स्थगित झाला असे समजावे. त्यामुळे ‘ये तो होना ही था.’ ज्या गावच्या बोरी त्या गावच्या बाभळी ही म्हण सत्य असून ती काँग्रेस आणि राष्ट्रवादी दोन बहिणींसाठी योग्य म्हण आहे. पण या दोघींच्या साट्यालोट्यात शिवसेना आली आणि काँग्रेस-राष्ट्रवादीचे मिलजुलके खाना कार्यक्रमामध्ये एक भागीदार आणखीन वाढला. बरं वाढला तर वाढला हा भागीदार या दोन जुन्या भागीदारांना विसरण्याचे नाटकपण करतो. कारण, ‘हमही शहेनशाह’ हे दाखवण्यासाठी इतरांना वजीर आणि प्यादे दाखवावेच लागणार. पण इथे गंमत अशी आहे की, शिवसेना स्वत:ला शहेनशहा समजून ज्यांना वजीर आणि प्यादे समजते ते दोघेही पक्ष स्वत:ला ‘शहेनशहा’ समजतात. मी मोठा की तू मोठा या चक्रात तिघेही छोटेच राहिले आहेत. हे त्रयस्थ व्यक्तींना समजते. पण महाविकास आघाडीच्या तिघाही पक्षांना समजत नाही. मुळात जमिनीस्तरावर पहिले तर शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँगेस या तीनही पक्षांना आपण सत्ताधारी आहोत याबाबत नक्की काय वाटते? हे समजून घेणे गरजेचे आहे. या प्रश्नाचा मागोवा घेतला तर जाणवते की, तिघांनाही वाटते की सत्ता आहे, ती त्यांच्या एकट्यामुळे, बाकीचे पक्ष आहेत काय आणि नाहीत काय? तर दुसरीकडे या पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मानसिकतेचा विचार केला तर, त्यांच्या मनातही हेच आहे की, आमच्या पक्षामुळे इतर दोन पक्ष सत्तेत आहेत. याचाच अर्थ महाविकास आघाडी ही पक्त कागदावर आहे. तीनही सत्ताधारी पक्षाचे नेते या महाविकास आघाडीला ‘स्वविकास आघाडी’ या दृष्टिकोनातूनच पाहतात. त्यांची तळमळ, त्यांची धडपड, त्यांची मळमळ सारे सारे केवळ ‘स्वविकास आघाडी’साठी आहे. ‘स्व’चा केंद्रबिंदू इतका मोठा आहे की त्याच्या विकासासाठी मग वाट्टेल त्या तडजोडी केल्या गेल्या, एकमेकांचे तोंडही पाहायची इच्छा नसताना एकमेकांचे पाय धरावे लागले. या सगळ्या गदारोळात घाणीत नैतिकता आणि विश्वासार्हतेचा गळा दाबला गेला. पण ‘स्वविकास आघाडी’चे चांगभले करताना हे सगळे पाहायला फुरसत कुणाला आहे.
Powered By Sangraha 9.0