जेम्स बाँड साकारणारे शॉन कॉनरी काळाच्या पडद्याआड

01 Nov 2020 14:23:36

james bond_1  H



वाशिंग्टन :
जेम्स बाँडची व्यक्तिरेखा पहिल्यांदा पडद्यावर साकारणारे महान अभिनेते शॉन कॉनरी यांचे शनिवारी वृद्धापकाळाने निधन झाले. ते ९० वर्षांचे होते. कॉनरी यांच्या कुटुंबीयांकडून त्यांच्या निधनाविषयी माहिती देण्यात आली. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती बरी नव्हती. अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली. जगभरातून त्यांच्या निधनावर शोक व्यक्त होत आहे.


शॉन कॉनरी यांचा जन्म २५ ऑगस्ट १९३० रोजी ब्रिटनमध्ये झाला होता. १९६२ ते १९८३ या कालावधीतील त्यांनी बाँडपटांमध्ये साकारलेल्या व्यक्तिरेखा प्रचंड लोकप्रिय ठरल्या होत्या. जेम्स बाँड सिरीजमधील सात चित्रपटांमध्ये शॉन कॉनरी यांनी प्रमुख व्यक्तिरेखा साकारली होती. आपल्या सहजसुंदर आणि सफाईदार अभिनयाने त्यांनी जगभरातील चाहत्यांना भुरळ घातली होती. मुळचे स्कॉटिश असलेल्या शॉन कॉनरी यांना ऑस्कर, बाफ्टा आणि गोल्डन ग्लोब या मानाच्या पुरस्कारांनी गौरविण्यात आले होते.बाँडपट वगळता शॉन कॉनरी यांनी ‘द हंट फॉर रेड ऑक्टोबर’, ‘इंडियाना जोन्’, ‘एंड द लास्ट क्रूसेड’ या चित्रपटांमधूनही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला होता. १९८८साली शॉन कॉनरी यांना ‘द अनटचेबल्स’ या चित्रपटासाठी पहिल्यांदा ऑस्कर पारितोषिक मिळाले होते. या सिनेमात त्यांनी आयरिश पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली होती. यानंतर कॉनरी यांनी ‘डॉक्टर नो’, ‘फ्रॉम रशिया विथ लव’, ‘गोल्डफिंगर’, ‘थंडरबॉल’, ‘यू ओनली लिव ट्वाइस’ आणि ‘डायमंड्स आर फॉरेवर’ या बाँडपटांमध्ये प्रमुख भूमिका साकारल्या होत्या.जेम्स बाँड साकारणाऱ्या नायकांमध्ये ते सर्वाधिक लोकप्रिय असल्याची बाब नुकतीच एका सर्वेक्षणातून पुढे आली होती.
Powered By Sangraha 9.0