मुंबईत ‘या’ ठिकाणी मोफत कोरोना चाचणी

01 Nov 2020 18:03:11

MUMBAI_1  H x W
 


मुंबई : कोरोनाला रोखण्यासाठी मुंबई महापालिकेने वैद्यकीय चाचण्यांवर भर दिला असून सोमवार, २ नोव्हेंबरपासून मुंबईत २४४ ठिकाणी मोफत कोरोना चाचणी सुविधा उपलब्ध केली जात आहे. कोरोनाची लक्षणे असल्यास त्यांच्या घराजवळच्या ठिकाणांची माहिती हेल्पलाईनद्वारे मिळू शकणार आहे. या सुविधेमुळे मुंबईकरांना कोविड चाचणी अधिक सुलभतेने करण्याचे अतिरिक्त पर्याय उपलब्ध झाले आहेत, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.


 
मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीतील विविध दवाखाने, रुग्णालये आदी प्रकारच्या एकूण २४४ ठिकाणी मोफत कोरोना चाचणी सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. या सुविधेमुळे महापालिका क्षेत्रात कोविड विषयक वैद्यकीय चाचणी करण्याची सुविधा ३०० पेक्षा अधिक ठिकाणी उपलब्ध झाली आहे. सोमवारपासून सुरू होत असलेल्या २४४ ठिकाणांच्या पत्त्यांची यादी विभागनिहाय नियंत्रण कक्षांद्वारे आणि महापालिकेच्या मुख्य नियंत्रण कक्षाच्या '१९१६' या क्रमांकाद्वारेही उपलब्ध करून देण्यात येत आहे.


 
शिवाय महानगरपालिकेद्वारे http://stopcoronavirus.mcgm.gov.in या संकेतस्थळावर देखील ही माहिती उपलब्ध करून देण्यात येत आहे. यामुळे संभाव्य रुग्ण महापालिकेच्या ज्या विभागात रहात असेल, त्याच्या घराजवळ असणाऱ्या ठिकाणांची माहितीही विभागीय नियंत्रण कक्षांच्या दूरध्वनी क्रमांकांवर किंवा '१९१६' या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधल्यानंतर उपलब्ध होणार आहे. सध्या सुरुवातीला दररोज सकाळी १० ते १२ या कालावधीदरम्यान सदर २४४ ठिकाणी मोफत वैद्यकीय चाचणी सुविधा 'वॉक इन' पद्धतीने उपलब्ध असणार आहे. यापैकी काही ठिकाणी आर.टी.पी.सी.आर. पद्धतीची वैद्यकीय चाचणी; तर उर्वरित ठिकाणी अॅंटीजन आधारित वैद्यकीय चाचणी सुविधा उपलब्ध असणार आहे.








Powered By Sangraha 9.0