यंदाचा नोबल शांतता पुरस्कार या 'मोहिमेला'

09 Oct 2020 16:30:18

nobel peace award_1 



स्टॉकहोम :
जागतिक स्तरावर अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या यंदाच्या शांततेच्या नोबेल पुरस्काराचा मानकरी ‘जागतिक अन्न कार्यक्रम’ म्हणजेच ‘वर्ल्ड फूड प्रोग्राम’ (WFP) ही संस्था ठरली आहे. 'डब्ल्यूएफपी’ला जागतिक स्तरावरील भुकेचा प्रश्न सोडवणे, युद्धजन्य परिस्थितीत परिस्थिती सुधारण्यासाठी आणि शांतता प्रस्थापित करण्यासाठी दिलेल्या योगदानाबद्दल या वर्षीचा शांतीचा नोबेल पुरस्कार देण्यात येत आहे,” अशी माहिती नोबेल पुरस्कार समितीने दिली.






तसेच युद्ध-संघर्षग्रस्त भागातील शांततेसाठी परिस्थिती सुधारण्यासाठी आणि उपासमारीला रोखण्यासाठी संयुक्त राष्ट्राच्या या वर्ल्ड फूड प्रोग्रामने मोलाची कामगिरी बजावली असल्याचे नोबेल पुरस्कार समितीने म्हटले आहे. अन्न आणि कृषी संघटनेच्या स्थापनेनंतर १९६३ मध्ये या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली होती. या कार्यक्रमासाठी जगभरातील विविध देशांमधून निधी दिला जातो. 'वर्ल्ड फूड प्रोगाम'ने २०१९ मध्ये ८८ देशांतील जवळपास १० कोटी नागरिकांपर्यंत खाद्यान्न पाठवले. जगभरातील उपासमार संपुष्टात आणण्यासाठी आणि खाद्य सुरक्षितेला प्रोत्साहन देणारी 'वर्ल्ड फूड प्रोगाम' सर्वात मोठी संघटना आहे. यावेळी या पुरस्काराच्या निमित्ताने नोबेल पुरस्कार समिती जगाचं लक्ष भुकेच्या धोक्याचा सामना करत असलेल्या कोट्यावधी नागरिकांकडे वेधू इच्छिते, असंही समितीने नमूद केलं आहे. या पुरस्कारानंतर नोबेल पुरस्कार्थी वर्ल्ड फूड प्रोग्रामने नोबेल पुरस्कार समितीचे आभार मानले आहे. WFP ने म्हटले आहे, “या पुरस्कारासाठी आम्ही नोबेल पुरस्कार समितीचे आभारी आहोत. शांतता आणि भूक शमवणे या दोन्ही गोष्टी हातात हात घालून चालतात याची आठवण करुन देण्यासाठी हा पुरस्कार महत्त्वाची बाब आहे.” यंदाच्या शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी जवळपास ३१८ जण स्पर्धेत होती.
Powered By Sangraha 9.0