माथाडी कामगाराचा मुलगा बनला उद्योजक

08 Oct 2020 23:15:32

babasaheb chitalkar_1&nbs


फूटपाथवरुन काहीच दिवसांत दुकानात स्थलांतर झालं. एका दुकानाची चार दुकानं झाली. निव्वळ काही वर्षांत लाखोंची उलाढाल हा व्यवसाय करु लागला. ‘हिम्मत-ए-मर्दा, तो मदद-ए-खुदा’ या म्हणीचा पुरेपूर प्रत्यय घेतलेला हा उद्योजक म्हणजे ‘चितळकर बंधू फरसाण’चे संचालक बाबासाहेब चितळकर.


थोडाथोडका नव्हे, तर काही कोटी रुपयांचा व्यवसायात त्याला तोटा झाला. खूप नैराश्य आले. साहजिकच होतं ते. पण, याचवेळी पाठीशी ठामपणे उभे राहिले काका, काकू, भाऊ आणि बायको. एवढा मोठा पाठिंबा मिळाल्यावर त्याला १०० हत्तींचं बळ आलं. कॉर्पोरेटमध्ये नोकरी केलेली. त्यानंतर कोटींच्या आसपास उलाढाल केलेला उद्योजक, हा सगळा अभिनिवेश त्याने बाजूला ठेवला. आपल्या आजीने सुरु केलेला भेळ आणि फरसाणचा पारंपरिक व्यवसाय घेऊन थेट फूटपाथवरच बसला. एके ठिकाणी पत्नी तर दुसर्या ठिकाणी हा अगदी शर्ट इन करुन फरसाण- भेळ विकू लागला. हिंमत हरली नाही. फूटपाथवरुन काहीच दिवसांत दुकानात स्थलांतर झालं. एका दुकानाची चार दुकानं झाली. निव्वळ काही वर्षांत लाखोंची उलाढाल हा व्यवसाय करु लागला. ‘हिम्मत-ए-मर्दा, तो मदद-ए-खुदा’ या म्हणीचा पुरेपूर प्रत्यय घेतलेला हा उद्योजक म्हणजे ‘चितळकर बंधू फरसाण’चे संचालक बाबासाहेब चितळकर. अहमदनगरच्या पारनेर तालुक्यातलं ढवळपुरी हे एक खेडेगाव. या खेड्यातले ज्ञानदेव चितळकर रोजगाराच्या शोधासाठी ८०च्या दशकात मुंबईत आले. ‘राष्ट्रीय केमिकल फर्टिलायझर’मध्ये माथाडी कामगार म्हणून काम करु लागले. माथाडी म्हणजे माथ्यावरुन ओझी वाहून नेणारे. ज्ञानदेव अन्य माथाडी कामगारांसारखेच कष्टाळू. त्यांना समर्थपणे साथ देत होत्या त्या त्यांच्या पत्नी सिंधू. या दाम्पत्यास तिन्ही मुलंच होती. बाबासाहेब, भागवत आणि संदीप. ज्ञानदेवरावांच्या तुटपुंज्या पगारावर पाचजणांचं कुटुंब चालवणं सिंधूबाईंना अवघड जात होतं. त्यांनी संसाराला हातभार म्हणून भाजीपाला विकायला सुरुवात केली.



सर्वांत मोठा मुलगा होता बाबासाहेब. बाबासाहेब चौथीपर्यंत गावतल्याच जिल्हा परिषद शाळेत शिकले. पाचवीला वडिलांकडे आल्यानंतर वाशीच्या टिळक एज्युकेशन सोसायटीच्या शाळेत दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. अकरावी ते तेरावी वाशीच्या कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयातून पूर्ण केले. शेवटची दोन वर्षे मात्र त्यांनी पुणे विद्यापीठातून पूर्ण केली. वाणिज्य शाखेची पदवी पहिल्या श्रेणीत ते उत्तीर्ण झाले. पुढे त्याने ‘बिझनेस मॅनेजमेंट’मधून पदव्युत्तर पदविका प्राप्त केली. खरंतर त्यांना एमबीए करायचे होते, मात्र, घरची आर्थिक परिस्थिती त्यास पोषक नव्हती. लहान असलेल्या दोन्ही भावांचं शिक्षण चालू होतंच. आपण आपला शैक्षणिक भार आई-वडिलांवर टाकायचा नाही, या निश्चयाने एमबीए होण्याच्या स्वत:च्या इच्छेला बाबासाहेबांनी मुरड घातली. घराला आर्थिक हातभार म्हणून ते नोकरी करु लागले. त्यांची पहिली नोकरी होती ‘रिलायन्स कम्युनिकेशन’मधली. पगार होता फक्त चार रुपये. दरम्यान ज्ञानदेव आणि सिंधू या दाम्पत्याने किराणामालाचे दुकान सुरु केले होते. ‘रिलायन्स कम्युनिकेशन’मध्ये दोन वर्षे नोकरी केल्यानंतर ‘रिलायन्स रिटेलर्स लिमिटेड’मध्ये नोकरीची संधी मिळाली. त्या ठिकाणी ‘एक्झिक्युटिव्ह’ म्हणून बाबासाहेब नोकरीस लागले. तिथे रात्रपाळी असायची. त्यामुळे दिवसा दुकान आणि रात्री नोकरी अशी दुहेरी जबाबदारी बाबासाहेब पार पाडू लागले. या ठिकाणी त्याने तब्बल सहा वर्षे नोकरी केली. साहाय्यक व्यवस्थापक पदापर्यंत त्यांना बढती मिळाली. ३५ हजार रुपये पगार होता. सर्व काही सुरळीत आहे, असे वाटत होते. परंतु, बाबासाहेबांना नोकरीच्या चाकोरीबद्ध चौकटीत अडकायचे नव्हते. त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला. व्यवसाय करायचे मनाशी पक्कं केले.



कॉर्पोरेटमध्ये असताना बाबासाहेबांनी पाहिलं होतं की, ‘हाऊसकिपिंग’ हे एक महत्त्वाचं आणि मोठा वाव असलेलं क्षेत्र आहे. तसं तर बाबासाहेबांना स्वच्छतेची आवड होतीच. या आवडीलाच व्यवसायात रुपांतरित करण्याचं त्यांनी ठरवलं. नोकरीतून जमा केलेले आणि काही प्रमाणात उधार उसनवारीवर घेऊन दहा लाखांचं भांडवल जमा केलं. ‘मास्टर क्लीन फॅसिलिटी मॅनेजमेंट’ नावाची कंपनी सुरु केली. ‘गोदरेज’, ‘स्टार बझार’, ‘बिग बझार’सारख्या नामांकित कंपन्यांना बाबासाहेबांची कंपनी हाऊसकिपिंगची सुविधा पुरवू लागली. तब्बल १०० कर्मचारी ‘मास्टर क्लीन’मध्ये कार्यरत होते. निव्वळ दोन वर्षांत कंपनीने ७० लाखांची उलाढाल केली. दरम्यान, एक शासकीय कंत्राट मिळाले. त्या कंत्राटासाठी आणखी १०० कर्मचार्यांची नियुक्ती केली. तब्बल सव्वा कोटी रुपयांचे ते कंत्राट होते. मात्र, या व्यवहारात प्रचंड नुकसानीला सामोरे जावे लागले. परिणामी, २०१७ साली ‘मास्टर क्लीन हाऊसकिपिंग कंपनी’ बंद करावी लागली. कंपनी बंद पडल्यानंतरची आर्थिक परिस्थिती भयावह होती. आर्थिक परिस्थितीपेक्षासुद्धा लोकांचे टोमणे, बोचरी टीका त्यांच्या मनाला घायाळ करायची. ‘बिझनेस करायची लायकी नाही तुझी’ असं बोलण्यापर्यंत काहीजणांची मजल गेली होती. नोकरी करायची इच्छा नसतानासुद्धा बाबासाहेबांना नोकरी शोधावी लागली. सुरुवातीस एका खासगी कंपनीत साडेतीन महिने काम केल्यावर बाबासाहेब पेटीएममध्ये सेल्सचं काम करु लागले. चार महिने तिथे काम केले. या कामानंतर एका ‘रिअल इस्टेट एजन्सी’मध्ये तीन महिने काम केले. अशाप्रकारे जवळपास वर्षभर नोकरी करुन विक्रीकौशल्य त्यांनी आत्मसात केले.

बाबासाहेबांची आजी मंडाबाई. मंडाबाईला दोन मुले आणि एक मुलगी. पहिला ज्ञानदेव आणि दुसरा सोपान आणि तिसरी छबुबाई. मंडाबाईने १९८७ साली फरसाण आणि भेळ बनविण्याचा व्यवसाय ढवळपुरीमध्ये सुरु केला होता. फरसाण आणि चिवडा यांची चव कमालीची होती. पंचक्रोशीत त्याची वाहवा होत असे. सोपान आईला फरसाणच्या कामात मदत करत असे. नोकरी करुन कंटाळलेल्या बाबासाहेबांच्या मनात एक विचार आला. आपल्या आजीचाच व्यवसाय आपण केला तर... त्यांनी पत्नी, अर्चना चितळकर यांच्यासोबत चर्चा केली. पत्नीने होकार दिल्यानंतर हाच व्यवसाय करायचे निश्चित झाले. दुकान घेण्याएवढे पैसे नसल्याने थेट फूटपाथवरच त्यांनी ठाण मांडले. बाबासाहेब हे कोपरखैरणेला, तर त्यांची पत्नी घणसोलीला फरसाण-भेळ विकू लागले. चविष्ट, झणझणीत फरसाणाची ख्याती सर्वत्र पसरली. जोरदार विक्री होऊ लागली. काहीच महिन्यांत बाबासाहेबांनी दोन दुकाने घेतली. ‘चितळकर बंधू नमकीन आणि भेळवाले’ म्हणून फरसाण आणि भेळ प्रसिद्ध झाले. अवघ्या महाराष्ट्रातून मागणी येऊ लागली. यातूनच दोन जणांनी चितळकर बंधूची फ्रंचाईझी घेतली. अवघ्या काही वर्षांत ‘चितळकर बंधू नमकीन आणि भेळ’ने कोटी रुपयांची उलाढाल केली.



येत्या काही वर्षांत महाराष्ट्रभरात ‘चितळकर बंधू नमकीन आणि भेळ’च्या १०० फ्रँचाईझी सुरु करण्याचे बाबासाहेबांचे ध्येय आहे. खरंतर या माध्यमातून त्यांना उद्योजक घडवायचे आहेत. यासाठी त्यांनी दोन प्रारुप विकसित केले आहे. फ्रँचाईझीच्या माध्यमातून उद्योजक बनू पाहणार्या व्यक्तीकडे उद्योजकीय मानसिकता असावी. त्याची स्वत:ची वा भाड्याची जागा असावी. कंपनी इंटिरिअर, ब्रॅण्डिंग, प्रशिक्षण व तयार माल पुरविणार आहे. विशेषत: कोरोनाच्या काळात तरुणांनी उद्योजक बनण्यासाठी ही उत्तम संधी आहे. आम्ही उद्योजक बनू पाहणार्या तरुणास आमच्यापरिने सर्वतोपरी मदत करण्याचा प्रयत्न करु, असे बाबासाहेब चितळकर म्हणतात. तसेच महिला बचतगटांना या माध्यमातून सक्षम करण्याचा त्यांचा मानस आहे. मंडाबाईनंतर त्यांचे पुत्र आणि बाबासाहेबांचे काका सोपानरावांनी चितळकर बंधू व्यवसायास विस्तृत रुप दिले. त्यानंतर बाबासाहेबांनी या व्यवसायास आधुनिक रुप दिले. समाजमाध्यमांवर नेले. या व्यावसायिक प्रवासात बाबासाहेबांना त्यांचे बंधू सोमनाथ, संतोष, अमोल, संदीप, भागवत यांनी समर्थपणे साथ दिली. तसेच पत्नी अर्चना चितळकर या स्वत: बाबासाहेबांच्या खांद्याला खांदा लावून एका दुकानाची जबाबदारी पार पाडत आहेत. या दाम्पत्याला तन्वी आणि अन्वित अशी दोन गोंडस मुले आहेत. ‘सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट’या महाराष्ट्रीय उद्योजकीय संघटनेचा आपल्या व्यावसायिक आयुष्यात मोलाचा वाटा आहे, असे बाबासाहेब चितळकर प्रांजळपणे कबूल करतात. ‘सॅटर्डे क्लब’चे संस्थापक इंजि. माधवराव भिडे यांचा आपल्या आयुष्यावर फार मोठा प्रभाव आहे, असे सांगताना ते भावूक होतात.


आपली जन्मभूमी अर्थात ढवळपुरीप्रति कृतज्ञता म्हणून बाबासाहेब चितळकर आणि त्यांचे बंधू मोठ्या प्रमाणावर सामाजिक कार्य करतात. संतोष थोरात यांनी सुरु केलेल्या ढवळपुरी सामाजिक संस्थेचे ते संचालक आहेत. या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी एक वाचनालय उभारले असून सुमारे दोन हजार पुस्तकांचा लाभ परिसरातील शेकडो विद्यार्थी घेत आहेत. विशेषत: सेवा/सनदी परीक्षा देणार्या विद्यार्थ्यांसाठी हे वाचनालय उपयुक्त ठरत आहे. आदर्श तरुण घडविणार्या प्रसिद्ध नवजीवन परिवाराचे संस्थापक यशवंत थोरात महाराज या संस्थेचे प्रमुख सल्लागार व मार्गदर्शक आहेत. संकटावर मात करुन उसळी मारुन पुन्हा यश प्राप्त करणे जणू आता बाबासाहेब चितळकरांचा स्वभावगुणच झाला आहे. कमालीचा साधेपणा, आवाजातील मृदूता, स्वभावातील ऋजुता, प्रामाणिकपणा, मेहनत, स्नेहबंध यामुळे त्यांचा मित्रपरिवारदेखील अफाट आहे. माणसाला आपलंसं करण्याच्या या हातोटीमुळेच एका माथाडी कामगाराचा मुलगा आज कोट्यवधी रुपयांची उलाढाल करणारा उद्योजक बनलेला आहे.
Powered By Sangraha 9.0