सोलापूरात दुर्मीळ पांढऱ्या 'माळचिमणी'चे दर्शन

    दिनांक  08-Oct-2020 19:32:43
|

bird _1  H x W:


पक्षीनिरीक्षणादरम्यान आढळली अल्बिनो चिमणी 


मुंबई (विशेष प्रतिनिधी) - सोलापूरच्या माळरानावर दुर्मीळ पांढऱ्या रंगाच्या म्हणजेच अल्बिनो प्रकारातील माळचिमणीचे (Ashy crowned sparrow lark) दर्शन घडले आहे. सर्वसामान्यपणे माळचिमण्या या मातकट रंगाच्या असतात. बुधवारी पक्षीनिरक्षण करताना हौशी पक्षीनिरीक्षकांना ही अल्बीनो चिमणी निदर्शनास पडली. अल्बीनो चिमणीच्या दर्शनाने माळरानांवरील पर्यावरणीय परिसंस्थेचे महत्त्वही अधोरेखित झाले आहे. 
 
 
 
 
पक्षीनिरीक्षणादरम्यान पक्षीशास्त्रातील अनेक गुपिते उलगडत असतात. पेशाने शिक्षक असलेले शिवानंद हिरेमठ आणि महादेव डोंगरे सोलापूरच्या आसपास असलेल्या माळरानावर पक्षी निरीक्षण करताना त्यांना दुर्मीळ पक्ष्याचे दर्शन घडले. बुधवारी पक्षीनिरीक्षणादरम्यान त्यांना समोरून उडणाऱ्या ८ ते १० पक्ष्यांच्या थव्यामध्ये पूर्ण पांढरा रंग असलेला एक पक्षी दिसला. थोड्या अंतरावर हे सर्व पक्षी उतरले. त्यानंतर केलेल्या निरीक्षणादरम्यान माळचिमण्यांच्या या थव्यातील एक पक्षी दुर्मीळ अल्बिनो प्रकारातील असल्याचे आमच्या निदर्शनास आल्याची माहिती शिवानंद हिरेमठ यांनी दिली. हा पक्षी नर प्रजातीचा असल्याचे त्यांनी सांगितले.

bird _1  H x W: 
 
 
सजीवांमध्ये 'अल्बीनिजम' हा अनुवांशिक आणि जन्मजात असलेला एक प्रकार आहे. यामध्ये त्यांचा शरीरात मेलनिन रंगद्रव्यांचा अभाव झाल्याने पांढरा रंग निर्माण होतो. रंगद्रव्याच्या अभावामुळे पक्ष्यांना अंधत्व, कमकुवत पिसे अशा अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे अल्बीनो पक्षी हे फार काळ जगत नाहीत.
 
 
माळचिमण्यांविषयी...
माळचिमण्यांचा मातकट रंग जमिनीशी अगदी मिळता जुळता असल्याने हे पक्षी चटकन दिसत नाहीत. जमिनीला चिटकून ते बिया व कीटक शोधण्यासाठी नागमोडी वळणात वाखरत पुढे पुढे जातात. नर पक्षी उडताना आकाशात लक्षणीय कसरतीचे प्रदर्शन करतो. मादी पक्षी एकावेळी जवळपास २ ते ३ अंडी घालते. पिल्लांची काळजी घेण्याच्या कामात नरही मादीला मदत करतो. 


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.