भाजपच्या निषेध मोर्चावर बेछुट लाठीचार्ज

    दिनांक  08-Oct-2020 15:33:36
|

BJP _1  H x W:


कोलकाता :
पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या नेत्याच्या हत्येच्या निषेधार्थ भाजप कार्यकर्त्यानी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या कार्यालयावर हल्लाबोल केला. कोलकाताच्या नाबन्ना स्थित मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयावर चाल करून आलेल्या भाजप कार्यकर्त्यांविरुद्ध पोलिसांनी अश्रू धूर आणि वॉटर कॅननचा वापर केलाय. त्यामुळे, राज्यात भाजप कार्यकर्त्यांच्या हत्याविरोधात पक्षाकडून केल्या जाणाऱ्या आंदोलनाला हिंसक वळण लागले. भाजपकडून आज राज्यभर 'नाबन्ना चलो' आंदोलन पुकारण्यात आले होते.

या घटनेबद्दल बोलताना भाजप नेता लॉकेट चटर्जी यांनी 'पोलिसांनी आमच्या कार्यकर्त्यांविरोधात लाठीचार्ज केला आहे. खिदिरपूरकडून दगडफेक केली जातेय, पोलिसांना ते दिसत नाही का?' असे म्हणत राज्य सरकारविरोधात हल्लाबोल केलाय. भाजप यूथ विंगचे नवे प्रमुख तेजस्वी सूर्या खास या आंदोलनात सहभागी होण्यासाठी कोलकाताला दाखल झाले होते. पश्चिम बंगालच्या सचिवालय नाबन्नाच्या बाहेर शेकडोंच्या संख्येने भाजप कार्यकर्ते उपस्थित झाले. याभागात तैनात असलेल्या पोलिसांनी रोखण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्यांची पोलिसांसोबत झडपही झाली. त्यानंतर पोलिसांना कार्यकर्त्यांना अडवण्यासाठी अश्रू धूर आणि वॉटर कॅननचा वापर केला. यामध्ये अनेक भाजप कार्यकर्ते जखमी झाले आहेत.


भाजप नगरसेवकाची हत्या

२४ परगनामध्ये भाजपचे नगरसेवक मनीष शुक्ला यांची रविवारी सायंकाळी हत्या करण्यात आली होती. मोटारसायकलीवरून आलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला आणि घटनास्थळावरून पसार झाले. या हल्ल्यात शुक्ला यांचा मृत्यू झाला होता. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे अन्वेषण विभागाकडून टीटीगढ रोडवर सीसीटीव्ही फुटेज तपासणी करून अनेक स्थानांवर छापे घालण्यात आले. त्यानंतर या प्रकरणात तीन जणांना अटक करण्यात आली.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.