ब्रह्मज्ञानाची अजब तर्‍हा

07 Oct 2020 20:05:08

adya aradhya_1  


ब्रह्म सदासर्वकाळ सर्व ठिकाणी असतेच असते. त्याच्याशिवाय रिकामी जागा दाखवता येत नाही, पण त्याला वेगळेपणाने पाहायला गेले तर ते दुरावते. त्याचा संबंध सुटतो. दृश्यजगातील वस्तू जाणून घेण्यासाठी जे उपाय आपण करीत असतो, ते उपाय अद्वैत परब्रह्म जाणण्यासाठी केले, तर ते येथे अपायकारक ठरतात. अशी ही ब्रह्मज्ञान प्राप्तीची तर्‍हा अजब आहे.



ब्रह्मज्ञानाची अर्थात आत्मज्ञानाची अनुभूती ही सूक्ष्म असते. तथापि ती समजून घेण्याचा प्रयत्न करणे कसे शक्य आहे, याची साधकबाधक चर्चा दासबोधात आढळते. गेल्या वेळी आपण पाहिले आहे की, मनाला जशी सवय लावावी तशा पद्धतीने ते कार्य करीत असते. इंद्रियांद्वारा दृश्यवस्तूचे ज्ञान मिळविण्याची सवय लावावी, तशा पद्धतीने ते कार्य करीत आहे. तसेच मन कधी तार्किक विचाराने दृश्यजगातील जगातील वस्तूचे अथवा प्रसंगाचे ज्ञान अनुमान करुन मिळविण्याचा प्रयत्न करते. तसे पाहिले तर अनुमान करणे हेसुद्धा इंद्रियांच्या पूर्वानुभवावर अवलंबून असते. त्यामुळे तार्किक अनुमान हे इंद्रियजन्य ज्ञानाचा एक भाग आहे, असेच म्हणावे लागेल. परंतु, ज्ञानप्राप्तीची मनाची ही सवय ब्रह्मवस्तू ज्ञानासाठी उपयोगी पडत नाही, हे आपण मागील लेखात पाहिले.


इंद्रियांद्वारा वा कल्पनेद्वारा दृश्यवस्तू जाणण्याची मनाला लागलेली सवय बदलता आली, तर ब्रह्मवस्तूचे आकलन शक्य होईल, असे अध्यात्मशास्त्र मानते. तथापि मन हे अतिचंचल आहे. त्याला स्थिर करुन वेगळ्या दिशेला वळवणे हे खरोखर महाकर्मकठीण आहे, असाच सर्वांचा अनुभव आहे. भगवद्गीतेत अर्जुनालाही हा प्रश्न पडल्याचे म्हटले आहे. महाभारत युद्धाप्रसंगी अर्जुनाचा मोह नाहीस व्हावा म्हणून भगवंतांनी निरनिराळे योग सांगून पाहिले, त्यातील ‘समत्वयोग’ ऐकल्यावर अर्जुनाने गीतेच्या सहाव्या अध्यायात मनाविषयी हाच प्रश्न उपस्थित केला आहे. अर्जुन म्हणतो, “हे मधुसुदन, तुम्ही जो समत्वयोग मला आचरायला सांगता, तो मनाच्या चंचलपणामुळे टिकणारा नाही.” त्या श्लोकावर भाग्य करताना संत ज्ञानेश्वरांनी एक ओवी लिहून ते भाव अधिक स्पष्ट केले आहे.
म्हणौनी ऐसे कैसे घडेल। जे मर्कट समाधी येईल।
कां राहा म्हणतलिया। राहेल महावातु?॥ (ज्ञा.६.१४३)


मनाला स्थिर करता येईल, असे कसे घडेल, माकडाला कधी समाधी लागेल का? किंवा वादळी वार्‍याला ‘स्थिर हो’ असे सांगितले तर तो थांबेल का? त्याप्रमाणे मनाला आवरता येणे कसे शक्य आहे, या अर्जुनाच्या शंकेला उत्तर देताना भगवंतांनी सांगितले आहे की, हो ते शक्य आहे. गीतेतील या श्लोकात हे स्पष्ट केले आहे.
असंशयं महाबाहो मनो दुर्निग्रहं चलम् ॥
अभ्यासेन तु कौंतेय वैराग्येण च गृह्यते ॥ (गी.६.३५)
भगवंत म्हणतात, “अर्जुना, तू जे म्हणतोस की मन चंचल व आवरायला कठीण आहे, याबद्दल संशय घेण्याचे कारण नाही. परंतु, अभ्यासाने आणि वैराग्याने या चंचल मनाला जिंकता येते.”



ब्रह्मज्ञान प्राप्तीसाठी इंद्रियांद्वारा ज्ञान मिळवण्याची मनाची सवय बाजूला सारुन मनातील कल्पनेचे खेळ थांबवल्याशिवाय ब्रह्मज्ञानाचा विचार करता येणार नाही. विवेकाच्या साहाय्याने स्वत: ब्रह्म होऊन ब्रह्मज्ञान कसे प्राप्त करता येईल, यासंबंधीचे विचार दासबोधातून अभ्यासता येतात. आत्मसाक्षात्कार झाल्यानंतर जी स्वरुपरिस्थिती किंवा ब्रह्मवस्था प्राप्त होते, ती अनुभूती इतकी सूक्ष्म असते की, तिचे शब्दांमध्ये वर्णन करता येत नाही, असे असले तरी समर्थ दासबोधात ब्रह्मज्ञान कसे आहे आणि कसे नाही, हे सांगून ते समजावण्याचा प्रयत्न करतात. त्यासाठी समर्थांच्या प्रतिभेची झेप एवढी उत्तुंग आहे की, ते समजून घेताना आपली बुद्धी तोकडी पडते आणि ते समजले, कळले असे वाटत असताना त्यातील कितीतरी सूक्ष्मार्थ निसटून गेलेला असतो. त्यामुळे या लेखात काही भावार्थ कमी पडला तर ती लेखकाची त्रुटी आहे, समर्थविचारांची नाही. असं म्हणतात की, मनाच्या वृत्ती निमाल्यानंतर ब्रह्मज्ञानाची जाणीव होऊ लागते. त्यानंतर पुढे ‘हे मी जाणले’ असे वाटू लागले की तेथे द्वैत निर्माण होते आणि मूलत: अद्वैत स्वभावाचे ब्रह्म हाती लागत नाही, अशी ही विरोधाभासाची स्थिती त्याठिकाणी अनुभवायला मिळते. स्वामींनी ही स्थिती दासबोधात कशी मांडली आहे पाहा-
जे आठविता विसरिजे। कां ते विसरोनि आठविजे ॥
जाणोनिय नेणिजे । परब्रह्म तें ॥ (७.७.१९)


विरोधाभास अलंकाराचे हे छान उदाहरण आहे. ब्रह्म सदासर्वकाळ सर्व ठिकाणी असतेच असते. त्याच्याशिवाय रिकामी जागा दाखवता येत नाही, पण त्याला वेगळेपणाने पाहायला गेले तर ते दुरावते. त्याचा संबंध सुटतो. दृश्यजगातील वस्तू जाणून घेण्यासाठी जे उपाय आपण करीत असतो, ते उपाय अद्वैत परब्रह्म जाणण्यासाठी केले, तर ते येथे अपायकारक ठरतात. अशी ही ब्रह्मज्ञान प्राप्तीची तर्‍हा अजब आहे, त्यातील गंमत अशी की, ‘हे ब्रह्म म्हणजे काहीच समजत नाही बुवा’ असे अंत:करणाच्या आतून वाटले की, ते समजते आणि ‘मी हे ब्रह्म जाणले’ असे वाटू लागेल की ते अजिबात समजलेले नसते.
तें नुमजतांच उमजे। उमजोन कांहींच नुमजे।
ते वृत्तीविण पाविजे। निवृत्तीपद॥ (७.७.२४)
ध्यान-चिंतन आदी क्रिया या मनाच्या वृत्ती आहेत. पूर्णपणे वृत्तिविरहित झाल्याशिवाय ब्रह्मपद मिळत नाही. ब्रह्मपद हे निवृत्ती आहे. त्यामुळे ब्रह्माचे ध्यान करु म्हटले तर ते शक्य नाही, त्याचप्रमाणे ब्रह्माचे चिंतनही करता येत नाही. त्याचे अनुसंधान साधण्याचा प्रयत्न केला, तरी ते हाती लागत नाही. ध्यान, चिंतन, अनुसंधान या मानाच्या वृत्ती आहेत आणि वृत्तिनिवृत्ती हेच मुळात ब्रह्मज्ञानाचे निर्णयात्मक प्रमाण आहे. त्यामुळे ब्रह्मज्ञानप्राप्तीच्या अनेक अडचणी मनासमोर उभ्या राहतात.
दासबोध ग्रंथाच्या प्रास्ताविक समासात समर्थांनी स्पष्ट केले आहे की, ‘ग्रंथा नाम दासबोध । गुरुशिष्यांचा संवाद।’


त्यामुळे तत्त्वज्ञानातील एखादी संकल्पना मांडताना संवाद साधणार्‍या शिष्यांच्या मनात कोणत्या शंका असतील, याचा अगोदरच विचार करुन स्वामी विवरण करतात. आता ‘ब्रह्मज्ञान’ या विषयाच्या संदर्भात कोणत्या शंका मनात येऊ शकतात, त्यांचा ऊहापोह स्वामी दासबोधात करतात. ब्रह्म समजण्यासाठी ते दृश्यवस्तूंपैकी कशासारखे आहे किंवा त्याला कशाची उपमा देता येईल, हे स्वामी उलगडून सांगतात. ब्रह्म पाण्यासारखे आहे म्हणावे, तर ते पाण्यापेक्षाही निर्मळ आणि निश्चल आहे. सर्व विश्व पाण्यात बुडाले तरी ब्रह्म भिजत नाही. ते कोरडेच राहते. म्हणून त्याला पाण्याची उपमा देता येत नाही. ब्रह्म प्रकाशासारखे नाही. ते अंधारासारखेही नाही. थोडक्यात, ब्रह्म हे दृश्य जगातील कोणत्याही वस्तूसारखे नाही. मनाला काहीतरी वस्तू दाखवल्याशिवाय ते मनासमोर कसे येईल? बरं, त्याचे चिंतन करायचा प्रयत्न केला तरी ते मनासमोर उभे करता येत नाही. कारण, मन हे स्थलकाळाच्या मर्यादेत काम करते, तेव्हा अनंत ब्रह्म त्यात मावणार नाही. मन ब्रह्माला पाहायला असमर्थ असेल आणि अनेक प्रयत्न करुन जर ते मनासमोर येत नसेल, तर मग त्याच्या अस्तित्वाविषयी शंका येऊ लागते. असे वाटू लागते की, हे सारे खोटे असले पाहिजे. मग जे खरे नाही ते पाहण्याचा अट्टाहास करायचा कशाला?
लटिकेंचि काये पाहावें। कोठे जाऊन राहावें।
अभाव घेतला जीवें। सत्य स्वरुपाचा॥
ब्रह्म नेमके कुठे आहे हे माहीत नसल्याने त्याला शोधायला कुठे जाऊन राहायचे? अशामुळे जे सत्यस्वरुप आहे ते नाहीच, असे जीवाला वाटू लागते. आपली असमर्थता लपवण्यासाठी आपण ब्रह्माचे अस्तित्वच नाकारु लागतो. परब्रह्माला अस्तित्व नाही असे म्हटले, तर व्यासादिकांसारख्या ब्रह्मज्ञानी पुरुषांनी जे महान कार्य करुन ठेवले, ते खोटे म्हणण्याची वेळ येते. पण, ते बरोबर नाही.
अभावचि म्हणो सत्य। तरी वेदशास्त्र कैसे मिथ्य।
आणि व्यासादिकांचे कृत्य। वाऊगे नव्हे॥ (दा.७.७.३१)


- सुरेश जाखडी


Powered By Sangraha 9.0