निराधार महिलांचे सक्षमीकरण

06 Oct 2020 23:22:58

samtol mitra_1  


‘समतोल’चे मनपरिवर्तन शिबीर हे एक मॉडेल बनलेले केंद्र आहे. समस्याग्रस्त असणार्‍या मुलांना स्वतः मनपरिवर्तन होण्यासाठी येथे खास प्रयोग केले जातात, यातून अनेक मुले सक्षमपणे बाहेर पडून समाजाच्या मुख्य प्रवाहात आली आहेत.

'समतोल’ कार्याशी आपण सगळेच ‘समतोल मित्र’ म्हणून जोडलेले आहोत. ‘समतोल’ वेगवेगळ्या क्षेत्रांत, वेगवेगळ्या विषयांवर कार्य करीत आहेत व हे कार्य समाज ‘आत्मनिर्भर’ होण्यासाठी आहे. ‘समतोल’चे मनपरिवर्तन शिबीर हे एक मॉडेल बनलेले केंद्र आहे. समस्याग्रस्त असणार्‍या मुलांना स्वतः मनपरिवर्तन होण्यासाठी येथे खास प्रयोग केले जातात, यातून अनेक मुले सक्षमपणे बाहेर पडून समाजाच्या मुख्य प्रवाहात आली आहेत. मुलांबरोबर निराधार महिलांचे सक्षमीकरण होण्यासाठी ‘समतोल’ने प्रयत्न सुरु केले आहेत. त्यासाठी गावागावातील निराधार महिला एकत्र करून दहा महिलांचा ग्रुप तयार केला जातो, ज्यामध्ये महिलांना शिवणकामाचे कौशल्य असणे जरुरीचे आहे.

त्यांच्या या कौशल्याचा विचार करून त्यांना ८ ते १२ व १३ ते १८ वयोगटातील मुलांना पॅन्ट, शर्ट शिवण्यासाठी तयार केले जाते. यासाठी लागणारे सर्व साहित्य संस्था पुरविते. परंतु, यामध्ये काही अटी व नियम तयार केले आहेत, जे सामाजिक बांधिलकी म्हणून पाळावे लागतात. सर्व महिलांनी मिळून शाळा, वसतिगृह, अनाथाश्रम, आदिवासी पाडा किंवा जिथे मुलांना कपड्यांची गरज आहे, तिथे जाऊन कपड्यांचे वर्षभर नि:शुल्क वाटप म्हणजे दान करायचे आहेे. त्याचप्रमाणे प्रत्येक महिलेने गावातील इतर महिलांना शिवणकाम मोफत शिकवायचे आहे. पुढील सहा महिन्यांत गावातील प्रत्येक महिलेला शिवण कौशल्य येईल. भविष्यात गावातील एकही महिला शिवणकामापासून वंचित राहणार नाही किंवा शिलाई येत नाही असे म्हणण्याची वेळ येणार नाही. सध्या जुन्नर तालुक्यातील बोरी गावात हा ग्रुप कार्यरत आहे व पुढे साळवाडी, भोरवाडी, वडगाव इतर गावात तयार होत आहे, हे सर्व काम महिलाच करत आहेत. दसराच्या शुभमुहूर्तावर माळशेजमधील थितबी येथील आदिवासी पाड्यात १०० मुलांना कपडे वाटप होणार आहे.

याचबरोबरीने तरुणांना सामाजिक कार्यात आणण्यासाठी कार्यकर्ता प्रशिक्षण सर्टिफिकेट कोर्ससुद्धा मोफत सुरू करणार आहेत, शिवाय स्पर्धा परीक्षेची मुलांनी तयारी करावी व प्रशासकीय सेवेत येण्यासाठी याच महिला ‘ज्ञानगंगा फिरती लायब्ररी’ सुरू करणार आहेत, जेणेकरून गावातील विकास ‘आत्मनिर्भर’ पद्धतीने करता येईल. शासनावर अवलंबून न राहता, स्वतः नियोजन करून विकास होण्यासाठी हे प्रत्यक्षात कार्य या महिला ग्रुप करून दाखवत आहे. यासाठी ‘समतोल संस्था’ मार्गदर्शन करत आहे.या सर्व कामासाठी सरपंच, ग्रामस्थ, प्रशासकीय अधिकारी, युवा, महिला वर्ग यांनी सहकार्य करावे, अशी विनंती संस्था म्हणून करत आहोत.


९८९२९६११२४
Powered By Sangraha 9.0