न्यायाग्रही जयदीप

06 Oct 2020 21:02:06

mansa_1  H x W:



वकिली हा केवळ एक व्यवसाय नसून, ते अन्याय दूर करण्याचे माध्यम आहे. त्यामुळे ‘पॅशन’ म्हणून वकिली व्यवसायात उतरलेल्या अ‍ॅड. जयदीप वैशंपायन यांची यशोगाथा...


आजच्या आधुनिक युगातदेखील सामान्य नागरिकांचा सर्वाधिक विश्वास असतो, तो न्यायव्यवस्थेवर. न्यायालयात काळा कोट आणि पांढरा सदरा घालून कार्यमग्न असणारा वकील हा ‘काळ्याचे पांढरे करणारा घटक’ नसून, शुभ्र चारित्र्याचा, कोणत्याही पाशात न अडकणारा आणि केवळ तथ्यावर आपली भूमिका मांडणारा एक विश्वासार्ह व्यक्ती असतो. इयत्ता बारावीनंतर अंगावर काळा कोट परिधान करून वकील होण्याचे स्वप्न नाशिक येथील प्रख्यात फौजदारी वकील जयदीप वैशंपायन यांनी उराशी बाळगले. ‘एलएलएम’पर्यंत शिक्षण झालेले वैशंपायन यांची अभ्यासूवृत्तीने प्रकट होण्याची तळमळ आणि तथ्यांवर आधारित खटला मांडण्याची आवड असल्याने त्यांनी हा व्यवसाय निवडला.


त्यांनी वकिली व्यवसायास २००९ साली सनद प्राप्त करून सुरुवात केली. गरिबांना कायदेशीर आधार देता यावा यासाठी त्यांनी तळमळीने अनेकविध खटले लढले. न्यायालयाच्या ‘लिगल एड’वरदेखील त्यांनी अनेक खटले लढवत, ज्या नागरिकांना वकील देणे शक्य होत नाही त्यांची बाजू न्यायालयात मांडली. बारावी कॉमर्स नंतर सनदी लेखापाल होण्याचे अनेकांनी जयदीप यांना सुचविले होते. मात्र, वकिलीचे शिक्षण पूर्ण करावे आणि प्रख्यात वकील म्हणून नावारूपाला यावे यासाठी वैशंपायन यांना त्यांचे वडील श्रीरंग वैशंपायन यांचे मोलाचे पाठबळ लाभले. त्यांच्या आजोबांचे मित्र व उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती भालचंद्र गाडगीळ व जयदीप वैशंपायन यांची सातत्याने भेट होत होती. न्यायाधीश किंवा वकील म्हणून माणूस कसा घडतो, याचे ते उत्तम उदाहरण होते, असे जयदीप आवर्जून नमूद करतात. त्यामुळे त्यांचे व्यक्तिमत्त्व व अ‍ॅड अविनाश भिडे यांचे व्यक्तिमत्त्व वैशंपायन यांच्यासाठी प्रेरणास्थान ठरले.

पदवीच्या तिसर्‍या वर्षात असतानाच त्यांनी न्यायालयात येण्यास आणि प्रत्यक्ष न्यायालयाचे कामकाज बघण्यास सुरुवात केली. त्यामुळे त्यांना न्यायालयाची प्रशासकीय व्यवस्था माहीत होण्यास मदत झाली. तसेच, त्यांनी ‘डिप्लोमा इन सायबर लॉ’, ‘डिप्लोमा इन सायबर क्राईम इनव्हेस्टिगेशन’, ‘सायबर क्राईम अ‍ॅनालिसिस’ आदी अभ्यासक्रमदेखील पूर्ण केले. विद्यार्थीदशेतच त्यांना नाशिक येथील महाराष्ट्र पोलीस अकादमीत अध्यापन करण्याची संधी प्राप्त झाली. येथे वैशंपायन यांनी जवळपास २५० ते ३०० पोलीस अधिकारी यांना ‘सायबर लॉ’बद्दल प्रशिक्षण दिले. त्यात पोलीस उपनिरीक्षक ते भारतीय पोलीस सेवेतील अधिकार्‍यांचाही समावेश होता. नाशिक येथील वरिष्ठ आणि प्रख्यात वकील अ‍ॅड. अविनाश भिडे यांच्याकडे वैशंपायन यांनी काही काळ ‘ज्युनिअरशीप’ केली. त्यावेळी वैशंपायन हे आपले कामकाज आटोपून घरी जात असताना रात्री 8च्या सुमारास एक मुलगा त्यांच्या जवळ आला व त्याने माझा सख्खा भाऊ पश्चिम आफ्रिकेमधील सीरिया लिऑन या देशात अडकला असल्याचे सांगितले.


त्याचा पासपोर्ट जमा केला गेला होता. तेथे त्याचे मालकाशी वाद झाल्याने खोट्या तक्रारीत त्यास गोवण्यात आले होते. त्यास तुरुंगवासदेखील झाला होता. त्याने भारतात दूरध्वनी करून आपबिती वर्णली होती. तथ्य काय आहे हे जाणून घेण्याकामी वैशंपायन यांनी ईमेल व फोन रेकॉर्डिंग तपासले. त्यात सत्यता आढळल्याने त्यांनी ही केस आव्हान म्हणून स्वीकारली. तेथील भारतीय दूतावासाला वैशंपायन यांनी संपर्क केला. भारतीय मंत्रालयाला संपर्क केला. आठ ते दहा दिवसांत तो मुलगा भारतात आला. वकील हा बुद्धिमत्तेच्या जोरावर अन्यायग्रस्त नागरिकाला कशा प्रकारे न्याय देऊ शकतो, याची जाणीव त्यावेळी वैशंपायन यांना झाली आणि वकिली व्यवसायाबद्दल त्यांचा आदर अधिकच द्विगुणित झाला. “फौजदारी क्षेत्रात काम करणार्‍या वकिलाला कुटुंब, व्यवसाय व सामाजिक जीवन हे वेगळे ठेवता आले पाहिजे. सामाजिकदृष्ट्या गुन्हा हा चुकीचा आहे,” असे वैशंपायन यांचे स्पष्ट मत आहे. नियमित प्राणायामाच्या जोरावर हे वेगळे करणे शिकलो असल्याचेही ते नमूद करतात.


आजवर वैशंपायन यांना मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात आरोपींच्या बाजूने लढण्याची संधी भिडे यांच्यामुळे मिळाली. त्या केसमध्ये मानसिक तणावाचे व्यवस्थापन कसे करावे, हे त्यांना उमगले. तसेच एका महिलेवर झालेल्या अतिप्रसंगबाबत रात्री ८ वाजेपर्यंत वैशंपायन यांनी न्यायालयात युक्तिवाद केला. कोट्यवधी रुपयांची काही आर्थिक गुन्हे प्रकरणेही त्यांनी हाताळली आहेत. आजवर ७०० पेक्षा जास्त खटले ते लढले आहेत. वकिलीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर सुरुवातीचा कालखंड हा पैसे कमविण्यासाठी न देता, २४ तास शिकण्यासाठी द्यावा, असा संदेश ते नवीन वकिलांना देतात. वकिली व्यवसाय हा ‘पॅशन’ म्हणून स्वीकारण्याचे आवाहनदेखील ते करतात. नाशिक येथील काही वित्तीय संस्थांच्या घोटाळ्यात त्यांनी जामिनासाठी केलेला विरोध हा उच्च न्यायालयानेही ग्राह्य धरला. तसेच त्यांनी नाशिक पोलीस आयुक्तालयाच्या आर्थिक गुन्हे शाखासाठी तपासातील कायदेशीर अडथळे दूर करण्याकामी विशेष सरकारी वकील म्हणूनदेखील कार्य केले आहे.अशा या न्यायासाठी कायमच आग्रही भूमिका घेणार्‍या अ‍ॅड. जयदीप वैशंपायन यांच्या कार्याला सलाम!
Powered By Sangraha 9.0