बोरिवली नॅशनल पार्कमध्ये खासगी वाहनांना यापुढे प्रवेशबंदी; उद्यानाच्या सुरक्षेला तंत्रज्ञानाचे कवच

    दिनांक  06-Oct-2020 20:29:38
|
borivali national park _1


तीन महिन्यात अंमलबजावणी 

 
मुंबई (विशेष प्रतिनिधी) - बोरिवलीचे 'संजय गांधी राष्ट्रीय उद्यान' पर्यटकांसाठी खुले झाल्यानंतर उद्यानात खासगी वाहनांना प्रवेश बंदी असणार आहे. गाड्यांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा मुद्दा प्रशासनाने गांभिर्याने घेतला असून यापुढे खासगी वाहनांची सोय उद्यानाबाहेर तयार केलेल्या वाहनतळामध्ये केली जाईल. पुढील तीन महिन्यांमध्ये अतिक्रमणावर लक्ष ठेवण्यासाठी उपग्रह छायाचित्रण प्रकल्प, कर्मचाऱ्यांच्या संवादाकरिता वायरलेस संप्रेषण प्रणाली आणि उद्यानाच्या गाभा क्षेत्रात चोवीस तास कार्यान्वित असणाऱ्या संरक्षण चौक्या उभारण्यात येणार आहेत. 
 
 
 
कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर बोरिवलीचे राष्ट्रीय उद्यान पर्यटनासाठी बंद आहे. मात्र, पहाटे प्रभातफेरीसाठी येणाऱ्या पासधारक लोकांकरिता येत्या पंढरवड्यात राष्ट्रीय उदयानाचे दरवाजे खुले होणार असल्याची माहिती संचालक जी. मल्लिकार्जुन यांनी दिली आहे. कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर मर्यादित लोकांना गटागटाने प्रभातफेरीसाठी सोडण्यात येईल. पंधरा दिवसांच्या चाचपणीनंतर पुढील निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. पर्यटकांसाठी राष्ट्रीय उद्यान खुले करण्याचा निर्णय राज्य सरकार घेणार आहे. या निर्णयानंतर राष्ट्रीय उद्यान खुले झाल्यावर पर्यटकांच्या खासगी वाहनांना उद्यानात प्रवेश बंदी करणार असल्याचे, मल्लिकार्जुन म्हणाले. पर्यटकांच्या वाहनांकरिता उद्यानाच्या मुख्य प्रवेशव्दाराबाहेर २५० वाहन क्षमता असणारे वाहनतळ उभारुन तयार आहे. याठिकाणी गाड्या ठेवून पर्यटकांना यापुढे उद्यानात प्रवेश मिळेल. 
 
 
 
 

उद्यानाअंतर्गत पर्यटकांच्या दळणवळणाकरिता पर्यावरण पूरक १६ इल्केट्रिकल बसचे कार्यान्वित करणार असल्याची माहिती राज्याचे अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक, वन्यजीव (पश्चिम) सुनील लिमये यांनी दिली. या बस 'नॅशनल हाई स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड'कडून उद्यान प्रशासनाला मिळणार आहेत. काॅर्पोरेशनकडून उभारण्यात येणारा 'मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प' राष्ट्रीय उद्यान आणि तुंगारेश्वर अभयारण्याला छेदून जात आहे. त्यासाठी पर्यावरणीय उपाययोजनाअंतर्गत या १६ बस देण्यात येणार आहेत. उद्यानाच्या सीमेवर आणि अंतर्गत भागातील अंतिक्रमणांच्या दैनंदिन मूल्यांकनासाठी उपग्रह छायाचित्रांची यापुढे मदत घेतली जाणार आहे. उपग्रह छायाचित्रणामुळे नव्या अतिक्रमणांचे मूल्यांकन करणे प्रशासनाला सोयीचे होणार आहे. याशिवाय उद्यानाच्या गाभा क्षेत्राच्या चोवीस तास संरक्षणाकरिता चौक्या उभारण्यात येणार आहेत. अतिक्रमण धारकारांकडून वनकर्मचाऱ्यांवर सातत्याने हल्ले होत असतात. अशा संकटसमयी गस्तीवर असणाऱ्या कर्मचाऱ्यांकडे वरिष्ठांसोबत संवाद साधण्यासाठी कोणतेही साधन नसते. त्यासाठी उद्यानाच्या १०४ चौ.किमी क्षेत्रामध्ये उपलब्ध असणारी 'वायरलेस संप्रेषण प्रणाली' उभारण्यात येणार आहे. या यंत्रणेमुळे वनकर्मचाऱ्यांना एकमेकांशी संवाद साधता येईल.

 
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.