'म्हणून करावे लागले मध्यरात्री अंत्यसंस्कार' ; योगी सरकारचे स्पष्टीकरण

06 Oct 2020 15:47:16

yogi adityanath _1 &



नवी दिल्ली :
हाथरसमधील चर्चित कथित बलात्कार आणि पीडित तरुणीच्या मृत्यू प्रकरणात उत्तर प्रदेश सरकारनं मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात शपथपत्र दाखल केले आहे. यामध्ये यूपी सरकारने कुटुंबीयांच्या परवानगीनंतर आणि हिंसेपासून बचावासाठी अर्ध्या रात्री पीडितेवर अंत्यसंस्कार करण्यात आल्याचेही म्हटले आहे. तसेच कथित बलात्कार आणि हल्ल्याच्या चौकशीसाठी सीबीआयकडे तपास सोपवण्यात यावा, अशी विनंती उत्तर प्रदेश सरकारकडून करण्यात आली आहे.


या प्रकरणाची राज्य सरकारकडून निष्पक्षपणे चौकशी केली जाऊ शकते परंतु, स्वार्थ साधण्यासाठी काही जणांकडून प्रयत्न सुरू आहेत, असंही योगी आदित्यनाथ सरकारचं म्हणणं आहे. १४ सप्टेंबर रोजी प्रकरणाची सूचना मिळाल्यानंतर पोलिसांनी तत्काळ प्रकरणाची नोंद केल्याचंही, उत्तर प्रदेश सरकारने सर्वोच्च न्यायालयात म्हंटले आहे.अयोध्या-बाबरी प्रकरणामुळे जिल्ह्यांना हाय अलर्ट जारी करण्यात आला होता. तसेच कोरोनामुळे गर्दी न होऊ देण्याचा उल्लेखही यूपी सरकारने आपल्या शपथपत्रात केला आहे. यूपी सरकारने म्हटले आहे, की अयोध्या-बाबरी प्रकरणात आलेल्या निकालाची संवेदनशीलता लक्षात घेत पीडितेच्या कुटुंबीयांच्या परवानगीने रात्रीच्या वेळी अंत्यसंस्कार करण्यात आले.


सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली सीबीआय चौकशी व्हावी, जेणेकरून खोट्या दाव्यांच्या आधारे चौकशीत अडथळे आणण्याचे प्रयत्न खोडून काढता येऊ शकतील अशी मागणी उत्तर प्रदेश सरकारनं सर्वोच्च न्यायालयात केलीय. सोशल मीडिया आणि मीडियाद्वारे जातीय संघर्ष आणि हिंसेला प्रोत्साहन देण्याचं षडयंत्र रचले गेले असेही योगी सरकारकडून आत्तापर्यंतच्या चौकशीची माहिती देताना म्हटले आहे.

Powered By Sangraha 9.0