पश्चिम बंगालमध्ये राजकीय हत्या म्हणजे ‘न्यू नॉर्मल’

05 Oct 2020 13:37:47

sambit_1  H x W

पश्चिम बंगालमध्ये राजकीय हत्या म्हणजे
न्यू नॉर्मल- संबित पात्रा


नवी दिल्ली, विशेष प्रतिनिधी : गेल्या २ महिन्यात पश्चिम बंगालमध्ये भाजपाच्या ८ कार्यकर्ते – नेत्यांच्या हत्या झाल्या असून आतापर्यंत ११५ बळी गेले आहेत. एकेकाळी बुद्धिवाद्यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखले जाणाऱ्या पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींच्या राज्यात राजकीय हत्या म्हणजे न्यू नॉर्मल ठरत आहेत, असा टोला भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते डॉ. संबित पात्रा यांनी सोमवारी पत्रकारपरिषदेत लगाविला.

 

प. बंगाल एकेकाळी देशाला दिशा देत असे, बुद्धिवाद्यांचा बालेकिल्ला अशी बंगालची ओळख होती. मात्र अगोदर डावे पक्ष आणि आता ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसच्या राजवटीत बंगाल हा राजकीय हत्यांचा बालेकिल्ला झाला आहे. अन्य राज्यांमध्ये लक्ष घालणाऱ्या ममता बॅनर्जी स्वत:च्या राज्यातील अराजकाबद्दल बोलत नाहीत. बंगालची स्थिती पाहता राज्यातील राजकीय हत्या म्हणजे न्यू नॉर्मल अशी स्थिती झाली आहे. भाजपाचे नगरसेवक मनिष शुक्ला यांची उत्तर २४ परगणा जिल्ह्यात नुकतीच पोलिस स्टेशनसमोर हत्या करण्यात आली, त्यामध्ये पोलिसांचाही हात असल्याचा आमचा आरोप आहे. गेल्या दोन महिन्यांत ८ कार्यकर्ते – नेत्यांचे बळी घेतले गेले असून आतापर्यंत तब्बल ११५ हत्या करण्यात आल्या आहेत. मात्र, तुम्ही आम्हाला मारत रहा, आम्ही दिवसेंदिवस मजबूत होत राहू या राष्ट्रकवी रविंद्रनाथ टागोर यांच्या उक्तीप्रमाणे भाजपा वाटचाल करीत राहणार असल्याचे पात्रा यांनी सांगितले.

 

बिहारमध्ये शक्तीकुमार या दलित नेत्याच्या हत्येमध्ये राजदचे तेजप्रताप आणि तेजस्वी यादव यांचे नाव आल्याचे पात्रा यांनी सांगितले. ते म्हणाले, राजदच्या एससी मोर्चाचे सरचिटणीस असलेल्या शक्तीकुमार यांना पक्षातून काढून टाकण्यात आले होते. ते अपक्ष निवडणूक लढविणार होते, मात्र त्यांच्याकडून लाखो रुपयांची खंडणी मागण्यात आली होती आणि त्यातूनच त्यांची हत्या झाली. त्यामध्ये तेजस्वी आणि तेजप्रताप सहभागी असल्याचे शक्तीकुमार यांच्या पत्नीने एफआयआरमध्ये म्हटले आहे. त्यामुळे राजदने याचा खुलासा करण्याची गरज आहे. त्याचप्रमाणे राजस्थानमध्ये दर दोन दिवसांनी बलात्काराची प्रकरणे समोर येत आहेत. त्यामुळे निवडक राजकीय पर्यटन करणाऱ्यांनी राजस्थानमध्येही जावे, असा टोलाही त्यांनी राहुल गांधी आणि प्रियांका गांधी – वाड्रा यांचे नाव घेता लगाविला.

 
 
Powered By Sangraha 9.0