गिधाडं आणि बलात्कार पीडितेचा मृत्यू

04 Oct 2020 21:22:59
Hathras case_1  



एखाद्या व्यक्तीचा मृत्यू मग ती मुलगा असो की मुलगी, तथाकथित सवर्ण असो की दलित त्या व्यक्तीच्या मृत्यूने एखाद्याला आनंद कसा होऊ शकतो? पण, नाही कुणी मेले की गिधाडाला जसा आनंद होतो, तसाच आनंद हाथरसच्या बलात्कार पीडितेच्या मृत्यूने काहीजणांना झाला आहे. मेलेल्याच्या टाळूवरचे लोणी खाणारे हे लोक कोण आहेत? सदासर्वकाळ समाज आणि देशात अस्थिरता माजवू पाहणारे हे लोक कोण आहेत? बरं! या लोकांना अतिशय न्यायप्रिय संवेदनशील मानवातावादी म्हणावं तर मग यांची मानवता विशिष्ट प्रकरणातच किंवा विशिष्ट संस्था, संघटना आणि व्यक्तीच्या विरोधातच का जागी होते? आता ही बलात्कार पीडिता उत्तर प्रदेशची रहिवासी आहे आणि ती तथाकथित मागास समाजाची मुलगी असून तिचे तथाकथित गुन्हेगार हे सवर्ण समाजाचे आहेत. उत्तर प्रदेशमध्ये भाजपचे त्यातही हिंदू श्रद्धांना मानणार्‍या योगी आदित्यनाथांचे सरकार आहे. त्यामुळे जातीपातीचे विषारी राजकारण खेळणार्‍यांना ही घटना म्हणजे ‘लॉटरी’ वाटते! उत्तर प्रदेशमध्ये योगींनी गुंडाराज संपवले असे वाटत असताना ही घटना घडली म्हणजे योगींची निंदा करण्याचे आयते कोलित सापडले असे यांना वाटते. पीडितेच्या मृत्यूचे राजकारण करणारे हे तेच लोक आहेत ज्यांनी रोहित वेमुलाच्या मृत्यूचे भांडवल केलेले. रोहितच्या मृत्यूचा अक्षरश: फायदा घेत या लोकांनी समाजात दरी पसरवण्याचे काम केले होते. आताही ही सगळी भूतावळ जागी झाली आहे. सेक्युलर, ह्युमन राईट्स वगैरे वगैरेचे मुखवटे घालून ही मंडळी समाजात विष कालवायला उभी राहिली आहेत. समाजात वावरताना कुणाही संवेदनशील आणि समाजशील व्यक्तीला माहिती आहे की, कोणत्याही समाजातील एखाद्या व्यक्तीने गुन्हा केला म्हणून तो पूर्ण समाज गुन्हेगार नसतो किंवा एखाद्या समाजातील व्यक्तीवर अन्याय झाला म्हणून त्या संपूर्ण समाजावरच अन्याय झाला, असे म्हणणे चूकच आहे. नव्हे, समाजात वितुष्ट माजवणारे समाजाचे गुन्हेगार आहेत. दुर्दैवाने पीडितेच्या मृत्यूने हे गुन्हेगार पुन्हा सरसावले आहेत. कोणाच्याही मृत्यूने आनंदित होणार्‍या या बेगडी मानवतावाद्यांच्या फुटीरतेला बळी पडायचे की नाही ही आता सर्जनशील आणि सभ्य समाजाची परीक्षा आहे. बाकी आमचा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानात्मक कायद्यावर विश्वास आहे. त्यामुळे सत्य असत्य, न्याय-अन्यायाच्या निकषावर पीडितेला न्याय मिळणारच!

 

कधी संपतील खोटारडी नाटकं!

 
निवडणुकीत पडणारे आणि काहीबाही बरळून लोकांच्या नजरेतून पडणारे कोण आहेत काही सांगायला हवे का? असो, संसदेत महत्त्वाचे कृषी विधेयक संमत होत असताना राहुल गांधी आणि त्यांच्या मातोश्री इटलीला रवाना झाले. इथे देशात आणि प्रत्यक्षात त्यांची सत्ता असणार्‍या महाराष्ट्रात लोक कोरोनाने मेली, काम नाही, धंदा नाही, अन्नधान्यविना कासावीस झाली. पण या माता-पुत्रांना आणि कन्येलाही जराही पान्हा फुटला नाही. ‘लॉकडाऊन’ आणि कोरोनाच्या काळातही पुण्याला खून झाला, वाधवान प्रकरण, करमुसे प्रकरण, पालघर साधू हत्याकांड झाले, अगदी हॉस्पिलटलमध्ये प्रेतांची अदलाबदली झाली, ‘क्वारंटाईन सेंटर’मध्ये कोरोनाच्या भीतीने हतबल असणार्‍या आया-बहिणींवर बलात्कार झाले. पण याबाबत मातोश्री, राजकुमार आणि राजकुमारीही गपगार होते. जणू महाराष्ट्र भारताबाहेर आहे आणि इथे काहीही झाले तरी चालेल. कारण, महाराष्ट्राला नेहमीच सापत्न वागणूक या लोकांनी आधीही दिलीच आहे. बरं! राजस्थानमध्येही असेच काहीसे सुरू आहे. पण तिथेही या तिघांनी अजिबात लक्ष दिले नाही. मात्र, उत्तर प्रदेशमध्ये बलात्कार पीडितेचा मृत्यू झाला आणि हे दोघे भाऊ-बहीण अगदी नवचेतना मिळाल्यासारखे तरतरीत झाले. हाथरस प्रकरणामध्ये राहुल गांधी आंदोलनाला गेले तिथे म्हणे पडले. पण याचेही भांडवल काहींनी केले. एक पोस्ट होती. त्यामध्ये एक पोलीस राहुल गांधींची कॉलर पकडतो. त्यावर लिहिले होते-हे पाहा ‘राष्ट्रीय पक्षाच्या नेत्याला मारहाण करताना उत्तर प्रदेशचे पोलीस.’ दुसरी पोस्ट होती की, ‘बेटी के लिये गिरा हैं हमारा नेता।’ हे सगळे पाहून वाटले की, खरोखर हे काय चालले आहे. पण भले व्हावे त्या आधुनिक तंत्रज्ञानाचे की त्यामुळे कळले की राहुल गांधी पडत असताना त्या पोलिसांनी त्यांना पडण्यापासून आवरण्याचा प्रयत्न केला होता आणि मऊशार गवत पाहून राहुलजींनी दुडकी उडी त्या गवतावर मारली होती. छे... हे सगळे का? केवळ लोकांची सहानुभूती मिळवण्यासाठी? की बघा ‘पीडितेसाठी न्याय मिळवताना मला पोलिसांनी मारले, खाली पाडले.’ काय म्हणावे या वृत्तीला? पण त्यात राहुलजींचा काय दोष? कारण, ज्या देशात नाकारलेली व्यक्ती पावसात भिजली म्हणून लोक सहानुभूतीने भरभरून मते देतात, त्या देशात पडल्यावर त्याहीपेक्षा जास्त सहानुभूती मिळेल असे राहुलजींना वाटणे साहजिकच आहे. खरंच कधी संपतील ही खोटारडीपणाची नाटकं!

Powered By Sangraha 9.0