इस्लामी फुटीरतावादावर हल्ला

04 Oct 2020 20:17:13

Agralekh_1  H x





आज इमॅन्युएल मॅक्रॉन इस्लाम जगावरील संकट असल्याचे म्हणताना दिसतात, उद्या त्यांच्या शेजारच्या देशांचे राष्ट्रप्रमुखही याच निष्कर्षावर येतील. तेव्हा मात्र, धर्माच्या नावाखाली चाललेले इस्लामी कट्टरपंथीयांचे सर्वच धंदे थांबतील, तसेच कितीही बिकट परिस्थितीत असला तरी कोणत्याही इस्लामी शरणार्थ्याला कोणीही आपल्या देशात प्रवेश देणार नाही. 
 
जगभरात फैलावणार्‍या इस्लामी कट्टरपंथाला रोखण्याचे अनेक देश प्रयत्न करत असतानाच युरोपातही इस्लामी कट्टरपंथाविरोधात माहोल तयार होत असल्याचे दिसते. त्याच मालिकेअंतर्गत गेल्या काही काळापासून फ्रान्सने इस्लामी कट्टरपंथाला थोपवण्यासाठी पुढाकार घेतला असून अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी नुकतेच देशाची धर्मनिरपेक्षता लक्षात घेता फ्रान्स इस्लामी कट्टरपंथाचा पूर्ण तयारीनिशी सामना करेल, असे म्हटले. इतकेच नव्हे तर इस्लामी कट्टरपंथ आणि इस्लामी फुटीरतावादाचा प्रचार-प्रसार करणार्‍यांना समाजातून बेदखल करण्यासाठी व १९०५ सालच्या धर्म व राज्यव्यवस्थेला एकमेकांपासून दूर ठेवणार्‍या कायद्याला अधिक बळकटी देण्यासाठी नवा कायदा करणार असल्याची घोषणाही त्यांनी केली.
 
 
अठराव्या शतकातील फ्रेंच राज्यक्रांतीने जगाला स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व ही तीन मूल्ये दिल्याचे मानले जाते. मात्र, इस्लामी कट्टरपंथामुळे ही तिन्ही मुल्ये त्यांच्या उद्गात्या देशातच धोक्यात आल्याचे दिसते. परिणामी देशातील मूल्यव्यवस्था व लोकशाही, प्रजासत्ताकाचा ढाँचा ‘जैसे थे’ ठेवण्यासाठी इस्लामी कट्टरपंथाला रोखणे आवश्यक झाले. विशेष म्हणजे, उदारमतवादाचा ‘हँग ओव्हर’ झालेले व त्यातून बाहेर पडण्यासाठी तितकेसे तयार नसलेले देश भोवताली असूनही फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांना हा धोका ओळखता आला, त्यावर उपाययोजना करण्याची इच्छाशक्ती व हिंमत त्यांनी दाखवली, तसेच ते खुलेपणाने यावर व्यक्त होऊ शकले.
 
 
इस्लाम व इस्लामी कट्टरपंथाबाबत मॅक्रॉन यांची मते नेमकी व थेट आहेत आणि याचा दाखला आजच नव्हे तर याआधीही कित्येकदा मिळालेला आहे. मॅक्रॉन यांनी यापूर्वी देशात बुरखाबंदी केलेली असून परकीय इमामांना फ्रान्स प्रवेशबंदी केली आहे. तत्पूर्वी विविध देशांतील ३०० पेक्षा अधिक इमाम फ्रान्समध्ये येऊन विद्यार्थ्यांना ‘शिक्षण’ देत असत. यंदाच्या फेब्रुवारीतही मॅक्रॉन यांनी फ्रान्स इस्लामी कट्टरपंथासमोर कधीही झुकणार नाही. अल्पसंख्य तुष्टीकरणासाठी देशाच्या अखंडता व स्वातंत्र्याशी तडजोड करणार नाही, अशी ग्वाही दिली होती. आताही इस्लामी कट्टरपंथाचा प्रभाव शाळा आणि सार्वजनिक संस्थांमधून मिटवला पाहिजे, असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले.
 
 
येत्या काही महिन्यात यासाठीचा कायदा पारित झाल्यानंतर ते अधिक ताकदीने करणे शक्य होईल, कारण यामुळे सरकारी अधिकार्‍यांना कोणत्याही कट्टरपंथी इस्लामी संस्था-संघटना वा शाळांना बंद करण्याची शक्ती मिळेल. सोबतच देशातील धार्मिक संस्था-संघटनांतील परकीय निधी वा गुंतवणुकीवरही पाळत ठेवता येईल. तसेच होम स्कुलिंगबाबत कठोर नियमावली जारी करुन धार्मिक शाळांनाही चौकशीच्या परिघात आणले जाईल. परकीय इमामांना बोलावून त्यांच्यामार्फत पाठ पढवण्यावरही निर्बंध आणले जातील. अर्थातच अन्य कोणावर नव्हे तर इस्लामी कट्टरपंथावर मात करण्याची ही फ्रेंच पद्धती असल्याचे इथे म्हणता येते. शुक्रवारी मॅक्रॉन यांनी यासंदर्भातील भाषण केले आणि आपल्याला इस्लामी फुटीरतावादावर जोरदार हल्ला करावा लागेल, असे ते रोखठोक शब्दांत म्हणाले.
 
 
इथे इस्लामी फुटीरतावाद म्हणजे नेमके काय हे समजून घेतले पाहिजे. एखाद्या देशातून एखाद्या समाजगटाने एखाद्या भूमीचा मालकी अधिकार मूळ देशापासून स्वतःकडे हिसकावून घेण्यासाठी प्रचार-प्रसार-कारवाया करणे, याला फुटीरतावाद म्हणतातच. जसे की, हुर्रियत कॉन्फरन्स किंवा पाकिस्तान इस्लामच्या नावावर भारताच्या जम्मू-काश्मिरमध्ये करत आले. पण इस्लामी फुटीरतावाद देशातच राहून देशापासून, राज्यघटनेपासून, कायद्यापासून, संस्कृतीपासून, वारशापासून, समाजापासून तुटून-फुटून राहण्याचा प्रचार-प्रसार करतो.
 
‘ते’ आणि ‘आपण’ अशी वेगळेपणाची भावना यात जोपासली जाते आणि ‘आपण’ मात्र ‘त्यांच्या’हून भिन्न, श्रेष्ठ असल्याचा अहंगंड यात महत्त्वाची भूमिका बजावतो. त्यातूनच फ्रान्ससहीत युरोपातील अनेक देशांत सीरिया व मध्य-पूर्वेतील इस्लामी देशांतून आलेल्या इस्लामी शरणार्थ्यांनी अनेक गुन्हे, अपराध केल्याचे दिसते. आपण इस्लामानुयायी आहोत आणि भोवतालचे लोक मात्र अन्य धर्माचे, अन्य संस्कृतीचे, अन्य विचारांचे आहेत, यामुळे त्यांना एकतर आपल्यासारखे करणे किंवा ते जसे आहेत, त्यांच्यावर हल्ले करुन, हिंसाचार करुन दहशत माजवणे हा यातल्या बहुतांश गुन्ह्यांमागचा उद्देश असल्याचे समजते.
 
 
मोहम्मद पैगंबराचे व्यंगचित्र काढल्याने पॅरिसस्थित ‘शार्ली हेब्दो’ मासिकाच्या कार्यालयावरील हल्ला ते ख्रिसमस वा नववर्षाच्या जल्लोषात केलेले हल्ले, ख्रिश्चन मुली-महिलांवरील अत्याचार-बलात्कार याचेच निदर्शक आहे. पण हळूहळू युरोपातील देशांना आपल्या ‘ओपन बॉर्डर्स’ धोरणातून व इस्लामी शरणार्थ्यांना प्रवेश देण्यातून निर्माण झालेले धोके, अराजक, अव्यवस्था दिसत आहे आणि ते त्यातून बाहेर पडण्यासाठी कामाला लागल्याचे पाहायला मिळते. फ्रान्सने यात आघाडी घेतली असून स्वीडन, नॉर्वेसह इतरही देशांत तशीच भावना वाढीस लागली आहे.
 
 
इस्लामी शरणार्थी अन्य देशांत गेल्यानंतर तिथले कायदे न पाळता शरिया कायद्यानुसार वागतात आणि त्यांच्याविरोधातील भावना तयार होण्यातले हे एक प्रमुख कारण आहे. याबाबतही इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी विधान केलेले आहे. कोणत्याही धर्माच्या वैयक्तिक-खासगी कायद्यांपेक्षा देशाचे कायदे सर्वोपरी आहेत, असे त्यांचे म्हणणे आहे. परंतु, इस्लामी कट्टरपंथीयांना ही बाब अजूनही कळत नाही, ते त्यांच्या त्याच त्या जुन्या-पुराण्या व इतरांपासून आपले वेगळेपण दाखवणार्‍या कायद्यांना चिकटून बसलेले आहेत. अशा परिस्थितीत त्यांच्या विरोधात अवघे जग एकवटायला वेळ लागणार नाही. आज फ्रान्ससह काही देश तसे उघडपणे करत आहेत, उद्या अन्यही देश तसेच करतील.
 
आज इमॅन्युएल मॅक्रॉन इस्लाम जगावरील संकट असल्याचे म्हणताना दिसतात, उद्या त्यांच्या शेजारच्या देशांचे राष्ट्रप्रमुखही याच निष्कर्षावर येतील. तेव्हा मात्र, धर्माच्या नावाखाली चाललेले इस्लामी कट्टरपंथीयांचे सर्वच धंदे थांबतील, तसेच कितीही बिकट परिस्थितीत, विपन्नावस्थेत असला तरी कोणत्याही इस्लामी शरणार्थ्याला कोणीही आपल्या देशात प्रवेश देणार नाही. आताशी फक्त त्याची सुरुवात झाली आहे, येणार्‍या काळात त्याची परिणती आणखी निराळ्या प्रसंगात, घटनेत व कृतीत होऊ शकते.



Powered By Sangraha 9.0