"राममंदिर हे स्वातंत्र्य मंदिर आहे" - विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस

04 Oct 2020 12:12:40

Devendra Fadanvis_1 
 
 
 
मुंबई / पुणे : "राममंदिर हा देशाच्या अस्मितेचा विषय होता. अयोध्येत राममंदिर उभे राहावे, अशी सामान्य माणसाची इच्छा होती. त्यामुळे राममंदिर हे राष्ट्र मंदिर तर आहेच, शिवाय ते स्वातंत्र्य मंदिर आहे" असे प्रतिपादन राज्याचे विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
 
 
सा. विवेकच्या ‘राममंदिर ते राष्ट्र मंदिर’ ग्रंथानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रजागरण व्याख्यानमालेचे ऑनलाइन आठवे पुष्प रविवार दि. ४ ऑक्टोबर २०२० रोजी सकाळी दहा वाजता देवेंद्र फडणवीस यांनी गुंफले. फडणवीस यांच्या 'रामजन्मभूमी : संघर्ष आणि संकल्पपूर्ती' या विषयावरील व्याख्यानाने व्याख्यानमालेचा समारोप करण्यात आला. उज्ज्वल भारताच्या भविष्यासाठी जोरकसपणे चिंतन करू शकतो, विचार मांडू शकतो, हाच आवाज उद्याच्या नवराष्ट्र रचनेचा भाग होऊ शकतो, हेच या व्याख्यानमालेचे फलित होय. फडणवीस यांनी राममंदिर आंदोलन इतिहासाचे, त्यामधील त्यांच्या योगदानाचे आणि आलेल्या अनुभवांचे कथन केले.
 
 
 
 
 
फडणवीस म्हणाले, "भारतीय स्वातंत्र्यलढा जसा महत्त्वाचा आहे, तसा राममंदिर स्वातंत्र्य आंदोलनाचा लढाही तितकाच महत्त्वाचा आहे. पराजयाचे प्रतीक पुसले जावे आणि तिथे अस्मितेचे प्रतीक उभारले जावे, यासाठी पाचशे वर्षे संघर्ष सुरू होता. स्वातंत्र्याच्या ४० वर्षांनंतरही तत्कालीन सरकारने मंदिर उभारण्यासाठी काहीच केले नाही. १९८९मध्ये पहिल्यांदा विश्व हिंदू परिषदेने पुढाकार घेऊन मंदिराची पायाभरणी केली. पुढे लालकृष्ण अडवाणी यांनी रथयात्रेच्या माध्यमातून रामजन्मभूमी आंदोलनाला गती मिळवून दिली."
 
 
अयोध्येत भव्य राममंदिर उभे राहावे यासाठी ज्या कारसेवा झाल्या होत्या, त्यात फडणवीस यांचा सहभाग होता. या संदर्भात बोलताना ते म्हणाले की, "मंदिर वहीं बनायेंगे, मंदिर भव्य बनवायचे या हेतूने, मला तिन्ही कारसेवांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली. वयाच्या अठराव्या वर्षी रामशिलापूजन कार्यक्रमानिमित्ताने रामजन्मभूमी आंदोलन चळवळीशी जोडला गेलो. खंड, उपखंड आणि परखंड अशी विश्व हिंदू परिषदेची रचना होती, त्यातील एका खंडाचा मी प्रमुख होतो."
 
 
 
फडणवीस यांनी कारसेवक म्हणून लोकांचे मिळालेले प्रेम यासह बदायू तुरुंगामधल्या रोमहर्षक आठवणी जागवल्या. ही व्याख्यानमाला नेटकी आणि सुटसुटीत झाली. सर्व व्याख्यात्यांनी आपापल्या विषयांना योग्य न्याय देत राष्ट्र मंदिराचा विषय मांडला. त्यामुळे महाराष्ट्रातील वाचकांनी यास भरभरून प्रतिसाद दिला.ही व्याख्यानमाला यशस्वी होण्यासाठी अनेकांनी मदत केली. त्यामुळेच ही व्याख्यानमाला यशस्वीरित्या पार पडली, असे 'विवेक'चे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पोहनेरकर यांनी सांगितले.
 
 
 
Powered By Sangraha 9.0