लालबाग-ठाण्यातून ८८ वन्यजीवांची तस्करी उघड

31 Oct 2020 11:34:55

wildlife _1  H


ठाणे वन विभागाची कारवाई 


मुंबई (विशेष प्रतिनिधी) - ठाणे वन विभागाने शुक्रवारी केलेल्या कारवाईत मुंबई आणि ठाण्यामधून ८८ वन्यजीवांची तस्करी उघड झाली आहे. या वन्यजीवांमध्ये कासव, पोपट आणि खारींचा समावेश आहे. महत्त्वाचे म्हणजे यामाध्यमातून अटक केलेल्या तस्करांचे जाळे मुंबईभर पसरलेले असून वनअधिकारी त्यांचा मागोवा घेत आहेत. 
 
 

wildlife _1  H  
 
मुंबई-ठाण्यासारख्या शहरातून वन्यजीवांच्या तस्करीचे जाळे उघड होण्याचे प्रकरण सातत्याने समोर येत आहेत. दोन आठवड्यापूर्वी मुंबई गुन्हे शाखेच्या घाटकोपर विभागाने काळवीटाच्या कातडीची, तर ठाणे गुन्हे शाखेने बिबट्याच्या कातडीची तस्करी उघडकीस आणली होती. त्यानंतर आता शुक्रवारी ठाणे वन विभागाने वन्यजीवांच्या तस्करीचे मोठे जाळे उघडकीस आणले. यामाध्यमातून मुंबई आणि ठाण्यात मारेलेल्या धाडीत एकूण सहा प्रजातींचे ८८ वन्यजीव ताब्यात घेण्यात आले आहे. ही कारवाई वन विभागाचे अधिकारी आणि 'वाईल्डलाईफ वेलफेअर असोसिएशन, ठाणे' (डब्लूएए) या संस्थेच्या कार्यकर्त्यांनी केली. 
 
 

wildlife _1  H  
 
 
मुंबईवरुन काही तरुण ठाण्यातील विवियाना माॅल परिसरात पोपटांची तस्करी करण्यासाठी येणार असल्याची माहिती वन विभागाला मिळाली होती. त्यानुसार आम्ही सापळा रचून या तरुणांना अटक केली. त्यांच्याकडून काही पोपट आम्ही ताब्यात घेतल्यानंतर अधिक चौकशीतून मुंबईत काही वन्यजीव असल्याची माहिती त्यांनी दिल्याचे, ठाण्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी नरेंद्र मुठे यांनी सांगितले. त्यानुसार मुंबईत येथे मारलेल्या धाडीत एका घरातून काही वन्यजीव ताब्यात घेतल्याची माहिती त्यांनी दिली.वन विभागाच्या अधिकाऱ्यांना लालबाग येथील एका घरातून खार, पोपट आणि कासव मिळाले. या कारवाईतून ३ प्रजातींचे एकूण ३८ पोपट, १६ इंडियन टॅन्ट टर्टल, २४ इंडियन ब्लॅक स्पाॅटेड टर्टल आणि १० खारी ताब्यात घेण्यात आला. हे जीव वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत परिशिष्ट १,२,४ मध्ये संरक्षित आहेत. कारवाईत दोन तरुणांना अटक करण्यात आली असून लालबाग येथील तरुण फरार आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0