मराठा आरक्षण समितीवरून अशोक चव्हाणांना हटवा : विनायक मेटे

31 Oct 2020 16:22:17

Vinayak mete_1  
 
 
मुंबई : "मराठा आरक्षणच्या प्रश्नांकडे ठाकरे सरकार दुर्लक्ष करत आहे. मराठा आरक्षण संदर्भातील मंत्रीमंडळ उपसमितीवरून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना हटवून मराठा आरक्षणाच्या संदर्भाची जाणीव असलेल्या व्यक्तीची निवड करा," अशी मागणी शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केली. ७ नोव्हेंबर रोजी मराठा क्रांती मोर्चा व शिवसंग्राम मुख्यमंत्र्यांच्या घरावर मशाल मार्च काढून आपल्या मागण्या अजून तीव्र करणार असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले.
 
 
विनायक मेटे यांनी पुढे सांगितले की, "ठाकरे सरकार मराठा आरक्षणाच्या संदर्भाने गंभीर दिसत नाही. मराठा आरक्षणाच्या बाजूने ज्या वकिलांची निवड केलेली आहे, त्यांच्यामध्ये देखील कुठलाच समन्वय नाही. मराठा समाजातील तरुणांची नोकर भरती संदर्भात हे सरकार कुठलाच ठोस निर्णय घेत नसल्यामुळे तरुणांचे मोठे नुकसान होत आहे. या सगळ्या बाबींबरोबरच मराठा आरक्षणाच्या संदर्भाने सरकारने स्थापन केलेली मंत्रिमंडळ उपसमितीवर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची निवड केली आहे. मात्र, त्यांना मराठा समाजाच्या प्रश्नासंदर्भात काही घेणेदेणे नाही. अशी एकंदरीत सगळी परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण झालेली आहे."
 
 
 
"मराठा आरक्षणाच्या संदर्भाने या सरकारविरोधात प्रचंड रोष निर्माण झालेला आहे. मराठा क्रांती मोर्चा व शिवसंग्राम यांच्यावतीने सात नोव्हेंबर रोजी आम्ही राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घरावर मशाल मार्च काढून सरकारच्या कारभाराचा निषेध नोंदवणार आहोत, असे आमदार विनायक मेटे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. मराठा समाजातील अभ्यासू युवकांसाठी शिवसंग्राम विद्यार्थ्यांना आरक्षणसंबंधी मार्गदर्शन व कायदेशीर माहिती देण्यासाठी मराठा आरक्षण विद्यार्थी परिषद ५ नोव्हेंबर रोजी घेणार असल्याचेही यावेळी आमदार मेटे म्हणाले.
 
 
Powered By Sangraha 9.0