सिंधू की सरस्वती? नावात काय आहे?

31 Oct 2020 20:30:02

Sindhu_1  H x W


‘पुरातत्त्व’ (Archeology) हे शास्त्र आर्यांच्या स्थलांतराचा आणि आक्रमणाचा सिद्धांत कसा नाकारते, ते आपण मागच्या काही लेखांमधून जरा तपशिलात जाऊन पाहिले. फक्त युरोपीय आणि इतर पाश्चिमात्य संशोधक व अभ्यासक म्हणतात, म्हणून त्या संदर्भात बोलताना आपण ‘सिंधू खोरे’ हा शब्दप्रयोग आतापर्यंत वापरला. १९२०-३०च्या दशकात मोहेंजोदरो, हडप्पा, वगैरे ठिकाणे सिंधू नदीच्या खोर्‍यात सापडल्याने तिथल्या प्राचीन नागरीकरणाला ओघानेच ‘सिंधू संस्कृती’ असे नाव दिले गेले. पण, सिंधूच्या खोर्‍यात न येणार्‍या अशा दूरवरच्या इतरही अनेक ठिकाणी त्याच्याशी समकालीन असे आणि साधारण तशीच वैशिष्ट्ये असलेल्या नागरीकरणाचे अवशेष मिळायला लागले. अशा परिस्थितीत या नागरीकरणाला जर दुसरे एखादे जास्त समर्पक असे भौगोलिक नाव द्यायचे असेल, तर सिंधू नदीचा संदर्भ कितपत रास्त आहे, याचाही जरा विचार करायला हवा.
 
 
नागरीकरणातील एक समान धागा
 
 
सिंधू नागरीकरणाचीच वैशिष्ट्ये दाखविणारी राजस्थानातील कालीबंगन, हरियाणामधील राखीगढी, गुजरातमधील धोलावीरा किंवा लोथल ही उदाहरणार्थ म्हणून काही प्रमुख ठिकाणे बघूया. कालीबंगन, राखीगढीसारखी ठिकाणे सिंधू नदीपासून दूरवर आहेत. धोलावीरा, लोथलसारखी ठिकाणे तर सिंधू खोर्‍यापासूनही दूरवर आहेत. ‘सिंधू खोरे’ अशा भौगोलिक नावाने ती निर्देशित होत नाहीत. पण, यांच्यात नगररचना, स्थापत्य, मुद्रा वगैरे गोष्टींच्या निमित्ताने दिसणारी इतर सांस्कृतिक वैशिष्ट्ये पाहता कोणतातरी एक समान धागा यांच्यात असल्याचेच सूचित होते. ही सगळी ठिकाणे अतिशय विस्तीर्ण अशा परिसरात पसरलेली आहेत. इतक्या दूरवर अशी समान वैशिष्ट्ये टिकविणारी कोणती गोष्ट असू शकेल? त्या काळातली दळणवळणाची मर्यादित साधने, संपर्काची मर्यादित साधने आणि अनेक प्रकारच्या भौगोलिक कारणांचा विचार केल्यावर शेवटी फक्त एकच कारण निष्कर्षाप्रत येते, ते म्हणजे ‘नदी.’ एक मोठी मुख्य नदी, तिच्या असंख्य उपनद्या, त्यांच्या काठाने वाढलेली लोकवस्ती आणि नगरे, त्यांच्यात होणारे दळणवळण, व्यापार, शिक्षण वगैरे कारणांनी होणारा लोकसंपर्क - अशी साखळी आपोआप जोडली जाते. त्यातून या सगळ्या ठिकाणांच्या समान वैशिष्ट्यांची पार्श्वभूमी चटकन लक्षात येते. त्यात सिंधू तर आहेच. पण, सिंधू नदीपेक्षा वेगळी अशी अजून एक कुठली तरी नदी नक्की होती, जिने ही नगरे आणि त्यातील माणसांना जोडले होते. सिंधूहूनही जास्त लोकमान्य अशी ती नदी होती. आकारानेसुद्धा कदाचित ती सर्वात मोठी असावी. एखादी फुलांची किंवा मण्यांची माळ बनल्यावर लोकांना वरून ती फुले किंवा मणी फक्त दिसतात. पण, त्यांना जोडून ठेवणारा आतला धागा मात्र दिसत नाही. तो फक्त जाणकार आणि साक्षेपी व्यक्तींनाच माहीत असतो. तसेच काहीसे या नदीचेही झाले आहे. तिने ही प्राचीन नगरे, लोक, संस्कृती यांना धरून तर ठेवले. पण, प्राचीन इतिहासाचा आणि संस्कृतीचा वरवर अभ्यास करणार्‍या लोकांच्या मात्र ती लक्षात येत नाही. वरकरणी दिसणार्‍या गोष्टींच्या मुळाशी जे लोक जातात, अशांना मात्र ती नदी ‘दिसलेली’ आहे. अशांपैकी कुणीतरी ते आवर्जून लक्षात आणून द्यावे लागेल.
 
अम्बितमा, नदीतमा, देवितमा!
 
हिंदूंचा सर्वाधिक प्राचीन ग्रंथ म्हणजे ऋग्वेद. ऋग्वेदातल्या अनेक मंत्रांमधून अनेक नद्यांचे अतिशय गौरवपूर्ण आणि कृतज्ञतेने केलेले उल्लेख आहेत. त्यात एक प्रमुख नाव येते ‘सरस्वती.’ तत्कालीन प्राचीन सरस्वतीच्या अनेक उपनद्या होत्या. त्यांच्यापैकी एक सिंधू होती. सिंधूखेरीज अजून यमुना, दृषद्वती, शुतुद्री (सतलज), परुष्णी (रावी), असिक्नी (चिनाब), वितस्ता (झेलम), विपाशा (व्यास/बियास) या इतरही मोठ्या नद्या तिला मिळत असत. कुभा (काबुल), सुस्वतू (स्वात), क्रमू (कुर्रम), गोमती (गोमल) या सिंधूच्या उपनद्यासुद्धा ऋग्वेदात सापडतात. आज यमुनेची दिशा जरी वेगळी असली, तरी ऋग्वेदाच्या रचनेच्या काळी आणि त्याच्या आधीच्या काळी ती तशी नव्हती. या सर्वांचा मिळून अतिशय विस्तीर्ण परिसर बनतो. बहुतेक सर्व उत्तर भारत, वायव्य भारत, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानचा उत्तर भाग यामध्ये येतो. आतापर्यंत ‘सिंधू संस्कृती’च्या वैशिष्ट्यांनी युक्त अशी जितकी ठिकाणे सापडली आहेत, त्यांच्यापैकी बहुतांशी सर्व ठिकाणे या विस्तीर्ण परिसरातली आहेत. या नद्यांची मुखे उथळ जमिनीमुळे विविध ठिकाणी फाकून तशाच विस्तीर्ण किनार्‍यावर येऊन असंख्य धारांनी अरबी समुद्राला मिळत असत. ही लांबलचक किनारपट्टी पाकिस्तानचा दक्षिण किनारा आणि गुजरातची किनारपट्टी अशी सर्व मिळून बनत असे (इथे एका विशेष गोष्टीची नोंदही घेतली पाहिजे. ती म्हणजे, आजच्या नकाशात गुजरातची किनारपट्टी ज्या आकारात दिसते, त्याच आकाराची ती त्या प्राचीन काळी नव्हती. तेव्हा समुद्राची पातळी (Mean Sea Level) आतापेक्षा खूपच खाली होती. त्यामुळे किनारपट्टीच्या पुढचा समुद्राच्या आतला भागसुद्धा त्या काळी उघडाच होता, तिथे जमीन होती. पुढे समुद्राची पातळी वाढल्याने त्यात बुडालेल्या द्वारकेची कथा वाचकांनी आठवावी.) अशा लक्षणीय कारणांनी या विस्तीर्ण परिसरातल्या त्या प्राचीन नागरीकरणाला आणि त्यात फुललेल्या संस्कृतीला ‘सरस्वती संस्कृती’ म्हणणेच अधिक संयुक्तिक ठरते. सरस्वतीचे ऋग्वेदातले ‘अम्बितमे नदीतमे देवितमे सरस्वति’ हे केलेले वर्णन तत्कालीन लोकांची सरस्वती नदीच्या ठायी असलेली कृतज्ञता, श्रद्धा आणि प्रेमच दाखवते. नद्यांना ‘लोकमाता’ म्हणण्याची जनभावना इतक्या प्राचीन काळापर्यंत मागे जाते.
 

आज सरस्वती कुठे आहे?
 
जर प्राचीन सरस्वती इतकी मोठी, महत्त्वाची नदी होती, तर ती आज कुठे गेली? अनेक कारणांनी अनेक वर्षांत ती क्रमाने रोडावत गेली. महाभारतातल्या वर्णनानुसार ती ‘विनाशन’ येथे वाळवंटात लुप्त झाली. असंख्य हिंदूंची श्रद्धा अशीही आहे की, ती प्रयागराज (पूर्वीचे अलाहाबाद) येथे गंगा-यमुना यांचा संगम आहे, तिथेच ‘अंतर्वाहिनी’ रूपाने येऊन मिळते. काही अभ्यासकांच्या मतानुसार आज सरस्वतीचा प्रवाह असाच अंतर्वाहिनी रूपाने पश्चिमेला राजस्थानातून सिंधूकडे जातो. याचे काही पुरावेसुद्धा दिले जातात. तर अजून काही अभ्यासकांच्या मते आजची ‘घग्गर-हाक्रा’ नदी म्हणजेच पूर्वीची सरस्वती नदी होय. त्या रूपाने ती एक अत्यंत रोड आणि उन्हाळ्यात आटणारी अशी अगदी क्षुल्लक नदी राहिली आहे. काही विशिष्ट अभ्यासक तर अफगाणिस्तानातली ‘हरक्ष्वती’ (Haraxvati) नदी म्हणजेच वैदिक सरस्वती असल्याचे सांगतात! माळेतल्या मण्यांना बांधून ठेवणारा तो अदृश्य धागाच जर तुटला, तर ते मणी इतस्तत: विखरून जातात. अगदी तसेच सरस्वती आटून गेल्यावर तिच्या खोर्‍यातल्या नगरांचे आणि लोकांचेही झाले. त्याविषयी अधिक तपशील आपण पुढच्या लेखात पाहूया.
 
नावात काय आहे?
 
इतके सगळे समजून घेतल्यावर शेवटी प्रश्न राहतोच की, नावात काय आहे? त्या संस्कृतीला ‘सिंधू संस्कृती’ म्हणा, किंवा ‘सरस्वती संस्कृती.’ त्याने असा काय फरक पडतो? सरस्वतीचे अस्तित्व स्वीकारल्याने जो फरक पडतो, तोच फरक तिचे नाव लावल्यानेही पडतो! त्या संस्कृतीला ‘सिंधू संस्कृती’ म्हणण्याने सरस्वतीचे महत्त्व आणि अस्तित्व नाकारता येते. त्यामुळे तिची वैदिक वर्णनेसुद्धा सिंधू नागरीकरणाच्या पडत्या काळातली किंवा त्याच्या नंतरची ठरवता येतात. तिला ‘हरक्ष्वती’ ठरवले तर तिच्या काठचे तत्कालीन ‘आर्य’ पुढे उत्तर भारतात स्थलांतरित झाले, असेही सांगता येते. त्यामुळे आधी सिंधू नागरीकरण आणि नंतर वैदिक काळ, असा क्रम ठरवता येतो. मागच्या अनेक लेखांमधून तो क्रम चुकीचा असून प्रत्यक्षात तो त्याच्या अगदी उलट असल्याचे आपण पाहिले आहेच. मात्र, सरस्वतीचे अस्तित्व मान्य केले की, आपोआपच तिची वैदिक वर्णनेसुद्धा मान्य करावी लागतात. त्या नागरीकरणाचा ऱ्हास सरस्वतीच्या आटण्यामुळे झाला, हेही ओघानेच येते. त्यामुळे वैदिक वर्णनात जागोजागी दिसणारे ‘आर्य’ त्या नगरांमध्ये आधीपासूनच राहत होते, हे मान्य करावे लागते. वेदांची रचना सरस्वती नदी आटण्याच्या आधीच झालेली होती, हे मान्य करावे लागते; अर्थातच ज्यांना ‘आर्य स्थलांतर/आक्रमण सिद्धांत’ मान्य आहे, असे लोक आवर्जून ‘सिंधू संस्कृती’ म्हणतात. त्यामुळे सुजाण आणि निरागस वाचकांनी त्याला ‘सरस्वती संस्कृती’ म्हणणेच जास्त संयुक्तिक ठरेल.
 
 
- वासुदेव बिडवे
 
Powered By Sangraha 9.0